भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली होती
यशस्वी जैस्वालने 277 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आणि एकट्याने भारताची धावसंख्या 400 धावांच्या जवळ नेली. कसोटीत भारतासाठी द्विशतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे.
त्याच्या आधी विनोद कांबळीने वयाच्या 21व्या वर्षी दोन द्विशतके झळकावली होती. त्याचवेळी सुनील गावस्कर यांनी वयाच्या २१व्या वर्षी द्विशतक झळकावले होते. आता यशस्वीने वयाच्या 22 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.
उत्तर प्रदेशातल्या भदोहीचा हा मुलगा. मुंबईत येऊन मैदानावरच्या तंबूत राहून, पाणीपुरी विकून परिस्थितीशी संघर्ष करत धावांच्या राशी ओततोय.
2015 मध्ये मुंबईतल्या प्रसिद्ध गाईल्स शिल्ड स्पर्धेत यशस्वीने नाबाद 319 धावांची खेळी केली. याच सामन्यात त्याने 13 विकेट्सही घेतल्या.
2019मध्ये विजय हजारे स्पर्धेत झारखंडविरुद्ध यशस्वीने 154 चेंडूत 203 धावांची आक्रमक खेळी साकारली. 17व्या वर्षी द्विशतक झळकावत स्पर्धेतला सगळ्यात कमी वयाचा द्विशतकवीर ठरला.
2020 मध्ये झालेल्या आयसीसी U19 स्पर्धेत यशस्वीने सर्वाधिक धावा (400) केल्या होत्या. यशस्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. याच वर्षी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने यशस्वीला ताफ्यात समाविष्ट केलं. 2022 मध्ये राजस्थानने 4 कोटी रुपयांच्या मानधनासह यशस्वीला संघात रिटेन केलं.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केवळ 13 डावात यशस्वीने 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. यशस्वीने अमोल मुझुमदार आणि रुसी मोदी यांच्या विक्रमाची बरोबरी केली. यशस्वीने अवघ्या 7 सामन्यात 91च्या सरासरीने खेळताना हा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे.
गेल्या वर्षीही यशस्वी जैस्वालने राजस्थान रॉयल्स संघासाठी चांगली कामगिरी करून त्यांना अंतिम फेरीत पोहोचवण्यात मदत केली होती.