लॉक डाउन पॉसिटीव्हिटीच्या काळात किती तरी नवनवीन उलगडे झाले आहेत. हे भविष्यात नक्की उपयोगी पडतील. हे उलगडे कुठल्याही सामाजिक किंवा राजकारणातील नसून आपल्याच घरातले आहेत. ह्याचे आश्चर्य आणि गंमत वेगळी आहे. लॉक डाउन सुरू झाल्या झाल्या काही घरकामाच्या जबाबदाऱ्या स्वतः हून स्वीकारायचे मी ठरवले. तर सौं चा आग्रह होता केर फरशी नका करू पाठीचे दुखणे वाढवून माझ्या पुढे नवीन काही वाढून ठेवू नका!!!!!!! बरं म्हटलं भांडी घेतो मग. वाह काहीही आढे वेढे ना घेता हे काम मला देण्यात आले. हिचे केंद्र सरकार बरोबर काही संगनमत आहे का काय बरी कल्पना होती लॉक डाउन २१ दिवसांचा नसून अजून मोठ्ठा असणार आहे......असो गंमत आता सुरू होते. तर आपल्या घरात पाणी प्यायचे भांडे व चहाचे कप धुवायला वेगळे ब्रश असून त्यांना पालथे घालून ठेवायला वेगळी टोपली आहे. दुधाचे पातेले घासायला परत तारेचा वेगळा ब्रश!!!! बरं गाळणे एकंदर पाच आहेत. दूध, हळद दूध, चहाचे दोन आणि एक तूप गाळण्याचे. दूध तापवताना एका डावाने ते ढवळायचे म्हणजे ते खाली लागत नाही आणि हा डाव एक्सकॅल्युसिव्ह दुधासाठीच वापरायचा. काय जाती रंग भेदाचे राजकारण आहे घरातच बघा..... प्रत्येक भांड्या चमच्याचे वेगळे महत्त्व आणि अस्तित्व या स्वयंपाकघरात.
दुसरी जबाबदारी आली माझ्यावर ती म्हणजे दूध, वाण्याकडे जाणे आणि भाजी फळे आणणे. ह्यात ही किती तरी भर पडली ज्ञानात. तर भोपळा अर्धा असे लिहिले असताना त्यातला किलो हा हिडन असतो. फरसबी आणि चवळी जरी एका कुटुंबातल्या असल्या तरी त्यांची आपल्या घरातली महती वेगळी आहे. हिला माझ्यापेक्षा भाजीवाल्यावर जास्त विश्वास आहे कारण त्याला आपल्या घरातल्या आवडी निवडी आणि भाज्यांचे प्रमाण माहीत आहे. भाजीवाल्याची कमाल वाटली त्याला त्याच्या बायकोसोबत किती तरी बायकांचं टेरर आहे. वाण्याकडच्या यादीतले आलेले सामान सॅनिटायझ करून झाल्यावर प्रश्नावलीला सुरवात होते.
व्हील कशावर फुकट मिळाले??? म्हटले तू लिहिले होते.....छेsss मी विम लिहिले होते. बरं उद्या देतो त्याला परत. नाही नाही ठीक आहे चालेल कपडे धुईन त्यांनी मी.....सलमान जाहिरात करतो वापरून बघू....वाह रे सल्लू मियाँ आज तुने बचाया. गेले काही दिवस नियमाने झाडाला पाणी दिले म्हणून छान बहरली आहेत तर कळले पुरुषांनी झाडांची काळजी घेतली की बरोब्बर त्यांना वेगळी आभा येते. का आणि कसे हे विचारले असते तर विज्ञान, मनोविज्ञान आणि अध्यात्म ह्याची सांगड घातलेले वेगळेच उत्तर माझ्या दिशने आले असते. म्हणून सावध होतो मी......
गेले दहा मिनिट मुलगा आणि त्याची आई ह्यांच्यातले वाद अकराव्या मिनिटाला संपतात आणि पंधराव्या मिनिटाला "बोलू नको माझ्याशी" असे काही ऐकू येते (केवढा मोठ्ठा उलगडा आहे हा....). म्हणून पुढच्या एका वादाच्या क्षणी मी मध्यस्ती केली तर सौं नी चक्क माझी बाजू घेत आमच्या चिरंजीवांना समज दिली "समोरचा एवढा समजूत घालतोय ऐक ना जरा". मी दचकलो पूर्वीचे ठीक आहे गेला पूर्ण महिना २४*७ ह्यांच्या बरोब्बर असून ही मी "समोरचा"......हे एक वेगळे राजकारण नाही ना आणि मी बळी तर नाही कारण लॉक डाउन सुरू आहे, कार ची बॅटरी उतरलीये आणि हॉटेल पण बंद आहेत. मी ही आवाज बंद केला.......
ह्या सगळ्या गतिविधी साध्या नसून ह्या मागचा हेतू लक्षात घ्यायला सुरुवात केली. तर हा काळ जसा सेमिनार आणि वेबिनारचा आहे तसा हा आपल्या घरातला होमिनार आहे. ठरवून कधीही किचनमध्ये नसतो गेलो मी पण आता अगदी सहज वावरतोय. तू राहू दे असे म्हणणारी ही भार्या का बरे कर तू म्हणत असेल ???? तर उद्या मी नसले तर काय कराल ही वेगळी आशंका हिला वाटत असेल.....ह्या बापड्या ला घरातले ज्ञान हवे म्हणून ही राजकारण खेळते. मला बघून अपत्य ही घरकामात रस घेईल ही भाबडी आशा असावी. एकदाही कंटाळा आला घरात असे वाक्य ऐकले नाही मी उलट चौकस बघण्यासाठी हिला काय चार अतिरिक्त डोळे आले का काय असे वाटते......शेवटी काय तर ज्या घरासाठी सगळी तडफड सुरू असते तिथे सतत राहायला मिळणे पण भाग्यच....
फॅमिली टाइम म्हणतात तो हा आहे.....आज वाटले तुझ्या कार्यक्षेत्रात मला सहभागी करून घेतलेस आणि करीन त्याला संमती दिली....कोरोना तुझ्यामुळे खूप काही जमलंय ना !!!!!!!