Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोनेरी पुरुषाचा जीवनप्रवास

सोनेरी पुरुषाचा जीवनप्रवास
, मंगळवार, 19 मे 2015 (10:41 IST)
जागतिक संग्रहालय कमिटीच्या वतीने १९७७ पासून १८ मे हा दिवस ‘संग्रहालय दिन’ म्हणून साजरा केला जातो. पुण्यात ऐतिहासिक वारसा जपणारे अनेक हौशी प्रेमी पुणेकर आहेत. पुण्याच्या  सराफी  वैभवात आपला वेगळा ठसा उमटवणारे पुण्याचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे दाजीकाका गाडगीळ. 
 
बदल स्वीकारणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून आपल्या कुटुंबाबरोबरच आपल्या सोबत काम करण्याऱ्यांना देखील प्रोत्साहित करत असल्याचे उदाहरण म्हणजे दाजीकाका. दाजीकाकांनी लोकांना प्रेम, आदर, प्रोत्साहन  देताना तरुणांना शिकून स्वत:चा सर्वार्थाने विकास करण्याची संधी निर्माण करून दिली. दाजीकाकांनी समृध्दतेने केलेल्या प्रवासाचे प्रतिबिंब दिसणारे ठिकाण म्हणजे दाजीकाका गाडगीळ संग्रहालय. यामध्ये दाजीकाकांची विविधअंगी पैलूची माहिती, त्यांचे अभ्यासू आणि निश्चयी, धोरणी आणि कलाप्रिय व्यक्तिमत्वाचा प्रवास प्रेक्षकांना दिसणार आहे. या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कार्याचा आणि पावणे दोनशे वर्षापासूनचा सोन्याच्या क्षेत्रातील उत्तुंग प्रवास दाजीकाका गाडगीळ संग्रहालयात मांडण्यात आला आहे.   
 
दाजीकाकांचा हा प्रवास द्रुकश्राव्य आणि ध्वनी प्रक्षेपणाच्या माध्यमातूनही त्यांचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. दाजीकाकांनी घडविलेली दुर्मिळ कलाकुसर व कुटुंबाची काही क्षणचित्रे देखील येथे ठेवण्यात आली आहेत. या संग्राहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे दाजीकाकांच्या ‘सिलिकॉनचा’ पुतळा. साधारण १०० मिनिटांच्या भेटीत या संग्राहलयाच्या माध्यमातून सोनेरी पुरुषाच्या जीवनप्रवास मांडण्यात आला  आहे. हा जीवन प्रवास केवळ एका सोनेरी पुरुषाचा नसून त्यांच्या आयुष्याचा, माणुसकीचा, कामाचा, कष्टांचा,  प्रेमाचा, प्रामाणिकपणाचा, आव्हानांचा, धाडसी व सक्षम दृष्टिकोनाचा, सकारात्मक आणि वेगळ्या विचारांचा व अंतरंगांचा आहे. ज्या प्रमाणे दाजीकाकांनी आयुष्य व्यतीत केले, त्याप्रमाणे आपण देखील जगण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा सोनेरी व्यक्तिमत्वाच्या सोनेरी प्रवासाचा अनुभव घ्या दाजीकाका गाडगीळ संग्रहालयाच्या माध्यमातून…. 

Share this Story:

Follow Webdunia marathi