आज AI Appreciation Day म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशंसा करण्याचा किंवा आभार व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या दैनंदिन जीवनातला AI चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपल्या आजच्या समस्यांचे उत्तर AI च्या माध्यमातून मिळेल का, याबद्दल संशोधक विचार करत आहेत.
वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष हा गेल्या काही दिवसात तीव्र होताना दिसत आहे. हा प्रश्न AI च्या मदतीन सुटू शकतो का? या प्रश्नाचा घेतलेला वेध.
"बिबट्या मागं लागलाय म्हणून मी गाडी शेतात घातली. गाडी पडली. वळून बघितलं तर बिबट्या हल्ला करायच्या तयारीत होता.. मी जोरात आरडलो.. बिबट्या-बिबट्या..आई आई करुन हाका मारल्या.. मग तो पळून गेला.”
जानेवारी महिन्यात बिबट्याशी झालेल्या सामन्याचं वर्णन करताना जुन्नरच्या बोरी गावच्या ऋषी कोरडेंच्या अंगावर आजही काटा येतो.
बिबट्या माघारी फिरला नसता तर कदाचित या वर्षी या भागात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या 4 जणांमध्ये आणि गेल्या पाच वर्षात प्राण्यांच्या हल्ल्यात देशभरात मारले गेलेल्या 5104 जणांमध्ये त्यांचाही समावेश झाला असता.
त्यांच्या घरापासून अगदी काही अंतरावरच बिबट्याने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. आज मात्र त्याच रस्त्यावरुन जाताना ऋषी कोरडेंना तेवढी भीती वाटत नाही.
याचं कारण म्हणजे इथे जर बिबट्याचा वावर असेल तर त्याची माहिती त्यांना आधीच मिळते आहे. हे शक्य झालंय आर्टिफिशीयल इंटेलिजन्स मुळे.
मानव - वन्यप्राणी संघर्षाचा हा प्रश्न किती गंभीर आहे?
शिवरात्रीला आमचे मालक बेलपत्री आणायला जंगलाकडे गेले होते. पण, खूप वेळ होऊनही ते घरी आले नाहीत. शोधाशोध सुरू झाली तर कळलं की त्यांना वाघाने जंगलात ओढत नेलं. पोरीचं लग्न दीड महिन्यावर होतं तेव्हा, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशेजारी राहणाऱ्या सीतारामपेठच्या 50 वर्षांच्या कल्पना धांंडे सांगतात.
सहा वर्षांपूर्वी त्यांचे पती गुलाबराव धांडे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. पाठोपाठ दोनच वर्षात दीरही वाघाच्याच हल्ल्यात गेला. आपल्या दोन मुली आणि जावयासोबत मोलमजुरी करुन त्या कुटुंबाचा गाडा हाकतात.
वाघ आणि बिबट्याचा वावर असणाऱ्या भागातल्या जवळपास प्रत्येकाचीच परिस्थिती कल्पना धांडेंसारखी आहे.
कुठे माणसं मारली गेली आहेत तर कुठे प्राणी.
नॅशनल क्राईम रेकॅार्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये देशभरात झालेल्या अपघाती मृत्यूंपैकी 0.3 टक्के मृत्यू हे प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे झाले आहेत.
'घाबरून हल्ला करतात प्राणी'
यात 2022 मध्ये देशाभरात वाघांच्या हल्ल्यात 104 माणसं मृत्युमुखी पडली. यापैकी 52 मृत्यू एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातले होते. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार यापैकी राज्यनिहाय मृत्यू खालीलप्रमाणे आहेत.
कर्नाटक -1
मध्य प्रदेश -2
उत्तर प्रदेश -11
उत्तराखंड -03
पश्चिम बंगाल -01
तर महाराष्ट्र -85
ताडोबा 622.87 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेलं जंगल आहे. सध्या ताडोबा परिसरात वाघ, वाघिण आणि बछडे असे मिळून एकूण 93 वाघ आहेत.
ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाचे बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक सांगतात, "चंद्रपूर हा सर्वाधिक मानव-प्राणी संघर्ष असलेला जिल्हा. आम्ही अभ्यास केल्यावर दिसलं की इथं वाघांची संख्या वाढते आहे. परिणामी वाघ जंगलातून बाहेर पडत आहेत. जंगलाशेजारच्या शेतातून जात असताना लोक समोर दिसले तर वाघ दचकतात आणि माणसांवर हल्ला करतात."
ताडोबा हा भाग जंगलाचा. पण जुन्नरचा प्रश्न आणखी जटील आहे. कारण जुन्नर परिसरात बिबट्यांचा वावर आहे तो मानवी वस्तीत.
गेल्या पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात साधारण 40 गंभीर जखमी तर 16 मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. भारतीय वन्यजीव संस्थानने केलेल्या अभ्यासानुसार या परिसरात प्रति 100 चौरस मिटर साधारण 6-7 बिबटे आढळून येतात.
ही संख्या जंगलाइतकी आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने या परिसराला संभाव्य बिबट प्रवण आपत्ती क्षेत्र घोषित केलं आहे आणि 233 गावांना अतिसंवेदनशील म्हणून घोषित केली आहेत.
या वाढत्या संघर्षाला दुष्काळही कारणीभूत असल्याचं जुन्नरचे उपवनसंरक्षक नोंदवतात.
बीबीसी मराठीशी बोलताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते म्हणाले, "इथले 70 ते 80 टक्के बिबटे हे मानवी वस्तीत आहेत. उसाच्या शेतांमध्ये त्यांची वस्ती आहे. माणसांवरचे हल्ले गेल्या तीन महिन्यांमध्ये वाढले आहेत. जिथे हॅाटस्पॅाट आहेत जुन्नर तालुक्यात तिथं 6 हल्ले झालेत. त्यात 4 मृत्यू झाले. यात पाण्याची कमतरता आणि दुष्काळ हे कारण आम्हांला जाणवतं आहे.”
यावर नेमका काय उपाय करता येईल याचा विचार करत असतानाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेता येईल का याचा विचार सुरू झाला.
पाठक सांगतात, "एका मासिकात विमानतळावर एखाद्या व्यक्तीच्या चालण्यावरुन एआय त्या व्यक्तीला ओळखू शकतो असा लेख वाचला होता. वाघाचीही चालण्याची विशिष्ट पद्धत असते. त्यावरुन संशोधन सुरू झालं आणि ही यंत्रणा जन्माला आली.
"पहिली यंत्रणा बसवली गेली ती मार्च 2023 मध्ये. अर्थात वीज कनेक्शन नसणं, अलर्ट यायला 15-20 सेकंदांचा उशीर होणं अशी अनेक आव्हानं यात होती. आता 3 सेकंदात अलर्ट येतो. ताडोबामध्ये जवळपास 7 गावांमध्ये तर जुन्नर मध्ये सध्या प्रायोगिक तत्वावर एका ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे," पाठक सांगतात.
ही यंत्रणा चालते कशी ?
वनविभागाने यासाठी आधी हॉटस्पॅाटचा अभ्यास केला. हॉटस्पॅाट म्हणजे ज्या भागात सर्वाधिक हल्ले किंवा सर्वाधिक प्राणी दिसले आहेत अशा जागा.
यातून निवड करुन तिथं वीजेचं किंवा सोलारचं कनेक्शन दिलेला एक स्मार्ट कॅमेरा खांबावर लावला गेला आहे. त्या कॅमेऱ्यातून तिथून दिसणाऱ्या प्राण्यांचे फोटो काढले जातात.
या ईमेजेस मग इंटरनेटच्या माध्यमातून क्लाऊडवर पाठवल्या जातात. या क्लाऊडवर एक अॅनिमल क्लासिफिकेशन अल्गोरिदम या इमेज स्कॅन करतं. त्यातून दिसलेला प्राणी जर ईजा पोहोचवण्याची शक्यता असेल तर त्याचा अलर्ट 'वाईल्डलाईफ आय' या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवला जातो. तर परिसरातील लोकांसाठी हूटर बसवण्यात आला आहे.
