Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परशुराम कोण होते? हैराण करणारे तथ्य जाणून घ्या

परशुराम कोण होते? हैराण करणारे तथ्य जाणून घ्या
, शुक्रवार, 14 मे 2021 (08:48 IST)
परशुराम जयंती ही भगवान परशुराम यांची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते. वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) या दिवशी परशुरामांचा जन्म झाला असे मानले जाते.
 
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. एकोणिसाव्या त्रेतायुगात अर्थात महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात परशुरामाचा जन्म झाला.
 
`वाल्मीकींनी त्यांना `क्षत्रविमर्दन’ न म्हणता `राजविमर्दन’ म्हटले आहे. परशुरामाने दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.’ कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हते. परत आल्यावर त्याला हे कळताच त्यांनी कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. नर्मदेच्या तीरी त्या दोघांत द्वंद्वयुद्ध झाले. त्यात परशुरामांनी त्याला ठार मारले. यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे ते तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेले.

नंतर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचले. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधमांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.’ 
 
या प्रतिज्ञेप्रमाणे ते उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करुन युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जात असे. क्षत्रीय माजले की पुन्हा त्यांचा नाश करत असे. अशा 21 मोहिमा केल्यावर शेवटचे युद्ध करून त्यांनी आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले. 
 
एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामांनी क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामांचेच शिष्य होते. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.
 
परशुराम यांचा उल्लेख रामायणात सीता स्वयंवरात देखील येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. त्यावर माझी या (काश्यपी) भूमीवरची गती निरुद्ध कर, असे परशुरामांनी सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामांनी स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामांनी धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.
 
परशुराम यांनी ज्या क्षत्रीयवधासाठी मोहिमा केल्या, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर त्यांचे स्वामित्व आले. त्यामुळे त्यांना अश्वमेध यज्ञाचा अधिकार प्राप्‍त झाला व त्यांनी अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी या यज्ञाचा अध्वर्यु कश्यप याला परशुरामांनी सर्व भूमी दान केली.
 
जोपर्यंत परशुराम या भूमीत आहे, तोपर्यंत क्षत्रीय कुळांचा उत्कर्ष होणार नाही, हे जाणून कश्यपाने परशुरामाला सांगितले, `आता या भूमीवर माझा अधिकार आहे. तुला इथे रहाण्याचाही अधिकार नाही.’ यानंतर परशुरामा यांनी समुद्र हटवून स्वत:चे क्षेत्र निर्माण केले. वैतरणा ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या या भूभागाला `परशुरामक्षेत्र’ ही संज्ञा आहे. परशुराम हे सप्‍तचिरंजीवांपैकी एक आहे.
 
परशुराम यांनी २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्‍तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विवाहीतेची आत्महत्या, सासरच्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल