Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाळणाघरांपासून वृद्धांश्रम अर्थातच डे केअर : शाप की वरदान

पाळणाघरांपासून वृद्धांश्रम अर्थातच डे केअर : शाप की वरदान
, शनिवार, 13 एप्रिल 2019 (12:40 IST)
आयटीच्या क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे की, यातूनच डे केअरची संख्या वाढीस लागली आहे. घरातील लहान मुलामुलींबरोबरच ज्येष्ठ व्यक्‍तीना देखील डे केअरमध्ये ठेवले जाते. सकाळी ठेवायचे आणि संध्याकाळी घरी घेऊन यायचे, हे चित्र सध्या बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या मतांना कोणतीही किंमत आज राहिलेली नाही. त्यांनी कष्ट करून मिळवलेल्या घरातूनच दररोज सकाळी त्यांची हकालपट्टी होते. एकट्या व्यक्‍तीचे तर अतोनात हाल होताना दिसतात. डे केअरमध्ये या व्यक्‍तींना सकाळचा चहा, नाश्‍ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्‍ता पुरवला जातो मात्र घरात मिळणारे प्रेम तिथे मिळत नाही. करमणुकीचे कार्यक्रम व सर्व सोयीसुविधा त्यांना दिल्या जातात. त्याबदल्यात मोठे शुल्क आकारले जाते.
 
आज नोकरदार माणसांकडे अशा व्यक्तींना सांभाळण्यासाठी घरात नोकरचाकर ठेवले जातात आणि त्याच्या जोडीला डे केअरची मदत घेतली जाते. ज्या मुलांना पाळणा घरात ठेवले जाते, तीच मुले मोठी झाल्यावर आई-वडील व सासुसासऱ्यांना अशाच डे केअरमध्ये ठेवतात. आजच्या काळात घरातील वरिष्ठ व्यक्ती अडगळीची गोष्ट किंवा डस्टबिन ठरत आहे ही वस्तुस्थिती आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा केव्हाच ऱ्हास झाला आहे. आता सगळीकडे फक्त राजाराणीचे संसार सुरू आहेत. पुण्याबाबत बोलायचे झाले तर आज वृद्धाश्रमांइतकीच डे केअरची संख्या वाढली आहे हे चिंतेचा विषय आहे. आम्हाला डे केअरमध्ये संपूर्ण स्वातंत्र्य मिळते असे जरी ज्येष्ठ व्यक्ती म्हणत असल्या, तरी त्यामागे एक प्रकारची मजबुरीच दिसून येते. एखाद्या आश्रितासारखे आयुष्य वाट्याला येणे यापेक्षा वेगळी शोकांतिका काय असणार? ज्यांना लहानाचे मोठे केले, ज्यांचे लाड पुरवले, ज्यांना हवी ती गोष्ट उच्चारताक्षणीच हातात दिली गेली , तीच मुलं आज कोणते पांग फेडत आहेत, असा प्रश्‍न या वृद्धांसमोर पडला आहे. कितीही विचार केला तरी वृद्धाश्रम किंवा डे केअर हा काही पर्याय असू शकत नाही. घरात एखादा नोकर ठेवून त्यांची काळजी घेता येणे सहज शक्‍य आहे. मात्र डे केअरचा अट्टहासच सर्वत्र दिसून येतो.
 
पाळणाघरांपासून वृद्धांश्रमांपर्यंत सर्वत्र राहणारे वृद्ध आणि त्यांना भेडसवणारे प्रश्‍न काळजाचा ठाव घेऊन जातात. गोंदवलेकर महाराज शंभर वर्षांपूर्वी म्हणाले होते की, एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होणार आहे. आज त्यांचा शब्द खरा ठरला आहे. कांहीना डे केअर शाप वाटत आहे, तर कांहीना परिस्थितीशी जुळते घेऊन वरदान वाटत आहे. आर्थिक स्तर उंचावला गेला असला, तरी मानसिक स्तर अद्याप गर्तेतच अडकला आहे. आई-वडीलांना घरापासून लांब ठेवून त्यांच्या माथी एकटेपणा चिकटवला जातो. वृध्दाश्रम आणि डे केअर यातील फरक सांगायचा झाला तर दगडापेक्षा वीट मऊ असेच म्हणावे लागेल. डे केअर शाप की वरदान, हे ज्याचे त्याने ठरवावे.
 
एकाकी आयुष्य जगणाऱ्यांना जोडीदाराच्या मृत्यूनंतर व अन्य कांही कारणांमुळे डे केअरमध्ये राहावे लागते. स्वतःवरची जबाबदारी ढकलून आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्‍तींना डे केअरमध्ये ठेवले जाते, हे चित्र अनेक घरांमध्ये दिसून येते. डे केअर काळाची गरज आहे असे जरी असले, तरी त्यात राहणाऱ्यांच्या मतांचा विचार का केला जात नाही असेही वाटते. कोणीही राजीखुषीने डे केअरमध्ये जात नाही, तर त्याला तिथे ठेवले जाते. आज ही डे केअर किंवा वृद्धाश्रम समाजस्वास्थ बिघडवत आहे हे मात्र शंभर टक्‍के खरे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता ट्रॅफिकमध्ये देखील नंबर वन होण्याच्या तयारीत इंदूर, हवाई सुंदरींनी घेतली कमांड