Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजची भूमिका तुम्हाला पटते?

राजची भूमिका तुम्हाला पटते?
, शुक्रवार, 30 एप्रिल 2010 (19:58 IST)
WD
WD
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि मराठी राजकारण हे मुद्दे घेऊन गेल्या काही दिवसांपासून मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रात रहायचे तर मराठी माणूस त्याची भाषा आणि संस्कृती यांचा आदर केलाच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेऊन त्यांनी महाराष्ट्रात पाय पसरणाऱ्या उत्तर प्रदेशी आणि बिहारींना कडाडून विरोध केला. त्यांच्या या भूमिकेने सर्वच राजकीय पक्ष भेलकांडले. महाराष्ट्रातील पक्षांना तर नेमकी काय भूमिका घ्यावी हेच कळले नाही. मराठी माणसांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने अबाऊट टर्न करून हा तर आमचाच मुद्दा म्हणून स्वतःचा 'वडा' करून घेतला.

बहुतांश हिंदी वृत्त वाहिन्यांनी 'राज ने उगला जहर' असे सांगून त्यांचा युपी, बिहारींना विरोध का हा मूळ मुद्दाच पळवून नेला. युपी, बिहारच्या नेत्यांनी तर राज यांच्यावर सडकून टीका केली. त्यांना प्रादेशिक, संकुचिततावादी ठरवून टाकले. तरीही राज यांनी काही त्यांची भूमिका सोडलेली नाही. मराठी माणूस हाच आपला अजेंडा असेल असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. त्याचवेळी आपल्या राजकारणाला महाराष्ट्राचे कुंपणही घातले आहे. त्यांच्या या भूमिकेला सामान्य मराठी माणसाचा मोठा पाठिंबा मिळाला.

हे सगळे झाले तरी प्रश्न बरेच आहेत. राज यांनी त्यांचे राजकारण महाराष्ट्रापुरतेच मर्यादीत ठेवले आहे. सगळ्या प्रश्नांना फक्त महाराष्ट्रवादी दृष्टिकोनातून पाहणे संकुचिततावाद नव्हे काय? जागतिकीकरणाच्या काळात कुणाच्या स्थलांतरावर बंधणे घालणे योग्य आहे काय? मुळात राज यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा ठोस कार्यक्रम आहे काय? कारण भावनिक मुद्यांवर ते किती काळ राजकारण करणार? सध्या त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात तरूण पिढी आहे. पण यापुढेही राज यांना महाराष्ट्रभर पाठिंबा मिळेल काय? महाराष्ट्रातील एक सशक्त पक्ष म्हणून 'मनसे' पुढे येईल काय? या विषयी तुम्हाला काय वाटते?

Share this Story:

Follow Webdunia marathi