Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'साठा उत्तराची कहाणी' सुफळ संपूर्ण

- प्रकाश अकोलकर

'साठा उत्तराची कहाणी' सुफळ संपूर्ण
, शनिवार, 29 मे 2010 (10:55 IST)
MH News
MHNEWS
ग. प्र. प्रधान हे समाजवादी चळवळीतील एक झुंजार कार्यकर्ते. पुरोगामी विचार आणि इंग्रजी वाङ्मयाचा गाढा अभ्यास ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये. मुळात ते प्राध्यापक. पुण्याच्या प्रख्यात फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रदीर्घ काळ इंग्रजी भाषा आणि साहित्य यांचे अध्यापन केलं. पण त्याचवेळी ते अनेक चळवळीत अग्रभागी असत. साथी एस. एम. जोशी आणि ना. ग. गोरे या पुण्यातल्याच दोन ज्येष्ठ समाजवादी नेत्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक तरुणांना भारावून टाकलं होतं. पुढे 'प्रधान मास्तर' या नावानं ओळखला गेलेला हा तरुणही त्याच काळात त्यांच्या प्रभावाखाली आला. पण प्रधान मास्तरांवर केवळ समाजवादी विचारांचाच प्रभाव होता असे नाही, तर त्या काळात भारतात रुजू पाहत असलेल्या अनेक राजकीय विचारसरणींचाही ते तितक्याच गांभीर्यानं विचार करत. त्यातूनच त्यांचं रसरशीत असं व्यक्तिमत्त्व घडत गेलं.

एकोणीसशे सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींनी आणीबाणी जारी केली, तेव्हा त्या विरोधात अनेकांनी सत्याग्रह केले आणि तुरुंगवास पत्करला. प्रधान मास्तर त्या आंदोलनापासून मागे राहणं शक्यच नव्हतं. १९७५मध्ये त्यांना अटक झाली आणि येरवड्याच्या कारागृहात त्यांची रवानगी झाली. ‘साता उत्तराची कहाणी’ ही कादंबरी हे त्या तुरुंगवासाचे फलित आहे. आणीबाणीच्या काळात कारागृहात विविध विचारांचे राजकीय कार्यकर्ते एकत्र आले होते. बाहेर परस्परांशी राजकीय विचारांवरून लढा देणारे समाजवादी आणि संघपरिवारातील कार्यकर्ते जसे तुरुंगात होते, तसेच कम्युनिस्ट आणि शेतकरी कामगार पक्षाचेही होते. विविध राजकीय विचारधारांशी बांधिलकी मानणार्‍या अनेक कार्यकर्त्यांना परिस्थितीनं एकत्र आणलं होतं. त्यातूनच काही विचार करू इच्छिणार्‍यांशी प्रधान मास्तरांचा दोस्ताना जमत गेला आणि मास्तरांच्या मनात विचारमंथन सुरू झालं.

१९७०च्या त्या अस्वस्थ दशकाला मोठी पार्श्वभूमी होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात अनेक घडामोडी होत गेल्या. पंडित नेहरूंचे निधन, त्या आधी चीनशी झालेल्या लढाईत पत्करावा लागलेला मोठा पराभव, त्याच काळात संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेलं आणि प्रदीर्घ काळ सुरू राहिलेलं आंदोलन... या सर्वांकडे एका तटस्थ वृत्तीनं पाहण्यासाठी आवश्यक ती सवड प्रधान मास्तरांना या कारावासात लाभली आणि त्यातूनच हा ग्रंथ साकार झाला.

प्रधान मास्तर त्या काळातील विविध राजकीय प्रणालींकडे एक अभ्यासक या दृष्टीनं पाहत होते आणि त्या त्या विचारांच्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून काळाचा, इतिहासाचा मागोवा घेत होत होते. तोच त्यांना शब्दबद्ध करावयाचा होते. त्यामुळेच त्यांनी त्यासाठी कादंबरी हा ‘फॉर्म’ निवडला. त्यातच या पुस्तकाचे मोठे यश आहे. कॉलेज जीवनात मित्र असलेले सात तरुण वेगवेगळ्या राजकीय विचारधारांनी मोहित होतात आणि त्या त्या विचारांच्या चळवळीत, पक्षीय राजकारणात स्वतःला झोकून देतात. पुढे दिवस जातात, तसा एकमेकांशी संपर्क कमी कमी होत जातो. तरी अधून मधून चळवळींच्या निमित्ताने गाठीभेटी होत राहतात. पण त्या केवळ कामापुरत्या असतात. आणीबाणीतील तुरुंगवासात हे मित्र पुन्हा एकमेकांना भेटतात! ही भेट निवांत असते आणि भूतकाळाचा वेध घेण्यासाठी त्यामुळेच प्रदीर्घ काळ वेळ मिळालेला असतो. त्यातूनच या विविध विचारधारांचे मंथन हे मित्र सुरू करतात आणि आपल्यापुढे उभा राहतो स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यानंतरचं राजकारण यांचा मनोज्ञ असा इतिहास. हा इतिहास आपण स्वत:हून वाचायला घेतला नसता पण प्रधान मास्तरांनी एकीकडे या सात तरुणांच्या मैत्रीची पार्श्वभूमी उभी केल्यामुळे आपण तो सलग वाचत जातो.

प्रधान मास्तर केवळ इतिहास आपल्यापुढे उभा करण्यात रममाण झालेले नाहीत, तर त्या त्या काळातील निर्णयांची परखड चिकित्साही त्यांनी या मित्रांच्या संवादातून आपल्यापुढे उभी केली आहे. या कार्यकर्त्यांनी लग्ने केली तीही त्यांच्या कार्यात सहभागी होऊ इच्छित असलेल्या महिलांशीच आणि लग्नानंतरही काही काळ या तरुणांचे परस्परांशी कौटुंबिक नातं जडलं होतं. त्यामुळे इतिहासाचा आलेख उभा करतानाच, त्यात कौटुंबिक घडामोडी आणि आपुलकीहीचा धागाही आपोआप जोडला गेला आहे. राजकीय मतभेद असूनही हा आपुलकीचा धागा कायम राहिला आहे. त्यामुळेच हा ग्रंथ म्हणजे, त्या काळात चळवळ आणि आंदोलनं यात झोकून देणार्‍या कार्यकर्त्याची कहाणी सांगत जातो.

याच तरुणांची पुढची पिढीही साहजिकच वैचारिक पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि त्यांचे विचार, प्रसंगी सामोरे येणारे दोन पिढ्यांतील वाद यातूनही बरेच मंथन होत जाते आणि आपल्याला बरंच काही शिकवूनही जातं. आज चळवळ, आंदोलन हे सारे शब्द इतिहासजमा झालेले असताना ‘साता उत्तराची कहाणी’ आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते आणि त्याचवेळी इतिहासाकडे पाहण्याची एक नवी दृष्टीही देते.

(महान्यूजवरून साभार)

Share this Story:

Follow Webdunia marathi