Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Savitribai Phule Death anniversary सावित्रीबाई फुले पुण्यतिथी

savitribai phule
, शुक्रवार, 10 मार्च 2023 (08:32 IST)
सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय शिक्षिका कवियित्री आणि समाज सुधारक होत्या. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंबात झाला. यांच्या आईचे नाव सत्यवती तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. यांचे लग्न वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी फुरसुंगीच्या गोविंदराव फुले यांचे सुपुत्र जोतिरावांशी झाले होते. जोतीराव हे देखील लग्नाच्या वेळी अवघ्या 13 वर्षाचे होते. जोतीराव देखील क्रांतिवीर आणि समाज सुधारक होते. 
 
सावित्रीबाईंच्या सासरी फुलांचा व्यवसाय करीत असल्यामुळे त्यांना 'फुले' हे नाव देण्यात आले. यांना लग्नानंतर अपत्य झाले नाही. तर ह्यांनी एका विधवेच्या मुलाला यशवंत राव यांना दत्तक घेतले. या साठी देखील त्यांना विरोध पत्करावा लागला. यांच्या पतींना लहानपणापासून आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांचा सांभाळ त्यांच्या मावस आत्येने केला. त्यांच्या आत्येने त्यांना शिक्षणाची गोडी लावली. त्यामुळे जोतीरावांनी सावित्रीबाईंमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण केली आणि त्यांना शिकवले आणि समाजाचा विरोध पत्करला. त्यांनी आपल्या आत्या सगुणाऊंना देखील शिकवले आणि मागासांच्या वस्ती मध्ये एक शाळा उघडून दिली. सगुणाऊ यांनी त्या शाळेचा व्यवस्थितरीत्या सांभाळ केला आणि शिकवणी देऊ लागल्या पुढे ही शाळा बंद पडली. त्या नंतर जोतीरावांनी पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली आणि शिक्षिका आणि प्राध्यापिका म्हणून तिथली जबाबदारी सावित्रीबाईंना दिली. 
 
ही शाळा मुलींसाठी पहिली शाळा ठरली. त्यांच्या शाळेत सुरुवातीला सहा मुली होत्या. हळू-हळू मुलींची संख्या वाढली. बऱ्याच सनातन्यानी याचा विरोध देखील केला पण त्या डगमगल्या नाही आणि त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला. त्यांनी अनेक सामाजिक कुप्रथा बंद केल्या. त्यांनी विधवा विवाह साठी एका केंद्राची स्थापना केली. त्यांना पुनर्विवाहासाठी प्रेरित केले. त्यांनी मागास वर्गीय लोकांसाठी देखील काम केले. अनाथासाठी देखील काम केले. 1897 मध्ये प्लेग साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पसरला होता. त्यासाठी त्यांनी पुण्यात एक रुग्णालय सुरू केले आणि अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या रुग्णांची सेवा केली आणि त्या आजाराला बळी पडल्या आणि त्या साथीच्या रोगामुळे त्यांचे निधन झाले.
 
ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती
 
त्यांनी कवियित्री म्हणून 2 पुस्तके लिहिली- काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर. या दंपतीला महिलांच्या शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सन्मानित केले. केंद्र आणि महाराष्ट्र सरकार कडून सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक पुरस्कार दिले जातात. या शिवाय यांच्या सन्मानासाठी टपाल तिकीट देखील काढण्यात आले आहे. 3 जानेवारी 1995 पासून सावित्रीबाईंचा जन्मदिन 'बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या या कारकिर्दीला मानाचा मुजरा.
 
28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर देखील सावित्रीबाई फुले त्यांच्या अनुयायांसह सतत कार्यमग्न राहिल्या. ज्योतिबांच्या सामाजिक कार्याची अपूर्ण कामे हातात घेऊन सत्य शोधक समाज दूरदूरपर्यंत पसरविला. 
 
1897 मध्ये पुण्यात एक भयानक प्लेग ची साथ पसरली. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा उपाय योजला तेव्हा सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. अशा गंभीर परिस्थितीत त्या आजारी लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देत होत्या. सावित्रीबाई स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता रूग्णांची सेवासुश्रृषा करीत राहिल्या. प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना त्या स्वत: देखील प्लेगच्या बळी पडल्या आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. 
 
समाजात तीव्र विरोध असूनही महिलांचे जीवन आणि त्यांना शिक्षण देण्याची जिद तसेच रूढीवादी प्रथा सुधारण्याच्या महत्त्वपूर्ण योगदान कधीही विसरता येणार नाही. या बद्दल देश नेहमी सावित्रीबाई फुले यांचे ऋणी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘गाव विकणे आहे’,गावकऱ्यांनी चक्क गाव काढले विक्रीला