अलर्ट पाठवला गेला की हुटर वाजायला सुरुवात होते. यानंतर लोकांनी सुरक्षित स्थळी जाणं अपेक्षित आहे. याशिवाय जुन्नर मध्ये वनविभागाचे अधिकारी देखील संबंधित रहिवाशांना फोन करुन याविषयी माहिती देतात.
ताडोबात यासाठी गावात पीआरटी टीम नेमली आहे. या टीमच्या तरुणांकडे वाईल्डलाईफ आय हे अप्लीकेशन असून त्यांना त्यांच्या परिसराचा अलर्ट येतो.
अलर्ट आल्यानंतर हे तरुण गावात मध्यभागी लावलेल्या भोंग्यावरून गावाच्या शेजारी वन्यप्राणी आला असून कोणीही त्या भागात जाऊ नका अशी सूचना ग्रामस्थांना देतात.
तसंच वन्यप्राणी ज्या कॅमेऱ्याकडे आलाय तिकडे समूहानं जाऊन फटाके फोडून त्यांना जंगलाच्या दिशेनं पळवून लावतात. जुन्नरमध्ये मात्र अद्याप अशी स्थानिक यंत्रणा बसायची आहे.
वाघ ते हत्ती सर्व प्राणी होतात ट्रॅक
ताडोबा जुन्नर सह भारतात पेंच अभ्यारण्यात ही यंत्रणा सध्या काम करते आहे. याशिवाय जीम कॅार्बेट आणि आसाम मध्ये देखील याचा प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
एआय यंत्रणा सुरू झाली तेव्हापासून वाईल्डलाईफ आय या अप्लिकेशनवर एकूण 2317 अलर्ट आले आहेत. यापैकी 1022 अलर्ट हे फक्त वाघाचे असून 561 अलर्ट बिबट्याचे तर 534 अलर्ट अस्वलाचे आहेत.
लोक जंगलात जातात तेव्हा सुद्धा एआय यंत्रणा अलर्ट देतेय असं एआय बसवणाऱ्या कंपनीचे उपसंचालक पियुष धुलिया सांगतात.
गेल्या काही वर्षात अशा प्रकारचे प्रयोग जगभरात होत आहेत. 2018 मध्ये WWF ने घेतलेल्या एका स्पर्धेत मानव आणि वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी अशा पद्धतीची दोन यंत्र तयार करण्यात आली ज्याचा वापर आशियाई हत्ती तसंच पोलर बेअर आणि वाघाच्या हालचालींची माहिती देण्यासाठी केला जाऊ शकतो.
गुगल 'वाईल्डलाईफ इन्साईट्स' आणि 'गुगल एआय' आणि 'वाईल्डलाईफ कॅान्झर्वेशन' तर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अशा पद्धतीचे हल्ले रोखण्यासाठी करण्यात आला होता.
ताडोबाच्याच ब्रह्मपुरीच्या परिसरात हा प्रकल्प राबवण्यात आला. ओडिशाच्या चांदक्का वाईडलाईफ विभागात तसेच सिमीलीपाल अभयारण्यात हत्ती, वाघ यांचे हल्ले रोखणे याबरोबरच वणवे रोखण्यासाठी देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे.
तसेच कोईम्बतूरमध्ये हत्तींकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी देखील एआयची मदत घेतली जात आहे.
अडचणी काय ?
ही यंत्रणा बसवल्यापासून हल्ल्यांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी झाल्याचं आकडेवारी दर्शवते. पण यातलं सर्वांत मोठं आव्हान आहे ते लोकांच्या वर्तणुकीचं.
ताडोबामध्ये अलर्ट असतानाही लोक जंगलात गेल्याच्या नोंदी आहेत. यामुळे मृत्यू देखील झाले आहेत. अर्थात याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे लोकांचं चरितार्थाचं प्रामुख्याने साधन आहे ते तेंदुपत्ता तोडणे.
ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या वनविभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एआय यंत्रणा बसविण्याआधी सात गावांमध्ये वाघाच्या हल्ल्यात चौघांचा मृत्यू झाला होता, तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.
पण, एआय यंत्रणा बसवल्यानंतर हा आकडा कमी झालेला दिसतो.यंत्रणा बसवल्यानंतर रत्नापूरच्या तुळशीदास सोनुलेंचा मृत्यू झाला तो ते जंगलात तेंदुपत्ता तोडायला गेले असताना वाघाने केलेल्या हल्ल्यात.
