Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शुबमन गिलचं ट्वेन्टी20 प्रकारातही शतक; तिन्ही प्रकारात शतक करणारा पाचवा भारतीय

शुबमन गिलचं ट्वेन्टी20 प्रकारातही शतक; तिन्ही प्रकारात शतक करणारा पाचवा भारतीय
, बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (23:50 IST)
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच वनडेत द्विशतकी खेळी साकारणाऱ्या शुबमन गिलने अहमदाबाद इथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी20 लढतीत शतकी खेळी साकारलीय.
23 वर्षीय शुबमनचं ट्वेन्टी20 प्रकारातलं हे पहिलंच शतक आहे. केवळ सहाव्या ट्वेन्टी20 सामन्यात शुबमनने शतकाला गवसणी घातली आहे.
 
टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारात शतक करणारा तो 21वा एकूण तर पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
 
याआधी सुरेश रैना, रोहित शर्मा, के.एल.राहुल, विराट कोहली यांनी तिन्ही प्रकारात शतक साजरं केलं आहे.
 
लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर चौकार खेचत शुबमनने 54 चेंडूतच शतक पूर्ण केलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौकार, षटकारांची लयलूट करत शुबमनने क्रिकेट चाहत्यांना पर्वणीच दिली.
 
शुबमनने 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 126 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने 234 धावांचा डोंगर उभारला. तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.
लखनौ इथे झालेल्या दुसऱ्या लढतीत एकही षटकार पाहायला मिळाला नव्हता. अहमदाबाद इथे मात्र भारतीय फलंदाजांनी गोलंदाजीची अक्षरक्ष: कत्तल केली.
 
इशान किशन केवळ एक धाव करुन तंबूत परतला. मात्र त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या राहुल त्रिपाठीने 22 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांची खैरात करत 44 धावांची वेगवान खेळी केली. इश सोधीने राहुलला बाद केलं.
 
राहुल बाद झाल्यानंतर शुबमनने सूत्रं हातात घेतली. न्यूझीलंडच्या फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांचा समाचार घेत शुबमनने सामन्याचं चित्रच पालटवलं.
 
कर्णधार हार्दिक पंड्याने शुबमनला चांगली साथ दिली. 17 चेंडूत 30 धावांची खेळी केली. गिल-पंड्या जोडीने 40 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली.
 
18 जानेवारी रोजी वनडेत द्विशतक झळकावणारा शुबमन सगळ्यांत लहान वयाचा फलंदाज ठरला होता. शुबमनने 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावांची मॅरेथॉन खेळी केली.
शुबमनने साकारलेली 126 धावांची खेळी ही ट्वेन्टी20 प्रकारातली भारतासाठीची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
 
ट्वेन्टी20 प्रकारात भारतासाठी शतक झळकावणारा शुबमन सातवा फलंदाज आहे. शुबमनआधी रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, के.एल.राहुल, दीपक हुड्डा, सुरेश रैना यांनी ट्वेन्टी20 प्रकारात भारतासाठी शतक झळकावलं आहे.
 
कोण आहे शुबमन गिल?
प्रतिभेला अविरत मेहनतीची जोड दिली तर काय होऊ शकतं याचा वस्तुपाठ शुबमन गिलच्या रुपात टीम इंडियाच्या चाहत्यांसमोर आहे.
 
2020 मध्ये बॉक्सिंग डे दिवशी शुबमनने भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं होतं. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत शुभमनने प्रयत्नपूर्वक ही संधी मिळवली आहे.
 
2018 मध्ये U19 वर्ल्डकप स्पर्धेत शुबमनने सर्वाधिक रन्स करत ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला होता.
 
सरळ बॅट, डोकं स्थिर स्थितीत, हाय बॅकलिफ्टसह उंचावर जाणारा कोपरा, उसळत्या चेंडूवर पकड मिळवण्याची खुबी यामुळे शुबमन ज्या संघाकडून खेळतो तिथले प्रशिक्षक, कोचिंग स्टाफ, वरिष्ठ खेळाडू यांचं लक्ष वेधून घेतो.
2018-19 रणजी हंगामात शुबमनने 9 डावात 104च्या सरासरीने 728 धावांची लूट केली. चांगल्या संघांविरुद्धची ही कामगिरी लक्षात घेऊन भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला संघात समाविष्ट करुन घेतलं.
 
टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने शुबमनच्या खेळाचं कौतुक केलं होतं. 2019 वर्ल्ड कपनंतर या मुलाला भारतीय संघात घ्यायला हवं असंही युवराज म्हणाला होता.
 
वर्षभरात शुबमनचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न साकार झालं. न्यूझीलंड दौऱ्यात शुबमनने वनडे पदार्पण केलं.
 
त्याच वर्षी शुबमनने भारतीय अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात धावांची टांकसाळ उघडली आणि मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला. या दौऱ्यात त्याने 204 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती.
 
मायदेशी परतल्यानंतर भारतीय अ संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मुख्य बॅट्समन आणि कर्णधारपद अशा दोन्ही भूमिका शुभमन गिल याने समर्थपणे सांभाळल्या होत्या.
 
2018 मध्ये आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 1.8 कोटी रुपये खर्चून शुभमनला संघात समाविष्ट केलं.
 
ओपनर आणि भविष्यातील कॅप्टन म्हणून केकेआर संघ शुभमनकडे पाहतो आहे. शुभमननेही सातत्याने चांगल्या खेळी करत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
 
2019 हंगामात शुभमनची इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर म्हणून निवड झाली. काही महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामात शुभमनने 440 रन्स केल्या.
 
सध्या शुबमन गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. तब्बल 8 कोटी रुपये खर्चून गुजरातने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. शुबमनने संघाचा विश्वास सार्थ ठरवत दमदार कामगिरी केली होती.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UNSC: संयुक्त राष्ट्रांने ISIL ला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले