छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंती निमित्त मालाड पूर्व च्या कुरारगावातील वीर सावरकर मैदानात रविवार दि. १९ मार्च ला भव्य शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. सकाळ पासुन ते रात्री पर्यंत विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची ओळख व्हावी, शस्त्रांच्या माध्यमातून त्यावेळचा इतिहास उलगडावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड क्र. ४३ च्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन मांडण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचे कार्य फक्त इतिहासापुरतेच मर्यादित न राहता शिवाजी महाराजांचे किल्ले, त्यांनी जिंकलेली युध्दे, त्यात वापरलेली शस्त्रे यांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न गिरीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनातून केला जाणार आहे. प्रदर्शनात शिवकालीन जुनी वापरात नसलेली व केवळ अभ्यासासाठी संग्रहित केलेली ऐतिहासिक २०० हून अधिक शस्त्रे, वस्तू, चित्रे, माहितीपर तक्ते व शिवकालीन नाणी शिवप्रेमींना पहायला मिळणार आहे. दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना, अभिषेक व सत्यनारायण महापुजा दुपारी ४ ते ६ वाजता होणार असुन संध्याकाळी ६ ते ७ वाजता मोठ्या दिमाखात शिवशाही ढोलताशा पथक कला सादरीकरण होणार आहे. संध्याकाळी ७ ते रात्री १० ह्या वेळेत विभागातील शिवप्रेमींसाठी राजमुद्रा कलासंस्थेतर्फे 'गौरव महाराष्ट्राचा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
कुरारगावातील शिवजयंती महोत्सवाच्या ह्या कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, शालिनी ठाकरे, गजानन राणे, संदिप दळवी, डॉ. मनोज चव्हाण, प्रविण मर्गज हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहे. वनिता घाग, अरुण सुर्वे, केतन नाईक, सिताराम जाधव व राजेश केरकर ह्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत मनसे कार्यकर्त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली आहे. अश्या कार्यक्रमातुन नवीन पिढीला आपल्या समृद्ध इतिहासाची माहिती जाणून घेण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. त्यासाठी कुरारगावातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उत्सव समिती चे अध्यक्ष मनीष धोपटकर यांनी केले आहे.