Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'जेट'च्या विमानाने राज यांचे 'टेक ऑफ'

'जेट'च्या विमानाने राज यांचे 'टेक ऑफ'

अभिनय कुलकर्णी

NDND
'भगवान देता है तो छप्पर फाडके' ही म्हण हिंदीत असली तरी मराठी मुद्दा हाती घेतलेल्या राज ठाकरे यांच्यासाठी ती तंतोतंत लागू पडते. गेल्या काही दिवसांत घडामोडीच अशा काही घडल्या की राज यांच्या 'मनसे'च्या विमानाने जोरदार 'टेक ऑफ' केले तर प्रतिस्पर्ध्यांना मात्र 'जेट लॅग'चा अनुभव आला.

आर्थिक अरिष्टाचा फटका जेटला बसतो काय, कंपनी १९०० कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकते काय आणि हे कमर्चारी आपल्याला कामावर घेण्यासाठी प्रयत्न करावे या मागणीसाठी राज ठाकरे यांची भेट घेतात काय? आणि एकूण राजकीय दबावापोटी जेटला निर्णय मागे घ्यावा लागतो काय? या सगळ्या अनपेक्षित घडामोडी होत्या नि या सगळ्यांचा थेट फायदा राज ठाकरे यांना झाला. शिवसेनेनेही यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यामुळेच हे घडल्याचा दावाही केला. पण 'बुंद से गई वो हौद से नहीं आती' ही हिंदी म्हण पुन्हा 'मराठमोळ्या' शिवसेनेलाही लागू पडते.

वास्तविक जेटमध्ये भारतीय कामगार सेना ही शिवसेनेचीच कामगार संघटना आहे. पण तरीही या कर्मचार्‍यांनी राज यांच्याकडेच धाव का घेतली? हा प्रश्नच आहे. त्या सगळ्यांना राज हेच आपला प्रश्न सोडवतील असा विश्वास का वाटला असावा? वास्तविक या कर्मचार्‍यांमध्ये बहुतांश कर्मचारी परप्रांतीय होते. राज यांची परप्रांतीयांविरोधातील भूमिका सर्वश्रुत आहे. असे असतानाही हे कर्मचारी राज यांच्याकडेच का गेले असावेत? मुंबईतले राज यांचे वाढत असलेले वर्चस्व, बॉलीवूडपासून उद्योग जगतापर्यंत त्यांची 'दहशत' की प्रश्न सोडवण्यामागची कळकळ? ते कारण यापैकी काहीही असेल पण राज यांच्याकडे गेल्यानंतर हा प्रश्न सुटला हे सत्य तेवढे उरते. जेटच्या कर्मचार्‍यांची भेट घेतल्यानंतर हा प्रश्न सुटेपर्यंत जेटचे एकही विमान मुंबई व महाराष्ट्रातून उडणार नाही, हा दमही त्यांनी खास स्टायलीत दिला आणि या कर्मचार्‍यांबद्दल सहानुभूतीही दर्शवली. त्यानंतर वेगाने हालचालीही झाल्या. राज व जेटचे अध्यक्ष नरेश गोयल यांची भेटही ठरली होती. त्यांच्यात दूरध्वनीवरून संभाषणही झाल्याचे कळते. असे असेल तर मग हा प्रश्न सुटल्याचे श्रेय कोणास जाते हे सांगण्याची गरज नाही. त्यातच पुन्हा कामावर घेतल्यानंतर जेटच्या कर्मचार्‍यांनी 'मनसे'चा झेंडा घेऊन नाच केला त्यावरूनही हे कर्मचारी कुणाच्या ऋणात आहेत हेही कळते.

या सगळ्या प्रकरणात शिवसेनेचा मात्र 'पोपट' झाला. शिवसनेची कामगार संघटना असूनही कर्मचार्‍यांना मनसेचा आधार वाटतो यातच काय ते आले. हे कर्मचारी प्रोबेशनवरचे आणि तात्पुते होते. त्यांच्यात आमची संघटना नाही. त्यामुळे माहित नसताना ते 'मनसे'कडे गेले. 'मनसे'ला काय राजकीय फायदाच उठवायचा होता, असे विधान शिवसनेचे कामगार विभाग पाहणारे नेते विनायक राऊत यांनी केले तरी त्यातून हा मुद्दा आपल्या हातातून सुटल्याचे राजकीय वैफल्यच त्यांच्या बोलण्यातून जाणवले.

'जेट'चे कर्मचारी 'मनसे'कडे गेल्यानंतर शिवसेनेनेही जेटच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन कर्मचार्‍यांना कामावर घेण्याची मागणी केली. पण तोपर्यंत बरेच काही घडून गेले होते. जेटच्या व्यवस्थापनावर राज यांचा 'दबाव' पडलेला होता. मुळात दोन वर्षांची मनसेची वाटचाल असूनही आणि शिवसेनेच्या कामगार सेनेचे उद्योग जगतात बर्‍यापैकी वर्चस्व असूनही हे घडते हा शिवसेनेसाठी भविष्यात मोठा इशारा आहे.

एकीकडे हे घडत असताना राज यांना दिलासा देणारी आणखी एक बातमी आली. मराठी पाट्यांप्रश्नी राज यांनी व्यापार्‍यांना पाठवलेल्या पत्रात आक्षेपार्ह काही नाही, असे प्रतिज्ञापत्र मुंबईचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी कोर्टाला सादर केले आहे. याच प्रसाद यांनी 'मुंबई कुणाच्या बापाची नाही', असे सांगून राज यांना फटकारले होते. त्याला राज यांनीही त्याच भाषेत उत्तर दिले होते. या प्रकरणी मुंबईतील व्यापार्‍यांनी एक याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यावर कोर्टाने राज यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल केला होता. त्यावर प्रतिज्ञापत्र सादर करताना राज यांनी व्यापार्‍यांना पाठवलेल्या पत्रात आक्षेपार्ह काहीही नाही, असा निर्वाळा पोलिसांना द्यावा लागला. थोडक्यात सरकारही 'बॅकफूट'वर आल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. शिवाय शिवसेनेची गोची झाली ती निराळीच. मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही त्यांना पाट्या मराठीत करता आल्या नाहीत आणि सत्ता नसतानाही राज यांनी या पाट्या मराठीत करून दाखवल्या. त्याही कुठेही कायद्याच्या कचाट्यात न अडकता.

एकूण काय अनपेक्षित आलेल्या संधींचा राज यांनी योग्य लाभ उचलला आणि त्याचे श्रेय पदरात पाडून घेतले. त्याचा फायदा 'मनसे'च्या आगामी वाटचालीसाठीही नक्कीच होईल. थोडक्यात जेटच्या विमानात बसून 'मनसे'चे राजकीय 'टेक ऑफ' अगदी दणक्यात झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi