Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहिल्याबाई होळकर : मल्हारराव म्हणत आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईंच्या भरवशावर

ahilyabai holkar
, बुधवार, 31 मे 2023 (07:50 IST)
अहिल्याबाईंनी आपल्या न्यायबुद्धीने राज्यकारभारावर कसा वचक ठेवला आणि प्रजेसाठी लोककल्याणकारी राज्य कसं राबवलं त्याचा हा लेखाजोखा.
 
मराठ्यांच्या इतिहासातील कर्तबगार व्यक्तिमत्त्व म्हणून इंदौर संस्थानच्या मल्हारराव होळकरांना ओळखलं जातं. मल्हारराव होळकरांच्या मुत्सद्देगिरी आणि प्रशासकाचा वारसा त्यांची सून अहिल्याबाई यांनी पुढे नेला.
 
अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 बीडच्या जामखेड तालुक्यातील चौंडी या लहान गावातला. धनगर कुटुंबातल्या माणकोजी आणि सुशिला शिंदे यांच्या मुलगी लहान असताना कशी हजरजबाबी आणि चुणचुणीत होती याविषयी अनेक चरित्रकारांनी लिहिलंय.
 
तिच्या चुणचुणीत स्वभावाला पाहूनच मल्हाररावांनी आपल्या मुलाच्या विवाहासाठी आपल्याच जातीतील शिंदे कुटुंबाकडे विचारणा केली.
 
त्यानंतर खंडेराव होळकर यांच्यासोबत नऊ वर्षांच्या अहिल्येचा बालविवाह झाला. 1733 साली विवाह झाल्यानंतर होळघर घराण्यात अहिल्याबाईंचं शिक्षण आणि नवी तालिम सुरू झाली.
 
पेशव्यांच्या कारकीर्दीत 1730मध्येच मल्हाररावांना मावळा प्रांतातील सर्व परगण्यांचा अधिकार मिळाला होता.
 
मराठ्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी सरदारांना पेशव्यांनी जहागीरदारी आणि वतनदारी दिली.
 
तर 1734मध्ये होळकर राज्याची रीतसर स्थापना करण्यात आली. होळकरांना वंशपरंपरेत चालणारी वतनं, परगणे आणि इनाम मिळाल्याने राज्यकारभाराचा पसारा वाढू लागला होता.
 
पतीलाही खडसावणाऱ्या अहिल्याबाई
लेखिका विजया जहागिरदार यांनी अहिल्याबाईंवर चरित्र लिहिलं आहे. त्या लिहिलात- 'रोज फडनिशीत जावे, हिशोब बघावे, वसूल जमा बघावी, त्यासाठी माणसं पाठवावी, न्यायनिवाडे करावे, सरदारांना पत्रे पाठवावी, फौजा तयार ठेवाव्या, खासगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळे ठेवावे, खातेनिहाय पैशाचे वाटप करावे, गोळाबारुदा बाणभाते, ढाली तलवारी सज्ज राखाव्या, सासऱ्यांच्या पत्राबरहुकूम सर्व रवाना करावे. मल्हारराव म्हणत आम्ही तलवार गाजवतो ती सूनबाईंच्या भरवशावर. मार्तंडानेच हे रत्न आम्हास दिले. अवघी वीस-बावीस वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली. इतिहासात याचे दाखले आहेत.'
 
अहिल्याबाईंचे पती खंडेराव विलासी आणि व्यसनी प्रवृत्तीचे होते आणि तेच शल्य मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या मल्हाररावांना होतं असं चरित्रकार सांगतात. त्यामुळे राज्यकारभाराची भिस्त राखेल असा वारसदार त्यांना अहिल्याबाईंच्या रुपाने दिसत होता.
लढाया आणि मोहिमांमधून लूट करून आणलेली संपत्ती राज्यात आल्यावर तोलली जात असे आणि तिचा ठराविक हिस्सा पुणे दरबारी पाठवला जाई. अहिल्याबाईंची न्यायबुद्धी इतकी तीक्ष्ण होती की त्यांनी खुद्द आपल्या पतीचीही हयगय केली नाही.
 
