कुणी आपल्या पत्नीचे केस धरून भिंतीवर आपटतो, कुणी काठीनी बदडतो, कुणी हातात येईल ती वस्तू घेऊन तिच्या अंगावर फेकून मारतो तर कोणी चक्क चिमटे घेतो. पूर्वीच्या काळातले शिक्षक विद्यार्थ्याला पोटाला चिमटा घेऊन त्याला उभं करत. आजचे आधुनिक नवरे पत्नीला चमट्याच्या रूपात मारतात म्हणजे मारण्याचा आवाज बाहेर जायला नको. मार खाण्याची वेळ कां येते? तर कुणा सुनेचे सासूसोबत पटत नाही, कुणाकडून दिराची हाजीहाजी करणे होत नाही, आणि यातले अनेक नवरे फॅशन म्हणून चेन्ज म्हणून किंवा मित्रांना कंपनी म्हणून ड्रिंक घेतात. (दारू पितात म्हणांयचं नाही कारण रोज दारू पीत नाहीत) याला पत्नीनी विरोध केला किंवा त्याला बंदी केली की, प्रसाद म्हणून मार आहेच. ही आजच्या सुशिक्षित, सुविद्य, स्वयंसिध्दा स्त्रीची कहाणी. स्त्री मुक्तीच्या जगात आजही कित्येक स्त्रियांची हीच परवड आहे. घरातील अशा वातावरणाचा मुलांवर फार विपरीत परिणाम होतो. असं एकमुखानी सगळ्यांनीच सांगून पुढे त्या म्हणाल्यात की, ''याची काळजी मात्र आम्हालाच असते. पती या गोष्टीची फारशी दखल घेत नाही. एकदा लग्न झाल्यानंतर कुटुंब व्यवस्थेसारखी दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पतीचा जाच सहन करीत जगण्यापलीकडे उपाय नसतो. कारण आर्थिक समस्या सुटलेली असली तरी बाहेर असुरक्षित जगात आगीतून निघून फुफाट्यात भाजण्याचीच शक्यता जास्त असल्यामुळे घर सहजासहजी सुटत नाही. शिवाय मुलांशी व कुटुंबाशी निर्माण झालेले ऋणानुबंध तोडवत नाहीत. ''पत्नीचा धर्म'' वगैरे संस्कार तिच्यात कायमचे रूजलेले असतातच आणि म्हणूनच पुरूषी समाजानेच (निदान सुशिक्षित समजल्या जाणार्या) सहानुभावाने व समतेच्या न्यायाने स्त्रीच्या या अवस्थेचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या मानसिक आघाताचा बळी आपली पत्नी ठरू नये यासाठी मनाचा मेरू व विवेकाचा तो सतत उंचावत ठेवला पाहिजे आणि स्त्रियांनाही स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे.
पुष्कळदा पुरूषवर्ग बाहेरचा राग घरात काढताना दिसतात. कारखाने, उद्योगधंदे, दुकान, ऑफिस, बँक इथे नोकरी करीत असताना वरिष्ठांकडून (बॉस) शिव्या मानहानी सहन करावी लागते. तिथे जर स्पष्टपणा आपला राग व्यक्त केला तर नोकरी जायची भीती किंवा साहेबांचा रोख पत्करणे, यामुळे या मानसिक भीतीचा स्फोट घरी गेल्यावर क्रुध्द होण्यात होतो. पण या मनोवैज्ञानिक कारणाने पती जर पत्नीला मारत असतील आणि हे बंद व्हावे असे खरोखरीच पतीला वाटत असेल तर... आज अनेक स्त्रिया घराबाहेर काम करताहेत. त्यांनाही त्यांच्या वरिष्ठांपडून नेहमीच अपमान सहन करावा लागतो. शिव्याही खाव्या लागत असतील मग त्या त्यांना आलेला राग कुठे शांत करीत असतील? असा प्रश्न पुरूषांनी मनाला विचारावा. कारण पत्नीने पतीला मारल्याची घटना ऐकिवात येत नाहीत. (येऊही नये) स्त्रियांना मानहानीच्या मध्ययुगातील अत्याचाराच्या प्रकारातून मुक्तता करणे जोवर संभवत नाही. तोपर्यंत या अनिष्ठ प्रथेत बंद रेशमी कोशातील हुंदके गुदमरतच राहील.