Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाच्या फटकेबाजीनं रचला कसोटीतला सर्वात मोठा विक्रम

शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाच्या फटकेबाजीनं रचला कसोटीतला सर्वात मोठा विक्रम
, शनिवार, 29 जून 2024 (13:52 IST)
भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानानं दक्षिण आफ्रिकेच्या विरोधातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यामुळं अनेक वर्ष स्मरणात राहील असा विक्रम बनला आहे.
 
भारतानं चार विकेट गमावत 525 धावा केल्या. पुरुष किंवा महिला दोन्हींमधील कसोटीत एका दिवसातील सर्वाधिक धावांचा हा विक्रम आहे.
 
भारतानं याआधीच्या विक्रमापेक्षा 16 धावांची भर घालत हा नवा विक्रम केला आहे.
 
यापूर्वीचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. त्यांनी 9 विकेट गमावून 509 धावा केल्या होत्या.
 
हा विक्रम त्यांनी 2002 मध्ये बांगलादेशच्या विरोधात कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी केला होता.
 
विक्रमात शेफालीचा मोठा वाटा
शेफाली वर्माला महिला क्रिकेटमधली वीरेंद्र सेहवाग असं म्हटलं जातं. तिनं दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सेहवागच्या स्टाइलमध्ये फलंदाजी करत संपूर्ण दिवस दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ठेवलं.
 
त्यामुळं महिला क्रिकेटमध्ये कसोटीतील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम तिच्या नावावर कोरला गेला आहे. तिनं अवघ्या 194 चेंडूंमध्ये द्विशतक केलं.
 
यापूर्वी सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम अॅनाबेल सदरलँडच्या नावावर होता. तिनंही याचवर्षी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 248 चेंडूंमध्ये द्विशकत केलं होतं.
 
महिला क्रिकेटमध्ये एका दिवसात द्विशतक करणारी शेफाली पहिली बॅटर बनली आहे. शेफालीनं 197 चेंडूंमध्ये 205 धावा केल्या.
 
शेफाली महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाकडंही आगेकूच करत होती.
 
पण जेमिमाबरोबर धाव घेताना झालेल्या गोंधळात ती धावबाद झाली. त्यामुळं या विक्रमासाठी तिला 38 धावा कमी पडल्या.
 
सध्या हा विक्रम पाकिस्तानच्या किरण बलूच यांच्या नावावर असून तो 242 धावांचा आहे. तिनं वेस्ट इंडिजच्या विरोधात 2004 मध्ये हा विक्रम केला होता.
 
सेहवागची स्टाइल दिसली
माजी परराष्ट्र सचिव नटवर सिंह यांनी वीरेंद्र सेहवागवरील एका पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान त्याच्या चौकार, षटकार आणि द्विशतक, त्रिशतक याबाबत बोलताना 'ऐसा एक जाट ही कर सकता है' असं म्हटलं होतं.
 
तीच स्टाइल शेफाली वर्माच्या फलंदाजीतही पाहायला मिळाली.
 
शेफाली द्विशतकाजवळ पोहोचत असताना दक्षिण आफ्रिकेनं ऑफ स्पिनर डेलमी टकर हिला चेंडू सोपवला.
 
शेफालीनं तिच्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचले आणि त्यानंतर एक धाव घेत द्विशतक पूर्ण केलं. त्यामुळं तिची सेहवागबरोबर तुलना केली जाते.
 
द्विशतक करणारी शेफाली भारताची दुसरी फलंदाज आहे.
 
यापूर्वी ही कामगिरी मिताली राजच्या नावावर होती. मितालीनं 22 वर्षांपूर्वी टांटनमध्ये इंग्लंडच्या विरोधात 407 चेंडूंमध्ये 214 धावा केल्या होत्या.
 
शेफालीनं या द्विशतकात 23 चौकार आणि आठ षटकार लगावले.
 
आवाक्यात आलेला प्रत्येक चेंडू टोलवला
महिला कसोटी क्रिकेटमधील भारताच्या बॅटरच्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाबाबत माहिती होतं का, असंही शेफाली वर्माला द्विशतकानंतर विचारण्यात आलं.
 
त्यावर शेफाली म्हणाली की, 'माहिती असतं तर त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न केला असता', असं म्हणून ती मोठ्यानं हसू लागली.
 
शेफाली म्हणाली की, 'माझ्या पल्ल्यात जो चेंडू येत होता, तो मी फटकावत होते.'
 
तसंच स्मृती दीनं दिलेला सल्लाही कामी आला असं ती म्हणाली. 'फटका मारायची इच्छा झाली तर फकटेबाजी कर', असं तिनं सांगितलं होतं.
 
स्मृती मंधाना म्हणाली की, दुसऱ्या बाजून शेफालीची ही उत्कृष्ट खेळी पाहून खूप मजा आली.
 
शेफाली महिला कसोटीत सर्वाधिक षटकार लावणारी पहिली बॅटर बनली.
 
मंधानाचेही मोठे योगदान
भारतीय महिला टीमनं एका दिवसांत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात स्मृती मंधानाचंही मोठं योगदान होतं.
 
तिनं 161 चेंडूंमध्ये 27 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 149 धावा केल्या. तिनं शेफाली वर्माच्या साथीनं सलामीच्या विकेटसाठी 292 धावा केल्या.
 
ही महिला कसोटीतील सर्वाधिक धावांची सलामीची भागिदारी होती.
 
याआधीची सर्वात मोठी सलामीची भागिदारी किरण बलूच आणि साजिदा शाह यांच्या नावावर होती. त्यांनी सलामीला खेळत 242 धावा केल्या होत्या.
 
पाकिस्तानच्या या जोडीनं 2004 मध्ये वेस्ट इंडिजच्या विरोधात ही कामगिरी केली होती. या खेळीदरम्यान बलूचनं सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रमही केला होता.
 
मंधानाची फलंदाजीची शैली पाहता, ती वन डेमध्ये केलेली कामगिरीच पुढं नेत असावी, असं वाटत होतं.
 
वन डे सिरीजमध्ये तिनं दोन शतकांसह एका मालिकेत 343 धावांचा नवा विक्रम रचला होता.
 
महिला कसोटीत प्रथमच एका दिवसांत 500 धावा
महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका दिवसांत 500 धावांचा टप्पा ओलांडणारा भारतीय संघ पहिलाच आहे.
 
यापूर्वी 1935 मध्ये क्राइस्टचर्च टेस्टमध्ये एका दिवसांत 475 धावांचा विक्रम बनला होता.
 
या कसोटीत न्यूझीलंडचा डाव 44 धावावंर आटोपल्यानंतर इंग्लंडनं 4 विकेट गमावत 431 धावा केल्या होत्या.
 
शेफाली वर्मा आणि मंधानानं चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीवर सावधपणे खेळाची सुरुवात केली होती.
 
त्यामुळं फुलटॉस चेंडूंवरही तिनं चौकार मारले नाही. त्यामुळंच सकाळच्या सत्रात फक्त 130 धावा बनल्या होत्या.
 
भारतीय सलामीवीरांनी दुपारच्या सत्रात गीअर चेंज करत अत्यंत वेगानं धावा केल्या.
 
यादरम्यान भारतीय जोडीनं 32 ओव्हरमध्ये 204 धावा ठोकल्या.
 
शेवटच्या सत्रातही तिनं धावांचा वेग कायम ठेवला आणि नवीन विक्रम रचला.
 
टी-20 क्रिकेटचा परिणाम
महिला क्रिकेट असो वा पुरुष क्रिकेट दोन्हींमध्ये बॅटर आता नव्या प्रकारची फलंदाजी करताना दिसत आहेत.
 
मैदानावर जम बसण्याची वाट न पाहता, ते वेगानं धावा करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
 
क्रिकेटच्या या शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळण्याच्या स्टाइलचा परिणाम आता कसोटी क्रिकेटमध्येही पाहायला मिळत आहे.
 
त्यामुळंच दोन दशकांपूर्वी याठिकाण कसोटींमध्ये पहिल्या सत्रात 100-120 धावाच व्हायच्या. पण आता त्यात वाढ झाली आहे.
 
बॅटरच्या विचार करण्याची पद्धत बदलल्यामुळं वेगानं धावा होत असल्यामुळं आता कसोटी निकालीही निघत आहेत.
 
एवढंच नाही तर आता कसोटी सामने पाच ऐवजी चार दिवसांमध्ये संपू लागले आहेत.
 
भारतीय महिला टीमने केलेला विक्रमही हाच विचार पुढं नेणारा आहे.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भटक्या कुत्र्यांनीं लचके तोडत सहा वर्षाच्या मुलाचा घेतला जीव