Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक होता पाऊस

एक होता पाऊस
, सोमवार, 24 मार्च 2014 (17:29 IST)
खूप खूप दिवसांपूर्वी एक होता पाऊस. हा पाऊस अगदी सगळंचाच खूप लाडका होता. तो पाऊस म्हणजे देवाने पाठविलेले अमृत आहे, असं प्रत्येकाला वाटाचं. लहान लहान मुलं त्यांच्या संवगडय़ांना घेऊन गोल गोल फिरत त्या पावसाला आर्जवाने निमंत्रण देत असत.
 
येरे येरे पावसा तुला देतो पैसा..
 
कधी हा पाऊस त्याचं आग्रहाचं निमंत्रण स्वीकारायचा देखील मग मुलं छान मजेनं त्याच्या सोबत खेळायची. मुलं सर्वाची नजर चुकवून पावसात पळत सुटायची तो आनंद अवर्णनीय. शाळेत तास सुरू असताना जर पाऊस आला तर मन फक्त त्या पावसात गुंतलेलं असायचं. त्याचं दरवाजातून दिसणारं रूप, खिडकीतून दिसणारं रूप, मुक्त पटांगणातलं रूप सारीच रूपं अगदीच मोहक. शेतकरी त्याच्या येण्याची चातकासारखी वाट बघायचे. त्याच्या येण्यावरच   आपलं सर्व जीवन अवलंबून आहे असं म्हणायचे. तो पाऊस आला की, शिवारं फुलून यायची, हिरवगार शेतात पिकं भरघोस पिकायची. त्या पावसाचे किती आभार मानू किती नाही असं व्हायचं. धनधान्याने तृप्त झालेला शेतकरी आनंदून जायचा. कधी कधी ह्या पावसाचा लहरी स्वभाव खटकायचा पण अगदीच मनावर दडपण न येता, तो सहन केला जाचा. परवाचा पाऊस पाहिला आणि विश्वासच बसला नाही की हा तोच पाऊस ना! त्याला ओरडून सांगावं असं वाटतं की तुझं रूप किती आक्रमक झालं. अगदी प्रत्येकाची स्वप्नंच तुझ्या पाण्यात वाहून गेलीत.

webdunia
डोळ्यात तुडुंब पाणी भरलं, शेतात तर होत्याचं नव्हतं झालं. कधी नव्हे ती या पावसाची भीती वाटली. तू आता येऊ नको रे बाबा अशी विनवणी सुद्धा कराविशी वाटली. इतका अति लहरीपणा आणि त्याचा बसलेला तडाखा आपल्याला सहनच झाला नाही. अशा स्वप्न वाहून नेणार्‍या पावसाला आपल्याला येरे तरी आता कसं म्हणावं वाटेल? हाही प्रश्न पडला आहे. नुकसानभरपाई मिळेल किंवा नाही माहीत नाही पण मदत म्हणून जे काही स्वीकारावं लागेल त्यावेळी शेतकर्‍यांची अवस्था कुर्‍हाड विहिरीत पडलेल्या लाकूडतोडय़ासारखीच होईल. काहीही दिलं तरी माझं पूर्वीसारखंच पीक असलेलं माझं शेतच मला हवं असा प्रामाणिक हट्टही त्याचा राहील पण तो मनातच. 
 
पावसानं केलेला हा विश्वासघात निमूटपणे सहन करण्याशिवाय त्याच्याकडे पर्यायच राहणार नाही. उदास झालेला प्रत्येकजण पुन्हा पावसाच्या जुन्या आठवणीत गुंगून जाईल. त्याचं येण, सृष्टीचं बहरणं तो आल्हाददाक आसमंत, प्रत्येकाला मिळालेलं नवजीवन, माणसं, प्राणी-पक्षी सार्‍यांचं आनंदानं फुलून येणं. हे पावसाचं भरगच्च देणं केवळ आठवणीतच राहून जाऊ नये, नाहीतर प्रत्येक माणूस म्हणेल एक होता पाऊस.. 
 
स्वाती कराळे 

Share this Story:

Follow Webdunia marathi