भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागप्रमाणेच त्याचा मुलगा आर्यवीरही आता वडिलांच्या मार्गावर निघाला आहे. त्याला वीरूप्रमाणे वेगवान धावा करायला आवडतात. गुरुवारी मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्याने हे दाखवून दिले. दिल्लीकडून खेळताना या युवा फलंदाजाने द्विशतक झळकावले. त्याने 229 चेंडूत 200 धावांची खेळी खेळली. यादरम्यान आर्यवीरने 34 चौकार आणि दोन षटकार मारले.
नाणेफेक जिंकल्यानंतर मेघालय प्रथम फलंदाजीला आला आणि पहिल्या डावात मेघालयचा संघ 260 धावांवर सर्वबाद झाला. दिल्लीकडून उद्धव मोहनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरादाखल 16 वर्षीय आर्यवीरच्या बळावर दिल्लीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दोन बाद 468 धावा केल्या आणि 208 धावांची आघाडी घेतली. त्याच्याशिवाय संघाचा दुसरा सलामीवीर अर्णव एस बग्गा यानेही शतक झळकावले.
दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आर्यवीर 200* आणि धन्या नाकारा 98* धावा करून नाबाद राहिला.आर्यवीर सेहवागने ऑक्टोबरमध्ये विनू मांकड ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. यादरम्यान त्याने मणिपूरविरुद्ध 49 धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला.