Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Indira Gandhi death anniversary : इंदिरा गांधी पुण्यतिथी

indira gandhi
, रविवार, 30 ऑक्टोबर 2022 (09:30 IST)
भारतातील प्रत्येक खेड्यापाड्यात व घराघरात परिचित असलेला शालीन चेहरा कोणाचा असा प्रश्न केल्यास, त्याचं एकमेव उत्तर येईल ते म्हणजे इंदिरा गांधी. आपल्या कर्तृत्वाने इंदिराजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. या पदावर काम करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणावरही प्रभाव पाडला. पाकिस्तानशी झालेले 1971 चे युद्ध, स्वतंत्र बांगला देशाची निर्मिती, अलिप्त राष्ट्रांच्या प्रमुख म्हणून त्यांची कणखर भूमिका, सुवर्णमंदिरात लपलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही लष्करी कारवाई या काही त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना. 31 ऑक्टोबर हा इंदिराजींचा पुण्यतिथी दिन 'राष्ट्रीय संकल्प दिवस' म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त इंदिराजींच्या जीवन कार्याची ही थोडक्यात माहिती......
 
स्वातंत्र्याची उत्कंठा 
आपला देश ब्रिटिशांच्या हुकूमतीतून मुक्त व्हावा याची आस इंदिराजींना फार लहान असल्यापासून होती. लहानपणापासूनच स्वातंत्र्य संग्राम अगदी जवळून पाहिल्यामुळे देशभक्तीची भावना त्यांच्या हृदयात भिनली होती. लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनात त्या आजोबा मोतीलाल व वडील जवाहरलाल यांच्या समवेत होत्या. खरं म्हणजे नेहरु घराण्याला देशभक्तीचा एक समृद्ध वारसाच लाभला होता. इंदिराजींचे पती फिरोज गांधी यांचेदेखील स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान होतं. ते एक सच्चे व निष्ठावान देशभक्त होते. मुंबईच्या ग्वालियर टँक येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी ब्रिटीश राज्यकर्त्यांना 'चलेजाव'चे फर्मान बजावल्यावर इंदिराजींनी स्वत:ला सत्याग्रहात झोकून दिलं.
 
देश स्वयंसिद्ध असावा
देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या नेहरूंची सावली म्हणूनच वावरत होत्या. पुढे पंतप्रधानपदही त्यांना मिळाले. अनेकांना ते वारशात मिळाले असे वाटले. पण हे पद त्यांना त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळाले हे त्यांनी नंतर सिद्ध करून दाखवले. जगातील महाशक्तींवर विसंबून न राहता, आपण प्रत्येक क्षेत्रात स्वयंसिद्ध असावयास पाहिजे, ही इंदिराजींची ठाम भूमिका होती. त्या पंतप्रधानपदी असताना 18 मे 1974 रोजी राजस्थानच्या वाळवंटातील पोखरण येथे अणुशक्ती मंडळामार्फत अणुस्फोटाची भूमिगत चाचणी त्यांनी यशस्वी करुन दाखविली. 
 
कुठल्याही परकीय आक्रमणास समर्थपणे सामोरे जाण्यासाठी स्वयंसिद्ध असणे, हे त्यांचं धोरण होतं. आण्विक शक्तीचा उपयोग रचनात्मक कार्यासाठी केला जाईल, हा संदेश त्यांनी जगाला दिला. यासंदर्भात लोकसभेत स्पष्टीकरण करताना त्या म्हणाल्या, 'कोणतंही तंत्रज्ञान दुष्ट नसतं, तर राष्ट्र त्याचा कसा वापर करते, यावर ते अवलंबून असतं.' आधुनिक तंत्रज्ञानचा अंगिकार करुन भारत हा कोणत्याही बाबतीत मागे नाही, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं आणि हिंदुस्थानाला जगाच्या नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिलं.
 