जहागीरदार यांच्या पुस्तकात हा प्रसंग त्यांच्या सत्याची कास धरणाऱ्या न्यायबुद्धीची साक्ष देतो.
 
पती खंडेराव यांचा राजमहल इथे लढाईत पराभव झाला पण येताना त्यांनी बरीच लूट आणली. ही लूट सरकारी कार्यालयात वजन न करता ते वाड्यावर घेऊन गेले. याविषयी अहिल्याबाईंनी खंडेरावांना हा गुन्हा असल्याचं सांगत जाब विचारला.
 
खंडेरावांनी उत्तरादाखल- "ही लूट आम्ही आमच्या मनगटाच्या जोरावर आणली आहे," असं सांगितलं.
 
तेव्हा अहिल्याबाईंनी खडे बोल सुनावले- "स्वामी, जे सुभेदारी भोगतात त्यांची मनगटे रयतेसाठी असतात. आपण सुभेदारांचे वारस आहोत, चोरपेंढारी नव्हेत. ही लूट निमूटपणे सरकारजमा करा. आणि उरलेल्याचा उपभोग घ्या. अन्यथा मला झडतीसाठी कारभारी पाठवावे लागतील," असं सुनवून अहिल्याबाईंनी ती सरकारच्या हवाली केली.
 
अहिल्याबाईंचा प्रशासनात उत्तम जम बसत होता. त्यांना मालेराव हा मुलगा आणि मुक्ता ही मुलगी होती. आठ वर्षांच्या मालेरावचं अभ्यासात लक्ष नव्हतं, त्याच्या या स्वभावामुळे अहिल्याबाई अस्वस्थ असत.
 
सती जाण्यास तयार होत्या परंतु..
1754 साल अहिल्याबाईंच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं.
 
राजस्थानात जाटांविरोधात लढाईसाठी गेलेले असताना कुंभेरी वेढ्यात खंडेराव होळकर मरण पावले. कुंभेरगडावरून पडलेल्या तोफेच्या गोळ्याने त्यांचा जीव घेतला.
 
त्या मोहिमेत अहिल्याबाई देखील त्यांच्यासोबत होत्या. खंडेरावांचा मृत्यू हा अहिल्याबाईंवरच नाही तर मल्हारराव आणि त्यांच्या पत्नी गौतमाबाईंवर मोठा आघात होता.
त्याकाळी सती ही अनिष्ठ प्रथा अस्तित्वात होती. त्यानुसार खंडेरावांच्या नऊ पत्नींना सतीसाठी इंदौरहून आणण्यात आलं. अहिल्याबाईही सती जायला तयार झाल्या. पण मल्हारराव होळकरांच्या मनात पुत्रशोक असूनही वेगळाच विचार तरळत होता.
 
होळकरांचं राज्य नावारुपाला येण्यासाठी अहिल्येचा वाटा मोठा असल्याची जाण मल्हारराव आणि गौतमाबाईंना होती. त्यांनी सती जाण्यापासून 28 वर्षांच्या अहिल्येला रोखलं.
 
खंडेरावांच्या चितेसोबत इतर आठ पत्नी सती गेल्या. इथे अहिल्याबाईंनी आपले अलंकार, रंग, उपभोग त्याग करत असल्याचं सांगितलं. 'केवळ शुभ्र वस्त्र नेसून प्रजेसाठी आणि राज्यासाठी काम करेन' असं जाहीर केलं. याच्या नोंदी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहेत.
 
पण सती प्रथा मोडली म्हणून वर्षश्राद्धाच्या वेळी टीका करणाऱ्या लोकांना मल्हाररावांनी धारेवर धरलं. अहिल्याबाई पुन्हा कामकाज पाहू लागल्या.
 
मराठा साम्राज्यातील तत्कालिन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये वंशावळ ही महत्त्वाची मानली जाते. बहुतांशवेळा त्यात पुरुषांचा उल्लेखच आढळतो. पण होळकरांच्या वंशावळीत मल्हारराव होळकरांनंतर वारसा म्हणून अहिल्याबाईंचं नाव नोंदवलेलं आहे.
 
