आजच्या दिवशी सगळे जण उत्साहात एकच काम करत असतील. लोकांना 'वेड्यात काढायचं'. अर्थात मी हा लेख लिहून कोणाला 'वेड्यात काढत' नाहीये. म्हणजे प्लॅन असाच होता की लेख लिहिते, लिहिते असं म्हणायचं आणि मग 1 एप्रिल ला संपादकांना म्हणायचं, कशी गंमत! मी लिहिलाच नाही लेख. एप्रिल फूल!!
पण संपादकांना 'वेड्यात काढायला' आम्हा पत्रकारांना वर्षातले इतरही 364 दिवस असतात. ("सर, फिल्डवर आहे..." सांगून दुपारी झोपणारे आम्हीच) त्यामुळे आज नको म्हटलं.
असो मुद्दा हा की लोकांना 'येड्यात काढण्याची' परवानगी देणारा हा दिवस नक्की आला तरी कुठून? का सुरू झाली ही पद्धत आणि अजूनही का चालू आहे?
एप्रिल फूलच्या दिवसाला ऑल फूल्स डे असंही म्हणतात. जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये हा दिवस 1 एप्रिलला साजरा केला जातो.
या दिवशी आपल्या मित्रमैत्रिणींवर, नातेवाईकांवर किंवा घरच्यांवर जोक मारायचे, त्यांना खोटं सांगून फसवायचं, प्रॅक्टिकल जोक करायचे असे अनेक उद्योग मंडळी करतात.
एनयाक्लोपिडीया ऑफ ब्रिटनिकाच्या संदर्भानुसार हा दिवस कधी सुरू झाला, याचा नक्की उगम काय हे सांगता येणार नाही. पण प्राचीन रोममध्ये साजऱ्या होणाऱ्या हिलारिया सणाशी मिळता जुळता हा दिवस आहे.
फ्रान्समध्ये उगम?
काहींच्या मते एप्रिल फूल या दिवसाचा उगम फ्रान्समध्ये झाला.
त्याचं असं झालं की 1564 मध्ये फ्रान्सचा राजा चार्ल्स नववा याने जाहीर केलं की फ्रान्समध्ये नवीन वर्ष 1 जानेवारीपासून सुरू होईल. त्याआधी ख्रिश्चन देशांमध्ये नवीन वर्ष इस्टरच्या सणानंतर (म्हणजे साधारण मार्चचा शेवटचा आठवडा, एप्रिलचा पहिला आठवडा) सुरू व्हायचं.
पण इस्टरचं कॅलेंडर आपल्या भारतीय कॅलेंडर प्रमाणेच चंद्राच्या हालचालींवर ठरायचं. म्हणजे त्याची तारीख ठरलेली नव्हती. म्हणून मग सौर कालगणनेप्रमाणे एक जानेवारीपासून नववर्षं साजरं करायचं ठरलं.
25 मार्चला इस्टरचं नवं वर्ष सुरू व्हायचं आणि एक एप्रिलला नववर्षाच्या उत्सवाची सांगता व्हायची. फ्रेंच राजाने तर सांगितलं की आपण ग्रेगोरियन कॅलेंडर वापरायचं, म्हणजे एक जानेवारीला नवीन वर्ष सुरू होणार.
पण तरीही जे लोक राजाच्या या आदेशानंतरही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच नवीन वर्ष साजरं करायचे, विशेषतः जे फ्रेंच नव्हते, त्यांना एप्रिलचे मुर्ख (एप्रिल फूल) असं म्हटलं जाऊ लागलं.
तर काहींचं म्हणणं आहे की या दिवसाचा उगम 21 मार्चच्या सूर्याच्या पोझिशनमध्ये आहे. 21 मार्चला व्हर्नल इक्विनॉक्स म्हणतात म्हणजे या वर्षातल्या या दिवशी दिवस आणि रात्र समसमान काळाचे असतात.
या दिवशी वातावरणात जे बदल होतात (भारतासारख्या उष्णकटीबंधीय प्रदेशात जाणवत नाही कारण उन्हाळाच असतो, पण समशीतोष्ण प्रदेशात वातावरणातले बदल प्रकर्षाने जाणवतात) त्यामुळे कोणताही माणूस मुर्खात निघू शकतो.
या दिवसाची प्रेरणा घेऊनच एप्रिल फूल दिवस साजरा केला जातो असाही एक मतप्रवाह आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिवस साजरा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत पण सगळ्या परंपरामध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे समोरच्याला वेड्यात काढायची.
फ्रान्समध्ये ज्या माणसाचा या दिवशी 'पोपट होतं' त्याला फ्रेंच भाषेत 'एप्रिल फिश' असं म्हणतात.
याचा संदर्भ छोट्या माशांशी जोडता येऊ शकतो जे पटकन जाळ्यात अडकतात. फ्रेंच लहान मुलं या दिवशी त्यांच्या मित्रांच्या पाठीवर कागदी मासे चिकटवतात.
एप्रिल फूलला फिश डे म्हणण्यामागे हेही कारण असू शकतं की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फ्रान्सचे झरे आणि नद्यांमध्ये माशांची संख्या वाढते. हे मासे अलगद जाळ्यात येतात. जणू काही मुर्ख मासे आहेत. फ्रेंच लहान मुलं या दिवशी त्यांच्या मित्रांच्या पाठीवर कागदी मासे चिकटवतात.
