इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे वॉनला अॅशेस मालिका अर्ध्यावरच सोडून ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडला परतावे लागले. वॉन यांनी स्पष्ट केले की त्यांचे वडील ग्राहम वॉन कर्करोगाशी झुंजत होते आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत असणे त्यांना अत्यंत महत्त्वाचे वाटत होते.
सोमवारी, मायकेल वॉनने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपले दुःख व्यक्त केले. त्याने लिहिले, "डोळ्यात अश्रू आणत, मी माझा हिरो, माझा मार्गदर्शक, माझा सर्वात चांगला मित्र आणि एक अद्भुत वडील गमावले आहेत." वॉनने असेही म्हटले की, त्याच्या शेवटच्या 30 तासांमध्ये तो त्याच्या वडिलांसोबत होता हे त्याला भाग्यवान वाटले. त्याने त्याच्या वडिलांच्या आठवणीत एक लांब आणि भावनिक संदेश लिहिला, ज्याने चाहत्यांना आणि क्रिकेट जगाला भावूक केले.
मायकेल वॉनच्या वडिलांच्या निधनाबद्दल अनेक माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. वसीम जाफर, केविन पीटरसन आणि जेम्स फॉकनर यासारख्या दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियावर मायकेल वॉन आणि त्याच्या कुटुंबाला शोक व्यक्त केला.
मायकेल वॉन अॅशेस मालिकेसाठी प्रसारण संघाचा भाग होता आणि तो ऑस्ट्रेलियात होता. तथापि, त्याच्या वडिलांची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्याने ताबडतोब इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडे अॅशेस मालिकेत सध्या 3-0 अशी निर्विवाद आघाडी आहे, अजून दोन सामने बाकी आहेत.
मायकेल वॉनने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत त्याने 82कसोटी सामने आणि 86एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2005च्या अॅशेसमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला, जो अजूनही क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय मालिकांपैकी एक मानला जातो. वॉनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 7728 धावा केल्या.