पानिपताच्या युद्धापासून घेतला धडा
पेशव्यांच्या काळात उत्तरेत मराठा साम्राज्य विस्तारण्यात मल्हारराव होळकरांचा वाटा मोठा मानला जातो. तेव्हा इंदौर हे होळकरांचं सत्तेची सूत्र हलवण्याचं केंद्र होतं.
 
मल्हारराव मोहिमांवर असताना मावळ प्रांतातला कारभार अहिल्याबाई पाहात असत. इतकंच नाही तर तोफखान्याच्या कारखान्यात त्या पारंगत होत होत्या.
 
मराठ्यांच्या उत्तरेकडच्या स्वाऱ्या सुरू होत्या. त्यात 1761मध्ये पानिपतच्या रणसंग्रामाचा गहिरा परिणाम होळकरांच्या राज्यावरही झाला.
 
'पानिपतच्या अपयशाचा डाग धुवून काढण्यासाठी मल्हारराव सतत मोहिमांवर जाऊ लागले. पानिपतचे सैन्य पाणी पाणी करत मेले हे अहिल्याबाईंनी लक्षात ठेवून ठिकठिकाणी विहिरी खणून घेतल्या. दंगलीच्या वेळी आश्रयस्थाने हवीत म्हणून धर्मशाळा बांधून घेतल्या.'
 
मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर यांच्यातले पत्रव्यवहार उपलब्ध आहेत.
मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या राज्यकारभारातील कार्यक्षमतेवर इतका गाढा विश्वास होता की त्यांनी अनेक महत्त्वाच्या तजबिजी त्यांना करायला सांगितल्या. ते या पत्रांमधून दिसतं.
 
तोफखाना उभारण्यात आणि सांभाळण्यात एकदम कुशल
इंग्रजांच्या विरोधात मुघल बादशाह शाह आलम, बंगालचा नवाब आणि अवधचा नवाब शुजा यांनी एकत्र येऊन युद्ध केलं. ऑक्टोबर 1764मध्ये झालेल्या बक्सारच्या या लढाईत इंग्रजांनी तिघांचाही पराभव केला. आणि तहानंतर 1765मध्ये इंग्रजांनी अलाहाबादचा किल्ला ताब्यात घेतला.
 
इंग्रजांची आक्रमक भूमिका पाहून मल्हारावांना येणाऱ्या काळात युद्ध अटळ असल्याचं लक्षात आलं. जिथे लढाया होऊ शकतात तिथून जवळ मोक्याच्या ठिकाणी युद्ध सामुग्री त्यातही विशेष करुन तोफांच्या दारुचा पुरवठा करणारं केंद्र हवं अशी गरज त्यांना वाटू लागली. त्यावेळी अहिल्याबाई तीर्थक्षेत्रांना भेटी देत होत्या.
 
याविषयी विनया खडपेकर लिखित 'ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर' पुस्तकात काही पत्रांचे संदर्भ आहेत.
 
मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंना पत्र लिहिलं- 'ग्वालेरजवळ जाऊन लष्कराची तयारी करावी. दारुगोळ्याच्या कारखाना लावून तोफखाना सिद्ध ठेवावा.'
 
अहिल्याबांईनी आपल्या तीर्थक्षेत्रांच्या भेटी रद्द केल्या. त्यांनी जोमाने कामाला सुरूवात केली.
 
तोफांसाठी लागणाऱ्या दारुगोळ्यांच्या कारखाना उभा करणं म्हणजे मोठं जिकरीचं काम असे. 'तेजस्विनी अहिल्याबाई होळकर' या पुस्तकात अहिल्याबाईंनी कारखाना कसा उभा केला याचं वर्णन आहे.
 
'कारखान्यासाठी क्षेत्र निवडण्यापासून, तोफा वाहून नेणाऱ्या बैलांच्या चाऱ्यापर्यंतची सर्व व्यवस्था पाहावी लागत असे. शेकडो माणसे, कित्येक प्रकारचे सामानसुमान या व्यापारात गुंतलेले असत.
 
एका कारखान्यात 4 सुतार, 4 लोहार, 7 बाणांचे कारागीर, 26 गाडीवान, 2 गोलंदाज, 16 खलाशी जमादार, दर्यावर्दी जमादार, जेजालदार, ढालाईत, संदुकांचा हवालदार, जासूद, कामाठी.....' हे इतके कुशल कामगार जमा करुन कारखाना उभा करणं यातून अहिल्याबाईंची प्रशासकीय कामावरची कुशल पकड दिसते.
 
