Article Marathi Cricket News %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a5%a7%e0%a5%ae %e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%b5 111031800003_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विंडीजचा १८ धावांनी पराभव!

विंडीजचा १८ धावांनी पराभव
ND
येथील चिदम्बरम स्टेडियमवर आज विश्वचषक स्पर्धेच्या 'ब' गटातील एका महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करीत २४३ धावांचा बचाव करताना वेस्ट इंडिजला २२५ धावांत गुंडाळून संघाला १८ धावांनी विजय मिळवून दिला. विंडीजच्या चार फलंदाजांना तंबूची वाट दाखविणार्‍या जेम्स ट्रेडवेलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार ऍन्ड्र्यू स्ट्रॉस आणि मॅट प्रायरने सावध सुरुवात करताना ४८ धावांची भागीदारी केल्यानंतर आंद्रे रसेलने प्रायरला २१ धावांवर बाद करीत विंडीजला पहिले यश मिळवून दिले. थोड्याच वेळाने इंग्लंडची धावसंख्या ७९ असताना त्याने स्ट्रॉसचा ३१ धावांवर त्रिफळा उडवून संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर जोनाथन ट्रॉट आणि इयान बेलने सावध पवित्रा घेत संघाची धावसंख्या वाढविण्यास सुरुवात केली. हे दोघे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत करतील, असे वाटले; परंतु त्यांनी तिसर्‍या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केल्यानंतर देवेंद्र बिशूने ट्रॉटला ४७ धावांवर बाद करून इंग्लंडच्या समस्येत आणखीच भर टाकली. इंग्लंडच्या धावसंख्येत १३ धावांची भर पडल्यानंतर केमर रोचने बेलला २७ धावांवर व त्याच्या पुढच्याच षटकात बिशूने मोर्गनला ०७ धावांवर बाद करून इंग्लंडची अवस्था पाच बाद १३४, अशी दयनीय केली. इंग्लंडच्या धावसंख्येत १७ धावांची भर पडल्यानंतर रवि बोपाराही रसेलच्या चेंडूवर ०४ धावा काढून परतल्याने इंग्लंड २०० धावाही काढतो की नाही, अशी शंका वाटू लागली; परंतु जेम्स ट्रेडवेलने ल्युक राईटला चांगली साथ देताना सातव्या गड्यासाठी ४१ धावांची भागीदारी केली. दुर्दैवाने ट्रेडवेल ०९ धावांवर धावबाद झाला.

त्यानंतर आलेल्या टिम ब्रेसनननेही राईटला चांगली साथ दिली. या दोघांनी संघाची धावसंख्या २१६वर पोहोचविल्यानंतर बिशूने राईटला ४४ धावांवर बाद केले. त्यानंतर ब्रेसननने आक्रमक खेळ करताना ग्रॅमी स्वान ०८ आणि ख्रिस ट्रेमलेट ०३च्या साथीने संघाला २४३ धावांपर्यंत पोहोचविले. रसेलने स्वानला ०८ धावांवर बाद केले, तर रोचने ट्रेमलेटला ०३ धावांवर बाद करून ४८.४ षटकांत इंग्लंडचा डाव २४३ धावांवर संपुष्टात आणला. ब्रेसनन २० धावांवर नाबाद राहिला. लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या विंडीजने धडाकेबाज सुरुवात करताना केवळ ४.५ षटकांतच संघाचे अर्धशतक पूर्ण केले; परंतु विंडीजच्या ५८ धावा झाल्या असताना जेम्स ट्रेडवेलने केवळ २१ चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा काढणार्‍या ख्रिस गेलला पायचीत केले आणि विंडीजच्या फलंदाजांचे 'तू चल मी येतो' सुरू झाले. थोड्याच वेळाने ट्रेडवेलने डेव्हन स्मिथला १० धावांवर बाद केले. त्यानंतरही कर्णधार डेरेन सामीने आक्रमकच खेळ केला; परंतु संघाच्या ९१ धावा झाल्या असताना ट्रेडवेलने स्मिथ बाद झाल्यानंतर आलेल्या डेरेन ब्राव्होला बाद केल्याने विंडीज संघ अडचणीत आला. ब्राव्होने संथ खेळ करीत १५ चेंडूत केवळ ०५ धावा काढल्या. डेरेन सामीचा आक्रमक खेळ पाहून स्ट्रॉसने गोलंदाजीत बदल करीत रवि बोपाराच्या हाती चेंडू सोपविला आणि त्याची ही चाल यशस्वी ठरली. बोपाराने पहिल्याच षटकांत २९ चेंडूत तीन षटकार आणि दोन चौकारांसह ४१ धावा काढणार्‍या सामीला, तर दुसर्‍या षटकात थॉमसला १० धावांवर बाद करून विंडीजची अवस्था पाच बाद ११८, अशी दयनीय केली. विंडीजच्या १५० धावा झाल्या असताना ग्रॅमी स्वानने घातक केरॉन पोलार्डला २४ धावांवर पायचीत केले. त्याचवेळी विंडीजचा पराभव दृष्टिपथास आला; परंतु आंद्रे रसेलने रामनरेश सारवानच्या साथीने दमदार खेळ करीत विंडीजच्या आशा पुनरुज्जीवित केल्या.

या दोघांनी सातव्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केल्यामुळे विंडीज हा सामना जिंकेल, असा विश्वास निर्माण झाला; परंतु रसेल ४९ धावा काढून बाद झाल्यानंतर रामनरेश सारवानसह उर्वरित तीन फलंदाज केवळ तीन धावांची भर घालून तंबूत परतल्याने विंडीजचा डाव ४४.४ षटकांत २२५ धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने हा सामना १८ धावांनी जिंकला. इंग्लंडकडून ट्रेडवेलने सर्वाधिक चार, ग्रॅमी स्वानने तीन, तर रवि बोपाराने एक गडी बाद केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi