Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुलमोहर

गुलमोहर
, बुधवार, 20 मे 2015 (12:45 IST)
उन्हाळा आला अगदी पायाला चटके बसू लागलेत. त्याच्यासोबतच बहर आलाय. रंगीबेरंगी फुलझाडांना, पिवळा बहावा, पांढरा चाफा आणि लालकेशरी रंगाच्या अनेक छटा मिरवणारा गुलमोहर. कधी कधी निसर्गात घडणार्‍या काही मोहक गोष्टी खूप काही सुखाचे क्षण आपल्या   ओंजळीत सहजपणे टाकतात. नेहमीप्रमाणे वसंत ऋतू गुलमोहराने फुलायला सुरुवात केली.
 
ग्रीष्माचा दाह शीतल होऊन जातो. आयुष्य फुलपाखरासारखं भिरभिरी उडू लागते. चैतन्य होऊन जात जस अलगद सुखावलेलं शांतावलेलं मन पुन्हा वेडंपिसं होऊन सैरभैर होतं. गुलमोहराच्या अलगद स्पर्शाने तो सांगतो कसा बघ, एवढे घाव सोसूनही राग, द्वेष, कटुता सारं सारं विसरून मी कसा ठामपणे उभा आहे. जीवनात शिशिरानंतर वसंत येणारच गं, या वसंताचं स्वागतही करायला हवं. मी बघ अंगोपांगी बहरलोय. त्याचा आणि माझ्यातल्या या मूक संवादानं मन अगदी हलकं झालंय.
 
गुलमोहर ओल्या तरल स्वच्छंदी भावनांची हळव्या मनाला आपल्या लाल-केशरी कवेत बेधुंद करणारा. अबोल असूनही खूप काही सांगून जाणारा, धगधगत उन्हाच्या झळांना न जुमानता मोठय़ा दिमाखात उभा राहून येणार्‍या जाणार्‍यांचे हसतमुखाने स्वागत करणारा, मनाचा हिंदोळा झुलवणारा, आपल्या सौंदर्याचा साज घेऊन घायळ करून मनाला भुरळ घालणारा हा गुलमोहर आपल्या लाल-केशरी फुलांच्या   पाघडय़ा सर्वासाठी घालत असतो. एप्रिल आणि मे महिन्यात तर याचं फुलणं अंगोपांगी बहरलेलं असतं. वार्‍याला आलिंगने देऊन त्याचाशी  गुजगोष्टी करणारा त्याच्या स्पर्शाने मोहरणारा हा गुलमोहर किती मनमोहक. फुलांनी बहरलेल्या डहाळ्या सतत वार्‍यावर हेलकावे घेत मला सतत सांगत असतात की, आयुष्यातल्या संकटांना न घाबरता, न खचता नेहमी हसत राहा. हा सहनशीलतेचा कानमंत्र देणारा माझा सखा गुलमोहर पुन्हा एकदा नव्यानं बहरला. असा हा गुलमोहर याच्या लालेलाल रंगावर सुवर्णरेखी बुंदके, ताठ मानेचे केसर, त्यांची ऐट, रूबाब आणि तेजवर्ण केवळ अवर्णनीय! 
 
रणरणत्या उन्हातही झाडांना बहर देणारा, सुगंधाची उधळण करीत मनाला छानसा गारवा देणारा वसंत आपल्याला संदेश देतो की, प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता हसत राहा. जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करा. पानांची नाजूक सळसळ, कोकिळेचे मधुर कूजन, शीळ घालत   फिरणारा बेधुंद रानवारा ही सारी वैशाखातली वसंताची रूपेच आहेत. फुलांनी नखशिखांत आवरून जायचं आणि वार्‍याच्या झुळकीबरोबर एक एक फुल जमिनीवर सोडायचं आणि भोवती तांबडय़ा पाकळ्यांचा भरगच्च गालिचा पसरायचा.
 
पर्जन्यराजाच्या आगमनार्थ पहिल्या पावसापर्यंत गुलमोहराची साथ टिकते. आणि नंतर येणार्‍या प्रत्येक पावसाच्या सरीबरोबर आपला उरला-सुरला पुष्पसंभारही तो अर्पण करतो आणि अलविदा म्हणत फिरून एकदा हिरव्या दाट पानांनी भरून जातो. लाल आणि हिरव्या रंगाची ही जादू डोळे भरून बघताना मन अगदी तृप्त होत जातं.
 
पद्मा तारके 

Share this Story:

Follow Webdunia marathi