अनलॉक नंतरचे जीवन

श्री. अमेय पद्माकर कस्तुरे

सोमवार, 29 जून 2020 (16:41 IST)
अनलॉक किती सुंदर कल्पना आहे, कम्प्युटरच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या zipped file ला Unzipped केल्यानंतर, त्या फाइल मधील गोष्टींना जितका आनंद होत असेल तितकाच आनंद अनलॉक झाल्यानंतर आपणा सर्वांना होईल. अनलॉक झाल्यानंतर सुरू होणाऱ्या जीवनात नक्कीच दोन बाजू असतील एक जशी नकारात्मक तर दुसरी ही सकारात्मक. आज आपण या लेखांमधून दोन्ही बाजूंचा विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
 
अनलॉकच्या काळात (किमान काही महिने तरी) येणारे दिवस हे कदाचित अर्ध्या भरलेल्या पेल्या सारखे वाटू शकतात. आता अर्धा भरलेला पेला म्हणजे नक्की काय? अर्धा भरलेला पेल्याचा संदर्भ म्हणजे येणाऱ्या काळात काही गोष्टी सुरू राहतील तर काही गोष्टी मर्यादित सुरू राहू शकतील. आता एक व्यक्ती म्हणून आपल्यालाच ठरवावे लागेल की अर्ध्या भरलेला ग्लासाकडे कुठल्या दृष्टीने पाहायचे. कारण आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जगण्याचा दृष्टिकोन येते काही महिने ठरवतील. या लेखात माझ्या स्वतःच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून मी काही विचार मांडत आहे जे कदाचित थोडेसे काल्पनिक वाटतील पण बरेचसे व्यवहार देखील असतील.
 
साधारणपणे मार्च तिसऱ्या आठवड्यात भारतात लॉकडाऊन आले. मी मुंबईत वास्तव्यास असल्यामुळे, रोजच्या धकाधकीच्या जीवनात सुरळीत चालणाऱ्या रेल्वेला एकदम ब्रेक मारल्यावर कसे वाटेल तसंच मलाही वाटू लागले. मलाच काय तर अर्थात पूर्ण देशातल्या नागरिकांना तसेच वाटू लागले असेल. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करायची सवय लागली आणि सभोवतालच्या जगाचा हस्तक्षेप नसताना आपण उत्कृष्टपणे आपले आयुष्य कसे जगू शकतो हे जणू जाणवू लागले. लॉकडाऊनला आता साधारण तीन महिने पूर्ण होत आले आहेत आणि अनलॉक देखील सुरू होऊ लागले आहे. अनलॉक सुरू झाल्यामुळे हळूहळू जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.
 
अनलॉक सुरू झाल्यामुळे पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षाला पिंजऱ्याचा दरवाजा उघडल्यावर जसे वाटत असेल तसेच काहीसे आपणा सर्वास देखील नक्कीच वाटत असेल. अनलॉक नंतरचे जीवन हे देखील लॉकडाऊन इतकेच व्यवस्थित आणि कटाक्षाने जगावे लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी फारसा वेळ न घालवता व्यवस्थित सुरक्षेच्या बाजू लक्षात घेऊन आपणास वेळ काढावा लागणार आहे. सुरुवातीचे काही महिने साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत ज्यांना वर्क फ्रॉम होम आज शक्य आहे त्यांनी घरूनच काम केलेले कधीही चांगले.  
 
अनलॉक झाल्यानंतर जाळ्यातून सुटलेल्या वाघाला फिरण्यास जसे जंगल ही तोकडे वाटते तसे आपल्याला वाटून नक्कीच चालणार नाही. बाहेर फिरताना सोशल डिस्टंसिंगचा वापर करणे अगदी अनिवार्य असेल. मला स्वतःला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हस्तांदोलन करायची सवय आहे पण, लॉकडाऊन मुळे ही सवय बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे आणि अनलॉक मध्ये देखील हस्तांदोलन करण्यापेक्षा भारतीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या नमस्कारालाच आपणास प्राधान्य देखील द्यावे लागेल.
 
बाहेर जाताना काही महिने तरी चेहऱ्यावर मास्क लावून फिरणे अगदी कटाक्षाने पाळावे लागेल. साबणाने स्वच्छ हात धुणे हे देखील तितकेच महत्त्वाचे राहणार आहे. ह्या जमेच्या बाजू असल्या तरी ऊणेच्या बाजू बघायची झाली तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मास्क लावण्याची एका सर्वसाधारण माणस विशेष सवय नसते, त्यामुळे धावताना किंवा वेगाने चालताना मास्क हा थोडासा नाकाच्या खाली ठेवल्यास श्वास घेण्यास त्रास होणार नाही तसेच सारखा हात धुताना पाण्याचा अपव्यय होऊ नये हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे अन्यथा पाण्याचा गैरवापर झाल्यामुळे आपणास पाणी संकटास सामोरे जाऊ लागू शकते. एक सुजाण नागरिकाचे दृष्टीने या सर्व बाबींचा विचार करणे आपणासाठी फार महत्त्वाचे आहे. 
 
बाहेर जाऊन खाण्याचा जर विचार केला, तर इतके दिवस घरचेच अन्न खाल्ल्यामुळे बाहेर जाऊन खायची इच्छा आपणा सर्वांनाच नक्कीच होईल. मला देखील होते परंतु काही दिवस बाहेरचे अन्न खाणे टाळलेलेच बरे अथवा हॉटेलमध्ये असणारी स्वच्छता बघून तिथे खाण्याचा निर्णय आपण घेऊ शकता. ही काळजी घेणे नक्कीच महत्त्वाचे असते अन्यथा कोरोना महाशय आपल्या सोबत घरी यायला नक्कीच तयार असतील. आपले आवडते जिन्नस बाहेर खाण्याऐवजी घरात राहून खाल्लेले कधीही चांगले.  

