- मोहम्मद जुबेर खान
आफ्रिकन देश युगांडा प्रथमच टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. पाकिस्तानात जन्मलेल्या एका खेळाडूने या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हा अष्टपैलू खेळाडू रियाजत अली शाह आहे. संघाला पुढील फेरीत पोहोचण्यात त्याने महत्त्वाचा वाटा उचललाय. शाह हा गिलगिट बाल्टिस्तानचा आहे. पाकिस्तानहून युगांडाला पोहोचण्याची त्याची गोष्ट खूप रंजक आहे.
पात्रतेसाठी युगांडाला झिम्बाब्वेला पराभूत करणं गरजेचं होतं आणि या सामन्यात रियाजतने सिकंदर रझाचा महत्त्वाचा बळी तर घेतलाच पण 26 चेंडूत 42 धावा करून संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देण्यात यशस्वी ठरला.
पाकिस्तानशी स्पर्धा करण्याची इच्छा
आफ्रिकन देश नामिबियामध्ये खेळल्या जात असलेल्या पात्रता फेरीदरम्यान बीबीसीशी केलेल्या खास संवादादरम्यान रियाजत म्हणाला, “विश्वचषक खेळण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्ध जिंकणं आवश्यक होतं. "आम्ही एकत्रितपणे बसलो आणि विचार केला की आम्ही कोणत्याही संघाला हरवू शकतो."
झिम्बाब्वे हा कसोटी क्रिकेट खेळणारा देश आहे आणि 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने पाकिस्तानचा पराभव केलेला.
टी20 विश्वचषक पात्रता फेरी ही सहसा अज्ञात संघांसाठी प्रसिद्धीझोतात येण्याची सुवर्णसंधी असते आणि युगांडा क्रिकेट संघ यासाठी खूप दिवसांपासून तयारी करत होता.
पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या रियाजत अली शाहला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत स्पर्धा करायची आहे.
तो म्हणतो, “असं दिसतंय की भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील. जर आपणही त्या गटामध्ये असलो तर मी पाकिस्तानसोबतच्या सामन्याचा आनंद घेईन.”
"बाबर आझमची विकेट घेण्याची माझी इच्छा आहे आणि शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाहचा सामना करून त्यांच्याविरुद्ध धावा काढायला मला आवडेल."
गिलगिटमध्ये टेप बॉलने सुरुवात केली
रियाजत अली शाह हा गिलगिटचा आहे. त्याचे वडील गिलगिटमध्ये औषध व्यवसायाशी संबंधित आहेत.
रियाजत अली शाह वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत टेप चेंडूने क्रिकेट खेळलाय आणि त्यानंतर जेव्हा त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी टणक चेंडूने क्लब क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा त्यांची लोकप्रियता वाढू लागली.
रियाजत म्हणतो, "मी मूळचा डोंगराळ भागातील आहे आणि म्हणूनच मी लहानपणापासूनच तंदरूस्त आहे."
त्यानं सांगितलं की, "वडिलांनी मला क्रिकेट खेळण्यापासून रोखलं नाही, परंतु माझ्या आईकडून मला ओरडा मिळायला. मी अभ्यासात लक्ष घालावं अशी आईची इच्छा होती. याच कारणामुळे मला गिलगिट-बाल्टिस्तानमधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्यात आला.
क्लब क्रिकेटमध्ये रियाजतला तीन तास कठोर सराव करावा लागला. रियाजत सांगतो की, तो यापेक्षा खूप जास्त मेहनत घ्यायचा.
तो म्हणतो, "मी टेप चेंडूने क्रिकेट खेळायला सुरू केल्यापासून, मी एक अष्टपैलू फलंदाज बनलो, जे काळानुरूप सुरू राहिलं.”
रियाजत युगांडाच्या संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्याला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधीही मिळते. तो मध्यमगती गोलंदाज आहे.
तो म्हणतो, “जेव्हा मी टणक चेंडूने खेळायला सुरुवात केली तेव्हा क्लब क्रिकेट खेळून माझी लोकप्रियता वाढू लागली. त्यानंतर माझी गिलगिट-बाल्टिस्तानच्या 19 वर्षाखालील संघात निवड झाली. त्यातही मी चांगली कामगिरी केलेय.”
तो म्हणाला, “यानंतर मला इस्लामाबाद 19 वर्षाखालील संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. मी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली पण मला तिथे संधी मिळाली नाही.”
पाकिस्तानातून युगांडाला कसा पोहोचला?
रियाजत अली शाह सांगतो की, तो दोन वर्षे इस्लामाबाद संघात राहिला पण त्यादरम्यान त्याला दोन वर्षांत फक्त तीन सामने खेळण्याची संधी मिळाली.
तो म्हणतो, “मला वाटलं की मला माझी कामगिरी दाखवण्याची संधी मिळत नाहीए. मला जे काही सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात माझी कामगिरी चांगली होती तरी तो काळ निराशाजनक होता.”
रियाजत अली शाह यांने सांगितलं की, त्यादरम्यान तो दुबईला क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला आणि तिथे त्याची भेट युगांडामध्ये राहणाऱ्या गुलाम हमजा नावाच्या व्यक्तीशी झाली.
त्याने रियाजतला युगांडातील क्लबसाठी खेळण्यासाठी आमंत्रित केलं आणि येथे त्याला अधिक संधी मिळू शकतात असं सांगितले.
रियाजतचे आई-वडील त्याला युगांडात जाण्याची परवानगी द्यायला तयार नव्हते पण त्याला पाकिस्तानात संधी मिळत नाही आणि युगांडात आपली क्षमता दाखवण्याची चांगली संधी असल्याचे पाहून त्यांनी परवानगी दिली.
रियाजत अली शाह म्हणतो, “मी जेव्हा युगांडाला गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जर क्लब क्रिकेटमध्ये माझी कामगिरी चांगली असेल तर मला सर्वप्रथम मला युगांडाच्या राष्ट्रीय संघासोबत सराव आणि प्रशिक्षण करण्याची संधी मिळेल आणि जर मी यातही चांगली कामगिरी केली तर मला राष्ट्रीय संघात समाविष्ट करून घेतलं जाईल.”
रियाजतने क्लब क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघासोबत सराव आणि प्रशिक्षणाची संधी मिळाली.
केनियाचा स्टार क्रिकेटर स्टीव्ह टिकोलोकडून त्याला प्रशिक्षण मिळालं, ज्याने त्याचं तंत्र सुधारलं आणि त्याचा त्याला फलंदाजीत खूप फायदा झाला.
रियाजत अली शाह म्हणाला की, पात्रता फेरीत तो सहा सामने खेळला ज्यात चार डावात फलंदाजी करताना तो एकदा नाबाद राहिला. एकूण 44 च्या सरासरीने 132 धावा केल्या.
त्याने सहा डाव टाकले ज्यात त्याने एकूण अठरा षटकांत 94 धावा देऊन सात बळी घेतले. त्याचा इकॉनॉमी रेट 5.22 होता, तर त्याची सर्वोत्तम कामगिरी 14 धावांत दोन बळी अशी होती.
तो म्हणतो की फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्याला नेहमीच महत्त्वाच्या प्रसंगी संघासाठी चांगली भूमिका बजावण्याची संधी मिळालेय.
विश्वचषकावर नजर
रियाजत अली शाह म्हणतो की आता युगांडाच्या क्रिकेट संघासोबत त्याचं भविष्य जोडलं गेलंय.
तो म्हणाला, "युगांडामध्ये क्रिकेट लोकप्रिय होतंय आणि आता या यशानंतर त्याला अधिक लोकप्रियता मिळेल."
तो म्हणतो, “आम्ही विश्वचषकासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मेहनत घेतोय. आम्ही कोणत्याही संघासाठी सोपे प्रतिस्पर्धी असणार नाही. आमच्या संघामध्ये खूप प्रतिभा आहे.”
रियाजत अली शाह म्हणाला की, पाकिस्तानशी सामना झाला तर खूप मजा येईल.
तो म्हणतो, “पाकिस्तान हा मोठा संघ आहे आणि मला संधी मिळाली नाही ही वेगळी बाब आहे. जर मला संधी मिळाली असती तर मीसुद्धा जगातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलो असतो. पण जेव्हा आम्ही पाकिस्तानसह मोठ्या संघांविरुद्ध खेळू तेव्हा आम्हाला शिकण्याची संधी मिळेल."