फिरकीपटूंनी केलेल्या शानदार गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी केलेल्या तुफानी फलंदाजीच्या मदतीने भारताने पहिल्या एकदिवशीय सामन्यात श्रीलंकेवर 9 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. धवनने फक्त 90 चेंडूत 20 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 132 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीनेही 10 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 70 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. भारताने फक्त 28.3 षटकांत श्रीलंकेने दिलेले 217 धावांचे आव्हान पार केले.
रांगिरी आंतरराष्ट्रीय मैदानावर रविवारी झालेल्या 5 एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत श्रीलंकेला 43.2 षटकांत 216 धावांवर रोखले. त्यानंतर 217 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सावध सुरूवात केली. मात्र, भारताची पहिली विकेट 23 धावांवर गमाविली. सलामीवीर रोहित शर्मा 4 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर फॉर्मात असलेल्या शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी तुफानी फलंदाजी करत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर आणि विराट यांनी श्रीलंकेला एकही यश मिळू दिले नाही. शिखर धवनने नाबाद 132 आणि विराट कोहली यांनी नाबाद 82 धावांची खेळी केली.