ते घरातून गेले तेव्हा गावाशेजारी लागलेल्या कॅमेऱ्यात ते दिसले आणि वनविभागाच्या गार्डने त्यांना थांबवलं सुद्धा होतं. एक तास थांबल्यानंतर शेवटी कागदावर सही करून पत्नी उर्मिलासह ते जंगलात गेले. त्यांना डोळ्यादेखत आपल्या नवऱ्याला वाघाच्या हल्ल्यात मरताना पाहिलंय.
आपल्या पतीवर झालेल्या हल्ल्याचं वर्णन करताना उर्मिलांना रडू कोसळलं.
"सव्वापाचला आम्ही घरुन निघालो तेव्हा गार्डन कुटीजवळ आम्हांला थांबवून जंगलात जाऊ नका म्हणून सांगितलं. सही घेतल्यावर जंगलात सोडलं. साडेसहाला जंगलात पोहोचल्यावर शिदोरी ठेवून तेंदूपत्ता तोडायला लागलो तोवर वाघाने हल्ला केला. वाघाने त्यांचं डोकं धरलं. मी पाहिलं तर वाघानं त्यांची मान वाकडी केली होती आणि तो त्यांना ओढून घेऊन गेला. मी ओरडले पण समोर जायची हिम्मत नव्हती."
त्या दोन लहान मुली 3 वर्षांचा मुलगा आणि वयस्कर सासुसासऱ्यांसोबत त्या राहत आहेत. जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
जुन्नरमध्ये यंत्रणा बसवल्यापासून 17 अलर्ट आले आहेत पण एकही हल्ला झाला नाही.
बिबट्या नेमका कुठे आहे याची माहिती मिळत असल्याने या अलर्टचा उपयोग होतो आहे. पण तो वनविभागाने सांगितल्याशिवाय अजून तरी ग्रामस्थांना कळत नाहीये. बोरी गावचे रहिवासी अमोल कोरडे म्हणाले, "बसवलेल्या हुटरचा आवाज कमी आहे. बिबट्या दचकू नये म्हणून तो तसा ठेवला गेला असावा. पण त्यामुळे वनविभागाने कळवल्याशिवाय आम्हांला सूचना मिळत नाही."
तसंच स्थानिक ग्रामस्थ अशोक कोरडे नोंदवतात की हा कॅमेरा एकाच दिशेला असल्याने दुसऱ्या बाजूला बिबट्या असेल तर त्याची सूचना मिळत नाही.
या हल्ल्यांमागची कारणे स्पष्ट करताना बीएनएचएस चे संचालक किशोर रिठे म्हणाले, "जुन्नरमध्ये उसाच्या शेतीत बिबट्याला लपण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे. बिबट्याने देखील त्या परिस्थितीला अडॅप्ट केले आहे. तिथेच ब्रिडींग होते. विदर्भात पाहिलं तर गेल्या 15 ते 20 वर्षांपूर्वी वाघांची संख्या मर्यादित होती. मात्र आता त्यात वाढ झाली आहे. त्यांना प्रजननासाठी योग्य परिस्थिती आणि जागा निर्माण करण्यात आल्या. प्राणी वाढले तरी माणसांची वागणूक तशीच राहते आहे. माणूस जेव्हा वाघ, बिबट्यांच्या क्षेत्रात जातो तेव्हा हे प्राणी हल्ला करतात."
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उपयुक्ततेबाबत बोलताना ते म्हणाले, "एआयमुळे डेटा गोळा होत आहे. त्यानुसार हल्ले कुठे जास्त होतात हे पाहून रेड झोन्स आखले जातात. या भागात गेल्यास हल्ला होण्याची मरण्याची शक्यता जास्त आहे हे स्पष्ट होतं. पण माहिती मिळाली तरी महत्वाचं आहे ते माणसांची वर्तणूक बदलणं आणि सूचना मिळाल्यानंतर त्यांनी या भागांमध्ये न जाणं."
Published By- Priya Dixit