मल्हाररावांनी 31 जानेवारी 1765ला लिहिलेलं पत्र अहिल्याबाईंवरच्या कतृत्वावर गाढा विश्वास असल्याचं दाखवतं.
 
'तुम्हाला दरमजल करीत ग्वाल्हेरला जाण्याविषयी अगोदर लिहिले आहेच. त्याप्रमाणे ग्वाल्हेरला जाणे, तेथे पाच सात मुक्काम करावेत. थोरल्या तोफेचे हजार पाचशेपर्यंत गोळे करवून घ्यावेत. जुंबरियाचेही गोळे जितके होतील तितके जरुर करवावेत.
 
याशिवाय शंभरपर्यंत जंबुरेही कारखाना लावून तयार करवावे, शेरभर दारु मावेल असा बाणांच्या पालेका उत्तम निवडून घेणे. यात कोणतीही हयगय करु नये.
 
निघतानाच तुम्हाला सांगितले आहे, त्याप्रमाणे जंबुरियाकरता गोळीचा साचा करून जंबुरे जरूर करविणे. ग्वाल्हेरी पलीकडे तुम्ही जाल तेव्हा तोफखान्याच्या खर्चाची एक महिन्याची बेगमी करून मग पुढे जाणे.'
 
मल्हारराव आणि अहिल्याबाई यांच्यातली पत्रे इंदूरच्या मल्हारी मार्तंड च्या अंकात 1917मध्ये प्रसिद्ध झाली होती, आजही ऐतिहासिक दप्तरांमध्ये उपलब्ध आहेत.
 
मल्हाररावांच्या निधनानंतर राज्याची धुरा सांभाळली
1766मध्ये मोहिमेवर असताना मल्हारराव होळकरांचं निधन झालं. त्यानंतर पेशव्यांनी सुभेदारी म्हणजेच सेनापतीची धुरा अहिल्याबाईंच्या भरवशावर पुत्र मालेरावांकडे दिली.
 
इतिहासकार सांगतात- मालेरावांनी सरकारी तिजोरीतून खासगी खर्चासाठी सपाटा लावला होता. मालेरावांचं वर्तन बेजबाबदार होत चाललं होतं.'
 
'सुभेदारीची वस्त्रे घेतल्यापासून खासगी तिजोरीतले पाच लक्ष उडाले होते. सरकारी खर्चाचा तर हिशोब लिहिणे कठीण झाले होते. त्यातून आता मनुष्यवध करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
 
मालेरावांची एक आवडती दासी होती. तिच्या पतीचा मालेरावाने खून केला. अहिल्याबाईंनी या सगळ्यांचे पुरावे प्रत्यक्ष पाहिले. नोकरांच्या जबान्या घेतल्या. मालेरावावर कारवाई करण्याचे मनी योजले.' जहागीरदार पुस्तकातील मालेरावांची अंदाधुंदी या प्रकरणात लिहितात.
 
मालेरावांवर कारवाई होणार हे प्रजेलाही कळलं होतं. पण पाच महिन्यांतच मालेरावांना वेड लागून त्यांच्यावर मृत्यू ओढवला असा उल्लेख चरित्रांमध्ये आढळतो. तर काहींच्या मते मालेरावांना हत्तीच्या पायदळी तुडवून मारलं. त्याविषयी मतभेद आहेत.
 
इथे अहिल्याबाईंना न्यायनिवाडा करताना नातं आड आलं नाही.
 
मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातूनही अहिल्याबाई सावरल्या आणि त्यांनी माळव्याच्या राज्यकारभाराची सूत्रं आपल्या हाती घेतली.
 
त्याच सुमारास त्यांना राज्यातल्या बंडखोरीचा सामना करावा लागला. गंगोबातात्यांनी फितुरी करुन रघुनाथराव पेशव्यांना पत्र पाठवलं की- होळकरांचं राज्य बेवारस झालं आहे, तुम्ही आक्रमण करा. मी साथ देतो.
 
अटकेपार झेंडे रोवणाऱ्या राघोबांना नमवले
इतिहास संशोधक आणि पेशवेकालीन दप्तराचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात- "रघुनाथराव पेशवे हे खलपुरूष होते. त्यांनी आक्रमण करण्याची तयारीही सुरू केली. याची खबर लागताच अहिल्याबाईंनी रघुनाथरावांना धमकीवजा पत्र लिहिलं.
 
'तुम्ही तर राज्याचे स्वामी आहात. अटकेपार झेंडा लावण्याइतके तुमचे कतृत्व आहे. पण रणांगणात उतरायचंच ठरवलंत तर पराभवाचीही तयारी ठेवा. माझ्याकडून पराभव झाला तर तुमच्या कीर्तीला ते बाधक ठरेल.' यातूनच त्यांचा पेशवे दरबारी असणारा दरारा दिसून येतो.
 
या पत्रानंतर राघोबांनी त्यांच्या राज्यावर चालून जाण्याचा बेत रद्द केला हा इतिहास आहे.
 
कुशल प्रशासक
इंदौरमधून आपल्या सत्तेचं केंद्र हलवत त्यांनी नर्मदेकाठी महेश्वर इथे आपली राजधानी हलवली. महेश्वरचं जुनं नाव 'महिष्मती नगरी' असं होतं. पण इंदौरचं सेनापतीपद दत्तकपुत्र तुकोजी होळकर यांच्याकडे होतं.
 
नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर राजधानी झाल्यानंतर 1767 ते 1795 या काळात अहिल्याबाईंनी उत्तम प्रशासनाचे दाखले देत भारतासमोर आदर्श म्हणून उभा केला असं म्हटलं जातं.
 
या काळात त्यांनी उत्तरेतील राज्यांमध्येच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये लोकपयोगी आणि धार्मिक वास्तूही बांधल्या. त्यांना 'पुण्यश्लोक' देखील म्हटलं जातं.
 
मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यासोबतच अन्नछत्र, धर्मशाळा, विहिरी तयार केल्या. नंदूरबारमध्ये त्यांनी विहिर खोदून घेतली. तिला आजही अहिल्याबाई विहिर म्हणून ओळखली जाते.
 
बलकवडे अहिल्याबाईंच्या या प्रशासकीय कतृत्वावर प्रकाश टाकताना सांगतात- "त्यांनी लोककल्याणकारी कार्यक्रम राबवत आदर्श प्रशासन निर्माण केलंच. पण कर व्यवस्था, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलती, न्याय देण्याची व्यवस्था उभी केली.
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळकर प्रशासनात त्यांनी सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने अनेक जातीच्या लोकांचा समावेश केला. "
 
*आपल्या खासगी तिजोरीतून नर्मदा, गंगा अशा नद्यांच्या किनारी घाट बांधून घेतले.
* महेश्वरमध्ये पेठा, हवेल्या उभारल्या गेल्या. तिथे सोनार, विणकरांना यासारख्या कुशल कारागीरांना बोलवण्यात आलं. महेश्वरी साडीला राजाश्रय इथेच मिळाला.
* जिल्हा परिषदांच्या पद्धतीतून खेड्यापर्यंत न्यायनिवाडा करण्यासाठीची यंत्रणा उभारली.
* हुंडाबंदीचं धोरण राबवण्यासोबतच दारुबंदीसाठी कठोर पावलं उचलली.
* मुलींची पाठशाळा आणि महिलांना शस्त्रशिक्षण सुरू केलं.
वैद्यांना आमंत्रित करून क्षय रोगावर संशोधन सुरू करण्यात आलं.
* जंगलतोडीविरोधात कार्यक्रम जाहीर केले.
* बंधारे, तळी बांधून सिंचनाने बागायती क्षेत्र वाढवलं.
 
स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत असताना त्यांना सतीसारख्या प्रथांना अगदी जवळून तोंड द्यावं लागलं. एकुलती एक सून आणि मुलीलाही सती जावं लागलं.
 
एकीकडे ही लोककल्याणकारी कामं सुरू असताना इंदौर संस्थानात अनेक कुटील हालचाली होत होत्या. तुकोजी होळकरांनी प्रजेसोबत केलेल्या मनमानी वर्तनावर जाब विचारण्यासाठी अहिल्याबाई पत्र पाठवत.
 
