Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली, बीसीसीआय यांच्यात नक्की काय सुरू आहे?

विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली, बीसीसीआय यांच्यात नक्की काय सुरू आहे?
, गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (09:13 IST)
कोहलीचा आरसीबी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय
विराट कोहलीने सप्टेंबर महिन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
 
हा हंगाम कर्णधार म्हणून शेवटचा असेल, पण खेळाडू म्हणून आरसीबीसाठी मी सदैव उपलब्ध असेल असं कोहलीने स्पष्ट केलं.
 
2013 मध्ये कोहलीने डॅनियल व्हेटोरीकडून आरसीबीचं सूत्रं स्वीकारली होती. कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. फलंदाज म्हणून कोहलीचा आरसीबीसाठी खेळतानाची कामगिरी अद्भुत अशी आहे.
 
कोहलीचा भारतीय ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय
ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर भारताच्या ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने जाहीर केला. टेस्ट, वनडे, ट्वेन्टी20 असे तिन्ही प्रकार खेळत असल्याने वर्कलोड मॅनेजमेंट विचार करणं आवश्यक असल्याचं सांगत त्याने हा निर्णय जाहीर केला.
 
तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री, उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशी बोलूनच हा निर्णय घेतल्याचं कोहलीने सांगितलं. ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडत असलो तरी टेस्ट आणि वनडेत भारताचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे असंही कोहलीने स्पष्ट केलं होतं.
 
ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचं आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात
युएईत झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघावर प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. कोहलीच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावण्याची संधी दुरावली.
2019 मध्ये 50 ओव्हरच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं होतं. कोहली वर्ल्डकपनंतर ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार होता. त्यामुळे कर्णधाराला विजयी निरोप देण्याची संधी होती मात्र भारतीय संघाची कामगिरी सर्वसाधारण झाली.
 
रोहित शर्माचं ट्वेन्टी20 संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण
न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेत रोहित शर्माने भारतीय ट्वेन्टी20 संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण केलं. रवी शास्त्री यांच्याऐवजी राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला. भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकली.
कोहलीला पुनर्विचार करण्यास सांगितलं- सौरव गांगुली
ट्वेन्टी20 विश्वचषकानंतर भारताच्या ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार कर असं सांगितल्याचं माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं.
 
ओमिक्रॉनच्या भीतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बदल
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बदल करण्यात आला. भारतीय संघ आता या मालिकेत 3 टेस्ट आणि 3 वनडे खेळणार आहे. ट्वेन्टी20 मालिका नंतर आयोजित करण्यात येईल.
 
आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या टेस्ट संघाची घोषणा; वनडे कर्णधारपदावरून कोहलीची उचलबांगडी
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी संघाची घोषणा करण्यात आली. टेस्ट टीमचं कर्णधारपद विराट कोहलीकडे आहे.
 
उपकर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माची निवड करण्यात आली. संघ घोषित करतानाच प्रसिद्धी पत्रकाच्या शेवटच्या ओळीत वनडेत विराट कोहलीऐवजी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल असं नमूद करण्यात आलं.
95 वनडेत कोहलीने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. यापैकी 67 सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
 
ही आकडेवारी दमदार असली तरी कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेचं जेतेपद पटकावता आलेलं नाही हेही खरं आहे.
 
वनडे आणि ट्वेन्टी20साठी वेगवेगळे कर्णधार नकोत-गांगुली
वनडे आणि ट्वेन्टी20 अशा शॉर्ट फॉरमॅटसाठी दोन स्वतंत्र कर्णधार नकोत असं सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं. म्हणूनच ट्वेन्टी20 संघाप्रमाणे वनडे संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे असं गांगुली यांनी सांगितलं.
 
आफ्रिका दौऱ्यातील टेस्टमधून रोहितची माघार
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्टसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती झालेला रोहित शर्मा मुंबईत सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला.
 
मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे रोहित आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. दुखापतग्रस्त झाल्याने टेस्ट सीरिजमध्ये कोहलीच्या नेतृत्वात रोहित शर्मा खेळणार नाही हे स्पष्ट झालं. मात्र वनडे सीरिजपर्य़ंत रोहित फिट होण्याची आशा आहे.
 
विराटने मागितला सुट्टीचा ब्रेक?
आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेदरम्यान विराटने कौटुंबिक कारणास्तव वनडे मालिकेतून विश्रांती घेतल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. यासंदर्भात विराट किंवा बीसीसीआयने अधिकृतरीत्या कोणतंही भाष्य केलं नाही.
विराटने वनडे सीरिजमधून ब्रेक घेतला तर तो रोहितच्या नेतृत्वात खेळताना दिसणार नाही. टेस्टमध्ये रोहित नाही, वनडेत कोहली नाही म्हणजे हे दोघं एकमेकांच्या नेतृत्वात खेळताना दिसणार नाहीत असं चित्र रंगवण्यात आलं.
 
मी सुट्टी मागितलीच नव्हती- कोहली
"मी सदैव संघासाठी उपलब्ध आहे. माझ्या सुट्टीच्या ब्रेकबद्दल जे लोक लिहित आहेत त्यांना विचारायला हवं. मी नेहमीच या सीरिजसाठी उपलब्ध होतो. मला सुट्टी किंवा विश्रांती हवी आहे असं मी कधीच सांगितलं नाही, विचारलं नाही. सूत्रांच्या आधारे बातमी लिहिणारे अशा गोष्टी लिहित आहेत, ते विश्वासार्ह नाहीत", असं कोहलीने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
 
गुरुवारी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. आफ्रिका दौऱ्यातील वनडे सीरिजसाठी मी नेहमीच उपलब्ध होतो, आहे. मला खेळायचं आहे असं कोहलीने सांगितलं.
 
वनडे कर्णधारपदावरून बाजूला केल्याचं निवडसमिती बैठकीच्या दीड तास आधी कळलं- कोहली
"दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी निवडसमितीची बैठक झाली. त्याच्या दीड तास आधी मला वनडे कर्णधारपदासंदर्भात सांगण्यात आलं", असं कोहली म्हणाला.
 
"16 सप्टेंबर रोजी मी ट्वेन्टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं. 8 डिसेंबरला आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी संघाची निवड झाली. या काळात वनडे कर्णधारपदासंदर्भात कोणतंही बोलणं झालं नाही.
 
मी ट्वेन्टी20 कर्णधारपद सोडतोय हा निर्णय चांगल्या पद्धतीने स्वीकारण्यात आला. मी कर्णधारपद सोडण्याचा पुनर्विचार करावा असं मला कोणीही म्हणालं नाही", असं कोहलीने सांगितलं.
 
"8 डिसेंबरला निवडसमितीची बैठक झाली त्यावेळी दीड तास आधी आमचं बोलणं झालं. टेस्ट संघासंदर्भात आमचं बोलणं होऊन निर्णय झाला. कॉल संपताना निवडसमितीने मी वनडे संघाच्या कर्णधारपदी नसेल असं सांगितलं. मी ओके म्हटलं. त्यानंतर आमचं थोडं बोलणं झालं. त्याआधी या निर्णयासंदर्भात काहीही बोलणं झालं नाही".
 
रोहितबरोबर कोणतेही मतभेद नाहीत, सांगून कंटाळलो- कोहली
रोहित शर्मासोबत आपले कोणतेही मतभेद नसून गेली दोन वर्ष मी याबद्दल स्पष्टीकरण देत आहे असं कोहलीने सांगितलं. मला याचा कंटाळा आला आहे.
 
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी कोहलीच्या ब्रेकसंदर्भात आणि कथित मतभेदासंदर्भात ट्वीट केलं होतं. "वनडे सीरिजसाठी उपलब्ध नसल्याचं विराट कोहलीने म्हटलंय. रोहित शर्मा पुढच्या टेस्ट मॅचेस खेळणार नाही. खेळातून ब्रेक घेणं नुकसान करणारं नसलं तरी असा निर्णय वेळ पाहून घ्यायला हवा. यामुळे मतभेदाच्या चर्चांना अजून जोर येईल", असं अझर म्हणाले होते.
 
रोहित आणि विराट एकमेकांबरोबर खेळत नाहीत असं माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी म्हटलं होतं. "खेळ सर्वात मोठा असतो आणि खेळापेक्षा मोठं कोणीही नाही. कोणत्या खेळात आणि कोणत्या खेळाडूंमध्ये काय सुरू आहे, याविषयी मला माहिती नाही. याविषयी संबंधित असोसिएशनच सांगू शकतील", असं बीसीसीआयचे माजी पदाधिकारी आणि विद्यमान क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रकांत पाटील म्हणतात तशी, शिवाजी महाराजांनी खरंच हिंदुत्वाची व्होटबॅंक तयार केली का?