सुरुवातीचे काही दिवस तरी दुधाची तहान ताकावर भागवणे हे आपल्या सर्वांसाठी जास्त योग्य राहील. मी मुंबईत वास्तव्यात असलो तरी माझं मूळ गाव हे इंदुरच. त्यामुळे इंदूरच्या नातेवाइकांना, इंदूरच्या आनंदाला आणि अर्थातच इंदूरच्या शेवेला मी फार miss केलंय. आता लवकरच काही महिन्यात ती शेव पुन्हा मिळायला सुरू होणार ह्यामुळे मनोमन आनंद होत आहे. 
 
मी लहान असताना बाहेरून घरात यायच्या आधी अंगणामध्ये पाणी ठेवलेले असायचे जिथे पाय स्वच्छ धुऊन घरात येता यायचे. नंतर काळ परत्वे ही सवय मोडू लागली आता कोरोनाच्या त्रासामुळे आपण पुन्हा शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देऊ लागलो आहोत. फक्त फरक इतकाच आहे की अंगणात ठेवलेल्या पाण्याने आणि साबणाने हात पाय धुऊन घरी येण्या ऐवजी,  sanitizer ने हात धुणे व पायावर sanitizer स्प्रे मारून घरी येणे सुरू झाले आहे. मुंबईत ज्या इमारतीत आम्ही राहतो, तेथे सोसायटीत येणाऱ्या सर्व व्यक्तींना sanitize करूनच आत येऊ देतो व आम्ही स्वतःही बाहेरून येताना anitize होऊनच घरी येतो.
 
अनलॉक नंतर आर्थिक बाबींचा जर विचार केला, तर लोक डाऊन मध्ये सर्वात जास्त त्रास हा व्यावसायिकांना झाला आहे, लॉकडाऊन च्या सुमारास बरेचशे कामगार आपापल्या गावी गेल्यामुळे आता काही दिवस कामगारांच्या संख्येत कमी असल्यामुळे असणाऱ्या कामगारांकरिता जास्त पैसे मोजावे लागू शकतात. अर्थात आपल्याला  महागाईला जास्त सामोरं जावं लागू शकतं. महागाईमुळे दैनंदिन जीवनातल्या गोष्टी, म्हणजेच फळ, भाज्या अशा बऱ्याच गोष्टी महाग होऊ शकतात. घरातले म्हणजेच होम अप्लायन्स दुरुस्त करण्याकरता लागणारे पैसे हे देखील जास्त असू शकतात, परंतु लॉकडाऊन मध्ये आपणास एक गोष्ट जाणवली असेल की काही गोष्टी मर्यादेत वापरून देखील आपण एक उत्कृष्ट आयुष्य जगू शकतो कदाचित काही महिने अजूनही आपल्याला तीच सवय चालू ठेवावी लागणार आहे म्हणजे या महागाईचा फटका आपल्याला कमी बसेल.
 
मला प्रवास करायला फार आवडतं किंबहुना माझ्या छंदां पैकी प्रवास आणि फिरणे हा एक छंद आहे. गेल्या तीन महिन्यापासून स्वाभाविकपणे मी देखील कुठे फिरायला गेलेलो नाही. माझ्याच सारखेच बरेच लोक देखील कुठे फिरून जाऊ शकले नाहीत. कदाचित येत्या काही महिन्यात कोरोनाचे संकट टळेपर्यंत फिरण्यावर देखील काही मर्यादा राहतील. 
 
या सर्व नकारात्मक बाजू असल्या तरीही लॉकडाऊन मुळे आपल्या गरजा ह्या मर्यादेत ठेवण्यासाठी एक सुवर्णसंधी आपणास मिळाली होती घरी राहिल्यामुळे नोकरदार किंवा व्यापाऱ्यांना एक प्रकारची उन्हाळी सुट्टीत इतक्या वर्षानंतर मिळाली. विकेंडला जंक फूड खाऊन फंक्शनल वँल्यू पेक्षा टेस्ट वँल्यू महत्त्व देणाऱ्या गोष्टी दैनंदिन जीवनातून काही महिन्यांकरिता आपण काढू शकलो. बाहेरील तळकट पदार्थ खाण्यापेक्षा आई/पत्नीच्या हाताने बनवलेली गरम पोळी साजूक तूप वरण-भातावर सुद्धा आपण छानपणे जगू शकतो हे देखील या लॉकडाऊन मुळे जाणवलं, जे येणारे काही महिने देखील आपल्याला अनुभवायला लागू शकतं.
 
कोरोना च्या विषाणूंवर एकदा सर्वसामान्य लस आली की मग आपला आयुष्य आहे इतके वर्ष जगलेल्या आयुष्याचा सारखा पुन्हा उत्तम होईल तत्पुर्वी लॉकडाऊन संपवून, अनलॉकचे आयुष्य सुरू झालं की स्वतःला थोड्याफार मर्यादा आणून कुटुंब सानिध्यात देखिल आपण उत्कृष्ट असे आयुष्य जगू शकतो.
 
हे होते माझे विचार आणि लॉकडाऊन नंतरच्या आयुष्याबद्दलचे, मर्यादेत पण तितकेच अनंत जगता येऊ शकणारे असे, एक सुंदर आयुष्य. आशा करतो की काहीसा काल्पनिक पण बराचसा व्यावहारिक असणारा हा लेख वाचकांना नक्कीच आवडेल. सर्व वाचकांना एक सुरक्षित आणि उत्कृष्ट आयुष्य या अनलॉक च्या काळात लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख महाराष्ट्रात वाढला 31 जुलैपर्यंत Lockdown