अतिथी देवो भव
महात्मा गांधी, आजोबा मोतीलाल, पिता जवाहरलाल तसेच आई कमला नेहरु यांच्या आज्ञा त्या शिरसावंद्य मानीत. वडीलधार्‍यांचा आदर, सन्मान करणे हे संस्कार त्यांच्यावर लहानपणीच रुजवले गेले होते. त्यामुळे त्यांच्या मनात वडीलधार्‍यांविषयी निस्सिम प्रेम व आदर असे. आदरातिथ्याबाबत तर इंदिराजी नेहमी सर्वांच्या पुढे असत. पं‍डीत नेहरुंबरोबर त्यांनी देश-विदेशात भ्रमण केल्याने त्या त्या देशातील लोकांच्या आवडीनिवडीविषयी इंदिराजींना पुरेपूर माहिती होती. म्हणूनच भोजनाचा मेनू त्या स्वत:च तयार करीत असत. आपल्याकडे स्नेहभोजनास बोलावण्यात आलेली मंडळी ती भारतीय असो व परदेशी त्यांची नीट खातिरदारी करणे, हे त्यांच्या स्वभावातील गुणवैशिष्टय होतं. 
 
निसर्गाशी समरस
इंदिराजींची राजकारणाव्यतिरिक्त अन्य विषयातील अभिरुची पाहून कोणालाही आश्चर्य वाटत असे. त्यांना झाडं, फुलं, अरण्य, वन्य प्राणीजीवन, डोंगर-दर्‍या आणि पर्यावरण यात राजकारणाइतकाच रस होता. आपल्या निवासस्थानी असलेल्या बागेची त्या नित्यनियमाने मशागत करीत असत. इतकेच नव्हे तर, त्या स्वत: मोठ्या हौसेने रंगीबेरंगी फुलांची झाडं लावत असत. हा त्यांचा दैनंदिन कामकाजातील एक मुख्‍य भाग होता. निसर्गाशी समरस होऊन फुलझाडं लावणं व त्याची देखभाल करणे, हा त्यांचा छंद होता. हेच त्यांच्या निसर्गप्रेमाचं प्रतीक होतं.
 
पराभव स्वीकारण्याचे धारिष्ठय 
1977 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावरही इंदिराजींचा चेहरा निर्विकार होता, हे अनेकांना त्याप्रसंगी जाणवलं. त्यांनी आपला पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारला. जनतेच्या जनाधाराचा आदर केलाच पाहिजे, असं त्यांनी आपल्या सहकार्‍यांना आवर्जून सांगितलं. पराभव शालिनतेने पचविणे, हे त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे द्योतक होते. राजकीय व सामाजिक जीवनात काम करीत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. परंतु, न डगमगता त्यांनी या सर्व संकटांना धीरोदात्तपणे तोंड दिलं. धैर्य हा इंदिराजींचा स्थायीभाव होता.
 
वक्तृत्व कलेत वाकबगार
इंदिराजी जाहीर समारंभात मुख्यत: हिंदीत भाषण करीत. हिंदीवर त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं. श्रोत्यांशी सहजरित्या संवाद साधून त्यांना त्या मंत्रमुग्ध करुन टाकीत. संसदेत विरोधी पक्षांनी डिवचलं तर त्यांचं तयार भाषण बाजूला ठेऊन रोखठोक शैलीत विरोधकांचा समाचार घेत. विरोधकांच्या प्रश्नांवर उलट प्रश्न करुन त्या विरोधकांना बुचकळ्यात टाकीत असत. इतकेच नव्हे तर, त्या आपल्या भाषणशैलीने विरोधकांना माघार घेण्यास भाग पाडत असत. अलिप्त राष्ट्रांच्या परिषदेतील त्यांची भाषणे आजही राज्यकर्त्यांच्या स्मरणात आहेत. गतकाळात तर त्यांच्या वक्तृत्व कलेला तोड नव्हती.
 
पोलादी महिला म्हणून ख्याती
पाकिस्तानी लष्कराचे जनरल याह्याखान यांच्या हुकूमशाही राजवटीतून बांगला देशाला मुक्त करण्यात इंदिराजींनी पुढाकार घेतला. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची आग्रही भूमिका होती. टीकेची पर्वा न करता त्या खंबीर पावलं उचलायला डगमगत नसत. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू होता. इंदिराजी पंतप्रधानपदी असताना पश्चिम पाकिस्तानाच्या लष्करी अत्याचाराला कंटाळून सुमारे एक कोटी निर्वासित बांगलादेशी भारतात आश्रयासाठी आले. अशा बिकट प्रसंगी इंदिराजींनी मानवतेच्या भावनेने निर्वासितांना आश्रय दिला. 
 
