अनुराग ठाकुर यांची हकाटपट्टी केल्यापासून रिक्त असलेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर माजी कॅग विनोद राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राय यांची नियुक्ती केली असून, इतिहासकार रामचंद्र गुहा आणि विक्रम लिमये यांची प्रशासकीय पॅनलवर नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी यांनाही प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्यात आले आहे. मात्र बीसीसीआयमधील नियुक्त्या करताना क्रीडामंत्रालयाच्या सचिवांना प्रशासकीय पॅनलमध्ये स्थान देण्याची केंद्र सरकारने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याआधी 24 जानेवारी रोजी या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान बीसीसीआयने सुचवलेली सर्व 9 नावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील.