नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघाने ५0 षटकांत ६ बाद २६९ धावा केल्या. भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्यांचीच दाणादाण उडाली. पहिल्याच षटकात सलामीवीर मार्टिन गुप्तीलचा उमेश यादवने त्रिफळा उडवला. यानंतर ठराविक अंतराने पाहुण्यांचे फलंदाज बाद होत गेले. टॉम लॅथम (१९), कर्णधार केन विल्यमसन (२७) आणि रॉस टेलर (१९) या तिघांव्यतिरिक्त अन्य फलंदाजांनी केवळ हजेरी लावून परतण्यात धन्यता मानली. पाहुण्यांचे पाच फलंदाज तर भोपळाही फोडू शकले नाहीत.
तत्पूर्वी, मालिका जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या बाजूने मिळवला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना जिंकण्यासाठी भारताने संघात दोन बदल केले. धवल कुलकर्णीला वगळून त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघात परतला, तर हार्दिक पंड्याऐवजी फिरकी गोलंदाज जयंत यादवने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
गेल्या चार सामन्यांतील भारताच्या सलामीच्या जोडीची कामगिरी चांगली झालेली नाही. शनिवारी मात्र अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने ५६ चेंडूंत भारताला ४0 धावांची सलामी दिली. अजिंक्य रहाणे केवळ २0 धावांवर निशमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. या मालिकेत अपयशी ठरून अनेकांच्या रोषास पात्र ठरलेल्या रोहित शर्माला अखेरच्या सामन्यात सूर गवसला.
सुरुवातीस सावध पवित्रा घेणार्या रोहित शर्माने जम बसताच आपल्या भात्यातील फटक्यांचा वापर करायला सुरुवात केली. संघाचा उपकर्णधार विराट कोहलीसह त्याची जोडी चांगलीच जमली. या दोघांनी ७६ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी करून भारताचे शतक झळकावले. रोहित शर्माने लेग स्पिनर ईश सोधीची गोलंदाजी चांगलीच चोपून काढली. त्याने तीन उत्तुंग षटकारही ठोकले. ही जोडी जमली आहे, असे वाटत असतानाच रोहित शर्माला ट्रेण्ट बोल्टने ७0 धावांवर झेलबाद केले. मुंबईकर रोहित शर्माने ६५ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
या मालिकेत दोनदा नाबाद राहून टीम इंडियाला विजय मिळवून देणार्या विराट कोहलीने आपल्या कामगिरीत सातत्य राखत ७६ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ६५ धावा केल्या. धोनीसह कोहलीने न्यूझीलंड गोलंदाजांवर चांगलीच हुकूमत गाजवली. कर्णधार -उपकर्णधाराने ९0 चेंडूंत ७१ धावांची भर घातली. धोनीने आक्रमक पवित्रा घेत चार चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ४१ धावा केल्या.
या दोघांनी टीम इंडियाला दोनशेच्या घरात आणून ठेवल्यावर मिचेल सँटनरचा चेंडू स्विप करण्याच्या प्रयत्नात धोनी पायचित झाला. मनीष पांडेला भोपळाही फोडता आला नाही. संघाची धावसंख्या २२0 अशी असताना विराट कोहलीने सोधीच्या गोलंदाजीवर गपटीलकडे झेल दिला. कोहलीने ७६ चेंडूंत २ चौकार आणि एक षटकार ठोकून ६५ धावा केल्या. केदार जाधवने ३७ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद ३९ धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने २४ धावा करताना सहाव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारीही करून चांगली साथ दिली. भारताने ५0 षटकांत सहा खेळाडू गमावून २६९ धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे ट्रेण्ट बोल्ट आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले.