नॅट सिव्हर ब्रंटच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर, मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा आठ धावांनी पराभव करून अंतिम सामना जिंकला. यासह, मुंबईने पुन्हा एकदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकण्यात यश मिळवले. शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीचा विजेतेपदाचा सामना खेळवण्यात आला.
या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, मुंबईने 20 षटकांत सात गडी गमावून149धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ 141 धावा करता आल्या. अशाप्रकारे मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
150 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्ली मैदानात उतरली पण त्यांना फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. संघाने फक्त 44 धावांमध्ये चार विकेट गमावल्या. कर्णधार मेग लॅनिंग 13 धावा काढून बाद झाली आणि शेफाली वर्मा फक्त चार धावा काढून बाद झाली. यानंतर, जेस जोनासनला अमेलिया केरच्या चेंडूवर यास्तिका भाटियाने झेलबाद केले. तिला फक्त 13 धावा करता आल्या. दिल्लीकडून मारिजेन कॅपने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली.
तिच्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 30 धावा केल्या. दरम्यान, अॅनाबेल सदरलँडने दोन, सारा ब्राइसने पाच आणि मिन्नू मनीने चार धावा केल्या. निक्की प्रसाद 25 आणि श्री चरणी तीन धावांवर नाबाद राहिले. मुंबईकडून नॅट सिव्हर ब्रंटने तीन तर अमेलिया करने दोन विकेट घेतल्या. दरम्यान, शबनम इस्माईल, हेली मॅथ्यूज आणि सईका इशाक यांना प्रत्येकी एक यश मिळाले.