स्कॉटलंडमध्ये याच दिवशी 'गॉकी डे' साजरा होतो. याचा शब्दशः अर्थ 'मुर्खाचा दिवस'. याला एक कमी प्रचलित पण लैंगिक अर्थ पण आहे, तो म्हणजे ज्याच्या बायकोने त्याला धोका दिला आहे, किंवा ज्याच्या बायकोचे दुसऱ्याशी संबंध आहेत आणि त्याला माहिती नाही, असा मुर्ख.
या दिवशी मित्रांच्या पाठीवर 'किक मी' असं लिहिलेलं कागद चिकटवायची पद्धत स्कॉटलंडमध्ये आहे.
एप्रिल फूल दिवसाच्या उगमाच्या काही आणखी कथा
काही इतिहासकारांच्यामते इंग्लिश कवी जेफ्री चॉसर याने 14 व्या शतकात एक कविता लिहिली होती. ज्यात एक कोल्हा एक कोंबड्याला कसं मुर्ख बनवतो याची गोष्ट आहे. ही घटना एक एप्रिलला घडली असावी असा संदर्भ आहे.
कवीने तारीख लिहिलेली नाही, पण मार्च महिना सुरू झाल्यानंतर 32 व्या दिवशी ही घटना घडली असं वर्णन आहे. त्यावरून लोकांनी अंदाज काढला की मार्चचे 31 दिवस आणि 32 वा दिवस म्हणजे एक एप्रिल, आणि म्हणून एक एप्रिलला लोकांना मुर्खात काढण्याची पद्धत सुरू झाली असावी.
पण काही लोकांचा याही थिअरीवर विश्वास नाही आणि ते म्हणतात की ही कथा सांगून चॉसर त्याच्या वाचकांनाच वेड्यात काढतोय.
काहींचं म्हणणं आहे की प्राचीन रोममध्ये एक सण साजरा केला जायचा. प्राचीन रोमचं नववर्षही वसंतात म्हणजे याच सुमारास सुरू व्हायचं.
या सणाचा भाग म्हणून आयुष्यात ज्या ज्या गोष्टी नॉर्मल असतील तर करायच्या नाहीत असं ठरलेलं असायचं.
म्हणजे नोकर या काळात घरमालक होणार. मुलं आपल्या आईवडिलांवर आवाज करणार. सगळंच उलटंपालटं होणार. इथूनच एप्रिल फूल डेची पद्धत सुरू झाली असावी.
उत्तर युरोपतल्या लोकांनी ही पद्धत जगभरात पसरवायला सुरूवात केली. अमेरिकेतही एप्रिल फूल दिवस साजरा व्हायला लागला.
पण एक नक्की की एप्रिल फूल करण्याची पद्धत अनेक शतकांपासून सुरू आहे.
मॉर्डन काळात ही पद्धत फक्त लोकांनी एकमेकांना वेड्यात काढण्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. मोठमोठ्या कंपन्या आणि वृत्तसंस्थांनी पण आपल्या ग्राहकांना किंवा वाचकांना वेड्यात काढलेलं आहे.
1957 साली बीबीसीनेच आपल्या प्रेक्षकांवर प्रँक केला होता. बीबीसीने एक स्टोरी अगदी टीव्हीवर दाखवली ज्यात स्पॅघेटीची (इटालिनय नुडल्स) शेती कशी करतात ते दाखवलं होतं. अगदी रितसर पांढऱ्या नुडल्स झाडावर लटकलेल्या दिसत होत्या.
तरूणी त्या झाडावरून तोडत होत्या, उन्हात वाळवायला ठेवत होत्या आणि शेवटी त्याच नुडल्स शिजवून लोक खात आहेत असं साग्रसंगीत दाखवलं होतं.
स्पॅघेटी किंवा नुडल्स हा प्रकार त्याकाळी इंग्लंडमध्ये फारसा प्रचलित नव्हता. लोकांना याबद्दल फारसं माहिती नव्हतं. त्यामुळे लोकांना खरंच नुडल्स झाडावर उगवतात असं वाटलं.
हा कार्यक्रम टीव्हीवर दाखवला गेल्यानंतर हजारो प्रेक्षकांनी बीबीसी ऑफिसात फोन करून स्पॅघेटीची शेती कशी करतात हे विचारलं होतं.
पण आताच्या फेकन्युजच्या काळात कंपन्यांनी असे जोक करणं बंद केलं आहे. मायक्रोसॉफ्ट किंवा गुगलसारख्या कंपन्या यादिवसासाठी खास मेमो काढून आपल्या कर्मचाऱ्यांना सांगतात की असे कुठलेही जोक अधिकृतरित्या, अनधिकृतरित्या, सोशल मीडियावर करू नका.
मायक्रोसॉफ्टचे मुख्याधिकारी एखदा म्हणाले होते की, 'असे उद्योग केल्याने सकारात्मक फारसं घडत नाही पण कंपनीची नकारात्मक छबी तयार होते.'
त्यामुळे यंदा मोठ्या कंपन्या तुम्हाला मुर्खात काढणार नसल्या तरी तुमच्या जवळच्या लोकांची गॅरेंटी नाही. त्यामुळे जरा सांभाळूनच!