विमान प्रवास करणारांना आपल्यासोबत मर्यादितच सामान घेता येते. त्यापेक्षा अधिक सामान सोबत नेले तर त्या सामानाचे वजन करून जादा सामानावर जादा आकार लावला जातो. म्हणजे जादा सामान नेणे शेवटी महागात पडते. हा जादा दराचा नियम केवळ सामानालाच लागू होतो पण तो माणसालाही लागू झाला पाहिजे. कारण माणसेही कमी जास्त वजनाची असतात. जादा सामानाला जादा दर लावला जातो तसे जादा लठ्ठ प्रवाशांनाजादा तिकीट का लावू नये ? बॅग कितीही वजनाची असो तिचे लगेज आकारताना एका बॅगेला एवढे एवढे तिकिट असे बॅगेमागे तिकीट आकारले जात नाही. माणसाला मात्र या बाबतीत सूट आहे. माणूस जादा वजनाचा असो की कमी वजनाचा असो त्यांना समान तिकीट असते.
आता मात्र काही विमान कंपन्या याबाबतीत नवा विचार करायला लागल्या आहेत. माणसाला तिकीट लावताना त्याच्या आकारावरून आणि वजनावर लावले जावे अशी कल्पना सॅमोआ बेटावरच्या विमान कंपनीने मांडली आहे. शेवटी विमान प्रवास आणि वजन यांचा काही संबंध जोडला जात असेल तर तो संबंध तसा माणसाच्या वजनालाही लागू झाला पाहिजे.
या विमान कंपनीने म्हणून माणसांच्या तिकिटाचा एक तक्ता तयार केला आहे. त्यात प्रवासाचे दर माणूस किती लठ्ठ आहे यावरून दाखवले गेले आहेत. तिकिट काढणार प्रवाशाला ऑनलाईन तिकीट काढताना त्याचे वजन नमूद करावे लागेल. वजन वाढले की प्रवासाचे दरही वाढतील. सॅमोआ बेटावर लठ्ठपणा हा मोठाच प्रश्र्न आहे कारण या बेटाचा समावेश जगातल्या वजनदार लोकांच्या टॉप 10 च्या यादीत पहिल्यांदा केला जात असतो.