पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात दादा हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.
पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म ऑक्टोबर १९, १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. पारंपरिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदान्त, साहित्य, त्याचबरोबर इंग्लिश भाषा साहित्याचा अभ्यास पांडुरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सदस्यत्व देऊन सन्मानित केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत पांडुरंगशास्त्री यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांच्या तेजस्वी जीवनवादाचा पुरस्कार केला.
पांडुरंगशास्त्री आठवले यांचा विवाह १९४४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील निर्मलाताई सिधये यांच्याशी झाला. निर्मलाताईंनी स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्यातही दादांना भक्कम साथ दिली. स्वाध्याय कार्यातील बंधु-भगिनींना तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायम लाभत होते. दादांच्या देहावसनानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्याला होत्या. ३ ऑगस्ट १९२६ रोजी जन्मलेल्या निर्मलाताई आठवले यांचे वयाच्या ९०व्या वर्षी ३१ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.
स्वाध्याय चळवळ ही श्रीमद् भगवद्गीतेवर आधारित आत्मज्ञानाची चळवळ आहे. ही चळवळ भारतातील लाखो गावांपर्यंत पसरली. त्यांनी गीता आणि उपनिषदांवर आपले प्रवचन दिले जे खूप प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांची आजही आठवण येते. त्यांनी लोकांचे लक्ष आध्यात्मिक समाजाकडे वेधले.
स्वाध्याय परिवाराची स्थापना करून त्यांचा जन्मदिवस दरवर्षी 'मनुष्य गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांनी साहित्य, वेदांत आणि न्याय यांचा अभ्यास केला. असे म्हटले जाते की पांडुरंग शास्त्रींनी अखंड वैदिक धर्म, जीवनपद्धती, उपासना करण्याचा मार्ग आणि पवित्र व्यासपीठावरून लोकांना विचार करण्याची पद्धत दिली. ज्याच्या आधारावर स्वाध्याय परिवाराची स्थापना झाली.
इ.स. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमणियम म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहते. पांडुरंगशास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील देदीप्यमान आशेचा किरण आहेत.