Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही

सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही
बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. असे म्हणतात की पुण्यास जाताना चौंडीस येथे  त्यांनी 8 वर्षाच्या अहिल्यादेवींना एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.
 
अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते.
 
अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. त्यांना अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावरवर विश्वास होता. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. 
 
त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
 
अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. 
 
अहिल्याबाई एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले. 
 
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.  अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांच्या यादीत काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरेचे समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Cup 2019: या प्रकारे सर्व सामने आपल्या मोबाइलवर पहा