बरेच दिवस पाऊस सुरू होता. सारखे भरून आलेले आभाळ आणि रिमझिमणारा पाऊस. अगदी क्वचितच मध्येच ऊन पडायचे. तेही श्रावणातील रेशमी ऊन! असाच ऊन-पावसाचा खेळ खेळत झुल्यावर झुलणारा श्रावणास पार पडून जेमतेम एक आठवडा लोटला. एखाद्या रंगमंचावर जसे नाटकाचे मंच कथासूत्रानुसार बदलून नवीन येतात, तसंच काहीसं निसर्गाचं आहे, असं वाटतं मला. सध्या पाऊस थांबला आणि थोडसं ऊनपडून निरभ्र आकाश दिसतं.
निरभ्र आणि मोकळे आकाश आणि त्यामुळे पडणारं लखलखीत ऊन. पावसामुळे हिरवागार आणि ताजातवाना झालेला परिसर आणि अशातच पडणारं ऊन. एरवी नको-नकोसं वाटणारं ऊन आसमंतातल्या हिरवाईमुळे उलट अधिकच देखणं वाटतं. असं ऊन पडलेलं आवडत असूनही निरभ्र दिसणारं आकाश मात्र अस्वस्थ करतं. त्या आकाशतल्या निरभ्रतेकडे पाहून असं वाटतं की, ते दिसतं तितकं मोकळं झालं नाहीये, अजून बरसायचं त्याला. आधी बरसलेलं आणि आता बरसेल तेव्हा, या दोन बरसण्याच्या मधला हा निरभ्रपणा खूप अस्वस्थ करतो मनाला.
निरभ्र आणि स्वच्छ आकाशात मुक्तपणे पाखरं विहरत असतात, पण ती देखील मनात येणार्या वेगळ्या वेगळ्या विचारांसारखी वाटतात. ती बागडणारी पाखरं आहेत. निरभ्रतेची साक्षीदार आणि माझ्यातल्या अस्वस्थतेची साथीदार.
कधीकधी दोघी मैत्रिणींच गप्पा खूप छान रंगलेल असतात, पण गप्पा मारता मारता अचानक दोघींचही बोलण्यात दोन-पाच मिनिटं तरी शांततेत जातात. निखळ संवादात विनाकारण आलेली ही शांतता, मनाला तशीच अस्वस्थ करते, त्या थोड्याशा शांततेनंतर संवाद पुनश्च तसाच सुरू होतो पण इवलशा वेळात तयार झालेली शांतता जराशी जीवघेणी!
दिवस आणि रात्रीला सांधणारी संध्याकाळ अन् रात्र आणि दिवसाला साधणारी पहाट एकप्रकारे संधीकाळच! विविधरंगी संधीप्रकाश, उगवतीचे तेज घेऊन उगवणारी पहाट आणि मावळतीची लालिमा घेऊन येणारी संध्याकाळ- अशीच अस्वस्थ करणारी. दोन्ही वेळा मनाला अस्वस्थ करणार्या, कोणत्यातरी अनाम वेदनेची वेणा दाखविणार्या, कसलीतरी हुरहूर जाणवणार्या, खोलवर काहूर माजविणार्या.
निरभ्र असणारं आकाश, संवादातील शांतता किंवा दोन्ही प्रकारचे संधीकाळ मन अस्वस्थ करणारे, तशीच अस्वस्थता वाटते ती सावलीत दिसणार्या उन्हाच्या कवडशांची. घनदाट सावलीत दिसणारे कवडसे असेच अस्वस्थ करतात. अशी स्वस्थतेतून अस्वस्थतेकडे जाणारी वेणा, सर्वांनाच अनुभवाला येते का?
अजून अशी अनेक उदाहरणं आहेत, जेव्हा मन विनाकारण अस्वस्थ होत असतं, दरवेळी ही अस्वस्थता टिपता येते का? जाणीवपूर्वक समजते का? अस्वस्थतेमधील अर्थ ससंदर्भ समजतात का? अशी अनेक प्रश्नांची भेंडोळी उलगडत उलगडत, मोठी प्रश्नचिन्हे दिसतात मला, त्या निरभ्र आकाशात बागडणार्या पाखरांच्या जागी.