Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपेक्षांचे ओझे

अपेक्षांचे ओझे
, शुक्रवार, 20 जून 2014 (14:12 IST)
सकाळी वृत्तपत्र वाचत होतो. राजकीय घडामोडींचे वाचन झाले, इतरही चोरी, अपघात अशा बातम्या नजरेखालून गेल्या. पण एक बातमी वाचताना मात्र मन हेलावून गेले. एका 24 वर्ष वयाच्या तरुण होतकरू मुलाने आपल्या घरी सिलिंग फॅनला दोरी अडकवून फाशी घेऊन आत्महत्या केली. अतिशय हुशार मुलगा, सर्व लेव्हलला चांगले मार्क घेऊन पास झालेला, परगावी शिकण्यासाठी अँडमिशन मिळालेली होती, जाण्याची सर्व तयारी झालेली आईनेही त्याच्या  सोबत देण्यासाठी त्याला आवडणारे सर्व गोडधोड पदार्थ तयार करून ठेवलेले होते. सर्वजण सकाळी हसत-खेळत एकत्र जेवले, वडील ऑफिसला गेले. आई काहीतरी कामानिमित्त बाहेर गेली आणि त्यानंतर ही घटना घडली. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात होते. अशा या हसर्‍या खेळकर घरातील हुशार मुलाने अचानक असा आत्मघातकी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली व एक हसत खेळत असलेले घर कायमचे कोलमडून पडले.

आजकाल एकत्र कुटुंबपद्धती जवळजवळ नष्टच झालेली पाहायला मिळते. अगदी काही अपवाद असतील. ‘हम दो हमारा एक’ अशी कुटुंबेच जास्त बघायला मिळतात. वन किंवा टू बीचके फ्लॅटच संस्कृतीत ही कुटुंबे राहताना दिसतात. आई-वडील सर्व्हिस करतात, मुले जन्मल्यापासून पाळणाघर अथवा इतर ठिकाणीच वाढतात त्यामुळे एकमेकांत अँटॅचमेंट अशी होत नाही. पुढे मुलगा व मुलगी मोठी झाली तरी एकत्र बसणे, चर्चा किंवा दोनवेळचे जेवणही कधी एकत्र होत नाही. जो तो आपल्या सोईनुसार वागतो. आई-वडिलांची मानसिकता अशी की, आपला पाल्याला उत्तम शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित म्हणजे इंजिनिअर वा डॉक्टर व्हावा. त्याने भरपूर पैसा कमवावा आणि उतारवात आम्हाला सांभाळावे. त्यावेळी हे पालक त्या मुलाची मानसिकता, त्याला काय  आवडते, त्याला कोणते शिक्षण घ्यायचे आहे? त्याला कुठली साईड निवडाची आहे? याचा विचार करीत नाहीत. हे पालक आपल्याला जे जमले नाही ते आपल्या पाल्याने केलेच पाहिजे अशा हट्टाने हे ‘अपेक्षांचे ओझे’ त्या मुलावर लादतात. हल्लीची पिढी जातच हुशार आहे. त्यामुळे तोही मुलगा नाईलाजाने ते शिक्षण घ्यायला तयार होतो. पण काही वेळेला त्याच्या मनातील द्वंद ही बंड करून उठते. तेव्हा तो विचार करतो की माझ्यावर एवढे प्रेम करणारे हे माझे आई-बाबा, याबाबतीतच निष्ठूर होऊन माझ्या आवडीचे शिक्षण मला का घेऊ देत नाहीत? ते म्हणतात तेच शिक्षण मी का घ्यायचे? असे उलट- सुलट विचार त्यांच्या मनात खदखदत असतात. पुन्हा बाहेर नातेवाईक, मित्रही काहीबाही भरवतात. तू तुझ्या आई-वडिलांनी सांगितलेली साईड सोडून दे. तुझ्या आवडीच्या साईडला जा. पण एका मानसिक दबावाखाली तो आपल्या आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. तशात घर छोटे कुटुंब पद्धतीचे असल्याने एकत्र कुटुंबपद्धतीसारखे घरात आजी-आजोबा, काका-काकू, मोठा भाऊ, बहीण असे आपले अत्यंत जिवलग की ज्यांच्याजवळ आपण आपले मन मोकळे करू शकू असे नसतात. अशा विषयांवर मनमोकळी चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे एक मानसिक दबावाखाली मुलगा वाढत राहतो. वरून जरी तो कितीही हसतमुख वगैरे असला तरी त्याच्या मानसिकतेचा उद्रेक होतो आणि अशी आत्महत्येची घटना क्षणार्धात घडते आणि आपल्या   अपेक्षांचे ओझे लादणारे हे आई-वडील जन्मभरासाठी दु:खाच्या खाईत लोटले जातात.

मला मध्यंतरी अशीच एक घटना कळाली होती. सर्व मैणी इंजिनिअरिंगला गेल्याने त्याही मुलीला मनाविरूद्ध इंजिनिअरिंगला जावे लागले व पहिल्याच   सत्र परीक्षेत मुलगी सफशेल नापास होते व झोपेच्या  गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करते, परंतु हॉस्टेलवरच्या मैत्रिणी तिला वेळीच हॉस्पिटलमध्ये   हलवितात. तिचा जीव वाचतो, आई-वडिलांचे डोळे फाडकन् उघडतात व ते तिला तेथून घेऊन जाऊन तिला आवडणार्‍या आर्टस् साईडला अँडमिशन घेऊन देतात. आज ती मुलगी एम. ए. होऊन नेट-सेट परीक्षा देऊन एका जुनिअर कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरी करते आहे आणि तिच्या आवडीच्या विषयात अत्यंत खूश आहे, असे जर सर्वच पालकांनी भले एक मुलगा असो वा चार मुले असो, 10 वी, 12 वी नंतर आपल्या पाल्यांशी चर्चा करून आपल्या अपेक्षांचा भार त्यांच्यावर न टाकता त्यांच्या आवडीचा विषय किंवा साईड घेऊ दिली तर अशा अपेक्षांच्या ओझखाली दबून अकाली आत्महत्या करणार्‍या तरुण मुला-मुलींचे प्राण निश्चितच वाचतील असे मला वाटते.

गिरीश दुनाखे

Share this Story:

Follow Webdunia marathi