कोलकाता नाइट राडर्सने अकराव्या आयपीएल टी-20 मधील परतीच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव केला असला तरी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी या हंगामातील सिक्सर किंग ठरला आहे.
अकराव्या हंगामातील साखळी सामन्यात धोनीने नऊ डावात 24 षटकार खेचले आहेत. ख्रिस गेल, ए.बी. डी'व्हिलिअर्स, आंद्रे रसेल (प्रत्येकी 23 षटकार) यांना धोनीने मागे टाकले. धोनीने कोलकाताविरुध्द 12 व्या षटकात फलंदाजीस येऊन नाबाद 43 धावा काढल्या. धोनीने चार षटकार व एक चौकार खेचला.
धोनी हा प्रचंड फॉर्ममधए आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या विजयात मोठे योगदान दिले आहे. धोनीच्या वयाचा मुद्दा उपस्थित करणार्या सर्वच टीकाकारांची तोंडे धोनीने बंद करून टाकली आहेत.
चेन्नईने या आयपीएल साखळी सामन्यात 5 बाद 177 धावा काढल्या. कोलकाताने 17.4 षटकात 4 बाद 180 धावा काढल्या. शुभन गील आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी पाचव्या जोडीस नाबाद 83 धावांची भागीदारी करून कोलकाताला विजयी केले.