पाकिस्तानी लष्करशाही राजवटीचे खरेखुरे चित्र जगापुढे ठेऊन पाकिस्तानाला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडलं. हे त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचे द्योतक होतं. अशा धाडसी निर्णयांमुळेच त्यांची जगात पोलादी महिला म्हणून ख्याती होती. इंदिरा गांधींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नवनिर्मित बांगला देशाचे अध्यक्ष मुजिबूर रहेमान म्हणाले की, इंदिराजी केवळ भारतीय जनतेच्या नव्हे तर, अखिल मानव जातीच्या नेत्या होत.
 
परराष्ट्र धोरणावर प्रभुत्व
भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडीत जवाहरलाला नेहरु यांच्याकडून परराष्ट्र धोरण कसं हाताळायचं, विदेशी नेत्यांशी कसा संवाद साधावयाचा याचे प्रशिक्षण इंदिराजींना मिळालं. परदेशी शिष्टमंडळाशी कशाप्रकारे चर्चा करावी, याबाबत त्या परांगत होत्या. इंदिराजींनी परराष्ट्र धोरणाविषयक बाबी अत्यंत कौशल्याने व मुत्सद्दीपणाने हाताळून पाश्चिमात्य जगतातील बड्या नेत्यांचा विश्वास संपादन केला. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसारख्या विकसित राष्ट्रांना त्यांनी दिलेल्या भेटी व तेथील नेत्यांशी केलेल्या वाटाघाटी यातून भारताची नेमकी प्रतिमा ठसविण्यात त्या यशस्वी झाल्या. 
  
इंदिराजी अलिप्तवादी व विकसनशील देशांच्या खर्‍या पुरस्कर्त्या होत्या, हे अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनीही मान्य केलं होतं. भारत-रशियामधील संबंध वृद्धिंगत करण्यात इंदिराजींचा सिंहाचा वाटा होता. इंदिराजींनी आपल्या कार्यकर्तृत्वाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचं स्थान मिळवून दिलं. 1983 मध्ये जगातील तटस्थ राष्ट्रांच्या गटाच्या अध्यक्षपदी इंदिराजींची बिनविरोध निवड होणे, ही त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीची फलश्रुती होती. इतकेच नव्हे तर, तिसर्‍या जगाचा वादातीत आवाज म्हणून त्यांची जगात ओळख होती. जुलै 1964 मध्ये लंडन येथे झालेल्या राष्ट्रकूल परिषदेत भारत-आफ्रो-आशियाई देशांमध्ये मैत्री व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात इंदिराजींनी मोलाची भूमिका बजावली. त्या खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेत्या होत्या.
 
रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा 
ओरिसा दौर्‍यात भुवनेश्वर येथील जाहीरसभेत बोलताना माझ्या रक्तातील प्रत्येक थेंबन थेंब देशासाठी खर्ची पडेल...... असे भविष्यसूचक उद्‍गार इंदिराजींनी काढले होते. त्या भाषणाची दृश्ये दुरदर्शनवर त्यावेळी लाखो लोकांनी पाहिली होती. त्याच दिवशी 30 ऑक्टोबरला रात्री त्या दिल्लीला परतल्या. 31 ऑक्टोबरला सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या निवासस्थानातून कार्यालयाकडे निघाल्या असता त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी त्यांची धोक्याने हत्या केली. देशाचं स्‍थैर्य व ऐक्य यांचं प्रतीक असलेलं व्यक्तिमत्त्व एकाएकी काळाच्या पडद्याआड गेलं. खरं तर, इंदिराजींनी आपल्या व्यक्तिगत सुरक्षेची कधीच फिकिर केली नाही, याउलट त्यांना देशाच्या सु‍रक्षिततेची सदैव काळजी असे. इंदिराजी जरी आज आपल्यात नसल्यातरी त्यांचं कार्य सदैव भारतीयांना प्रेरणा देत राहील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नितीन गडकरींनी टाटांना लिहिले पत्र, म्हणाले- गुंतवणुकीसाठी नागपुरात या