टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची प्रसिद्धी त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या बघून कळून येते. विराटचे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 13 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असून तो एका पोस्टमधून कमाई करणारा सर्वात श्रीमंत भारतीय आहे.
Hopper HQ Instagram Richlist 2021 मध्ये याबद्दल खुलासा झाला आहे. जाहीर केलेल्या यादीनुसार विराट कोहलीची एका प्रायोजित इन्स्टाग्राम पोस्टमधून 5 कोटींची कमाई होते.
उल्लेखनीय आहे की दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीला एका पोस्टमधून 1.35 कोटी मिळत होते. अर्थातच दोन वर्षात त्याची या प्लॅटफॉमवरुन होणारी कमाई तिप्पट झाली आहे. या यादीमधील जगातील टॉप 20 व्यक्तींमध्ये विराट हा एकमेव भारतीय आहे. विराट या यादीत 19 व्या क्रमांकावर आहे.
इन्स्टाग्राम रिचलिस्ट 2021 नुसार या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. त्याला एका प्रायोजित पोस्टमधून 11 कोटी 90 लाख रुपये मिळतात. रोनाल्डोनं नुकताच 30 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण केला असून हा टप्पा पूर्ण करणारा तो जगातील पहिला व्यक्ती आहे.
या यादीत WWE स्टार ड्वेन जॉन्सन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे 24 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट चौथ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डो, मेस्सी आणि नेयमार या फुटबॉलपटूनंतर क्रिकेटपटू विराटचा नंबर आहे.
मेस्सीला एका प्रायोजित पोस्टमधून 8 कोटी 16 लाख तर नेयमारला 6 कोटी 10 लाख रुपये मिळतात. या यादीमधील टॉप 100 जणांच्या लिस्टमध्ये विराट कोहलीसह अभिनेत्री प्रियंका चोप्राचा समावेश आहे. प्रियंका या यादीत 27 व्या क्रमांकावर असून तिच्या एका पोस्टची किंमत 3 कोटी आहे.