अशाच एका पत्रात त्या लिहितात- 'चिरंजीव तुलाराम होळकर यांस अहिल्याबाईंचा आशीर्वाद, तुम्ही शेगाव परगण्यात लोकांवर मन मानेल तसा जुलूम करून त्यांच्याकडून पैसे वसूल केले आहेत.
 
प्रजेच्या मामल्यासाठी महालच्या अधिकाऱ्यांना तुम्ही तंग केलेत. ह्याचे काय कारण? तुम्हास कळवण्यास येते की, आजपर्यंत तुम्ही मन मानेल त्याप्रमाणे रुपये वसूल केलेत. त्याचा खुलासा सरकारात पेश करावा.
 
यापुढे देण्या-घेण्याच्या संबंधात स्वार पाठवून कोणत्याही प्रकारचा अन्याय केलात आणि त्याबद्दल तक्रार आली तर तुमचे ते कार्य अक्षम्य समजले जाईल.'
 
आपल्याच शासनकर्त्यांवर अशा पद्धतीने वचक ठेवणाऱ्या आणि त्यांना सतत कर्तव्याची जाणीव करुन देणाऱ्या अहिल्याबाई जनतेच्या एकेक पैशाचा हिशोब चोख ठेवत होत्या.
 
सरकारी तिजोरी आणि खासगी तिजोरी वेगळी
अहिल्याबाईंनी खासगी आणि सरकारी तिजोरीचे हिशेब वेगळे ठेवले होते. महेश्वर दरबारची पत्रे या पुस्तकात या व्यवहारांमधला पारदर्शकपणा पाहायला मिळतो असं इतिहासकार म्हणतात.
 
'सरकारी तिजोरीची भिस्त वेगवेगळ्या करांवर असे. माळव्याचा वसूल 74 लाख रुपये इतका होता, अहिल्याबाईंच्या काळात तोच महसूल वाढून 1 कोटी साडेपाच लाख इतका झाला.'
 
जहागीरदार लिहितात- 'युद्ध ही विनाशकारी प्रथा आहे असं अहिल्यादेवींचं मत होतं. पहिलं कारण त्यामुळे प्रजेची हानी होते आणि ज्या धनामुळे लोकांची प्रगती होण्याची शक्यता असते त्या धनाचा दुरुपयोग युद्धात होतो.
 
खेरीज राज्याचा नेता युद्धात गुंतल्यामुळे प्रजेला त्यांचा उपयोग होत नाही. अशा बुद्धीमान व्यक्तिचा युद्धात विनाश होण्याचा संभव असतो. राज्याच्या तिजोरीवरही भार पडतो. या शक्तिचा उपयोग राज्याचे नंदनवन करण्यासाठी व्हावा असा त्यांचा दृष्टीकोन होता. त्यांचं धोरण साम्राज्य वाढवण्याचं नव्हतं. '
 
अहिल्याबाईंची इच्छा नसताना अंतर्गत कलहामुळे होळकर आणि शिंदे यांच्यात अखेरीला लढाई झाली.
 
पुढे निजाम आणि पेशव्यांमध्ये झालेल्या खर्ड्याच्या लढाईत अहिल्याबाईंनी होळकरांची कुमक पेशव्यांच्या सैन्यात पाठवली. ही लढाई पेशव्यांनी जिंकल्यानंतर महेश्वरमध्ये विजय साजरा झाला.
 
त्यानंतर काही महिन्यांतच 13 ऑगस्ट 1795 या दिवशी वयाच्या सत्तराव्या वर्षी लोकनेत्या, कुशल प्रशासक आणि मुत्सद्दी अहिल्याबाई यांचं निधन झालं.
 
संदर्भ :
तेजस्विनी अहिल्याबाई होळकर- लेखिका विजया जहागिरदार
ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर - लेखिका विनया खडपेकर
होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास- लेखक गणेश मतकर
मराठी रियासत- स. मा. गर्गे संपादित


Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा पोटनिवडणूक : पुणे तिथे 'महाविकास आघाडीची एकी' उणे!