Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'सचिन... सचिन' जयघोषाचे गुपित उघडले

'सचिन... सचिन' जयघोषाचे गुपित उघडले
भारतीय क्रिकेट विश्वावर आणि तमाम चाहत्यांच्या मनावर गेली 24 वर्ष अधिराज्य गाजवणार्‍या सचिन रमेश तेंडुलकर हे नाव चांगलेच उमटलेले आहे. आणि नुसते 'सचिन... सचिन' या जयघोषाने आजही क्रिकेटविश्व भारून टाकले आहे. तो तालबद्ध गजर ऐकून क्रिकेटप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहतात. पण या जयघोषाचा जन्म कधी आणि कसा झाला याचे गोड गुपित खुद्द सचिन तेंडुलकरने उलगडले आहे.
आपल्या बॅटने टीकाकारांना, प्रतिस्पर्धांना चोथ उत्तरे देण्यात माहीर असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तितकाच हजरजबाबीही आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याचाच प्रत्यय सचिन...सचिन या गाणायाच्या रिलीजवेळी आला. सचिन..सचिन हा नारा तू पहिल्यांदा कधी ऐकलास, या प्रश्नावर सचिनने असे मजेशीर उत्तर दिले की सभागृहात एकच हशा पिकला.
 
लहानपणी मी वांद्रयातील कलानगरमध्ये राहत होतो. तिथे जेव्हा मी मित्रांसोबत क्रिकेट खेळत असायचो, तेव्हा आई मला घरी बोलावण्यासाठी सचिन...सचिन अशी हाका मारायची. बहुधा तेव्हाच या नार्‍याचा जन्म झाला असावा, असे मातृभक्त सचिनने हसत हसत सांगितले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. सचिन...सचिन हा जयघोष क्रिकेटविश्वात अजरामर झाला आहे. ही महती लक्षात घेऊनच सचिन: ए बिलियन ड्रीम्स या चित्रपटात सचिन...सचिन हे गाणे घेण्यात आले.
 
या गाण्याला ए आर रेहमानचे संगीत आहे आणि सुखविंदर सिंगने ते गायले. त्याचा व्हिडिओही लाँच करण्यात आला. तो पाहून सचिनच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. त्यातील काही प्रसंग पाहून तो काही क्षण भूतकाळातही हरवला.
 
सुरूवातीच्या काळात सरावासाठी इनडोअर व्यवस्था नव्हती. त्यावेळी पावसाळ्यात पीचवर पाणी साचलेले असतानाही आम्ही सराव करायचो, अशी आठवण त्याने व्हिडिओतील एक दृश्य पाहून सांगितली. सचिन...सचिन हा जयघोष माझ्या निवृत्तीनंतरही सुरूच राहील, अशी कल्पनाही मी केली नव्हती. पण आता तो थिएटरमध्येही घुमणार आहे. मला खरंच खूप आनंद वाटतोय, अशा भावनाही त्याने व्यकत केल्या.
 
सचिन...सचिन हा जयघोष आजन्म माझ्या लक्षात राहील, असे भावूक उद्धार सचिनने वानखेडे स्टेडियमवरील आपल्या निरोपाच्या भाषणातही काढले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

.... तर भारत शांत बसणार नाही