Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विशेष लेख - शिवशाहिरांचे महाप्रयाण

विशेष लेख - शिवशाहिरांचे महाप्रयाण
, सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (22:59 IST)
शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले. आज कार्तिकी एकादशीचा दिवस बाबासाहेबांनी उभे आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालिन इतिहास याचे संशोधन आणि प्रचार करण्यातच घालवले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाचा दिवस मानल्या जाणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या दिवशीच विठ्ठलाने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. आणि एका कृतार्थ जीवन जगणाऱ्या पुण्यात्म्याला स्वर्गाचे दार उघडे करुन दिले असे निश्चित म्हणता येईल.
 
नुकतीच म्हणजे २९ जुलै २०२१ ला बाबासाहेबांनी वयाची ९९ वर्ष पूर्ण करून १००व्या वर्षात पदार्पण केले होते. आपल्या आयुष्यातील जवळजवळ सात दशके त्यांनी शिवचरित्राचे संशोधन आणि प्रसार करण्यातच घालविली होती. त्यासाठी बाबासाहेब अक्षरशः सन्यस्त आयुष्य जगले होते. त्यांचे हे असे त्यागमय जीवन बघण्याचा योग्य आमच्या पिढ्यांना निश्चितच आला होता.
 
बाबासाहेब पुरंदरे या नावाचा माझा पहिला परिचय झाला तो १९६५-६६ च्या दरम्यान ज्यावेळी मी शाळेत पाचव्या सहाव्या वर्गात शिकत होतो. नागपूरच्या हडस हायस्कुलमध्ये शाळेत ग्रंथालय आणि वाचनकक्ष उपलब्ध होता. मधल्या सुटीत जाऊन तिथे पुस्तके वाचण्याची सोय होती. त्या काळात बाबासाहेबांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे छोट्या पुस्तक रुपात खंडशः प्रकाशित झाले होते. १ ते १० अशी १० पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध होती. मधल्या सुटीत बसून ती पुस्तके आम्ही त्या वयात झपाटलेल्या सारखी वाचून काढली. त्या पिढीला छत्रपती शिवाजी काय होते हे शिकविण्याचे खरे कार्य बाबासाहेबांच्या शिवचरित्रामुळे  झाले होते.
 
याच काळात बाबासाहेबांची शिवचरित्रावर ठिकठिकाणी भाषणे व्हायची. त्यांच्या भाषणांबद्दल वृत्तपत्रातूनच वाचायचो. बाबासाहेब हे संघाचे कट्टर स्वयंसेवक होते. त्यामुळे संघ शिबिरात बाल आणि शिशु स्वयंसेवकासमोर शिव चरित्रावर त्यांची अनेक स्फूर्तिदायक भाषणेही व्हायची. महाराष्ट्रातलय अनेक शाळांमध्ये जाऊन त्यांनी त्या काळात आपल्या ओजस्वी वाणीने शिवाजींचा इतिहास जनसामान्यांच्या डोळ्यासमोर अक्षरशः जिवंत केला. त्यातून  शिवचरित्र नव्याने घराघरात पोहोचले. या पद्धतीने बाबासाहेबांनी सुङ्कारे तीन पिढ्यांना शिवसाक्षर केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
मुद्रित माध्यमे आणि वाणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या शिवसाक्षर केल्यानंतर बाबासाहेबांनी प्रत्यक्ष शिवसृष्टी जनसामान्यांसमोर उभी करण्याचा निर्णय घेतला. साधारणतः १९८८-९० पासून त्यांनी ‘जाणता राजा’हे शिवकालीन महानाट्य उभारले. या महानाट्याच्या माध्यमातून सुमारे दोन दशके त्यांनी जनसामान्यांसमोर प्रस्त्यक्ष शिवकाल उभा केला. त्या साठी रंगमंचावर अगदी प्रत्यक्ष  लढाई हत्ती, घोडे, अंबारी तसेच सर्व काही उभे करण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले. भारतीय इतिहासात हा असा पहिलाच प्रयोग होता.
 
बळवंत मोरेश्वर पुरंदरे या नावाची ओळख जरी शालेय जीवनात झाली होती तरी बाबासाहेबांची माझी प्रत्यक्ष भेट व्हायला जवळजवळ १० वर्षे जावी लागली. १९७६ च्या दरम्यान मी दूरदर्शनचावृत्तछायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. त्या वेळी बाबासाहेबांची नागपुरात व्याख्यानमाला सुरु होती. नागपूरच्या धनवटे रंगमंदिरात त्यावेळी राज्य नाट्य स्पर्धा सुरु होत्या, त्यातील एका दिवशीची चित्रीकरण करण्यासाठी मी गेलो होतो. अचानक रंगमंदिरात  गडबड सुरु झाली. कोणीतरी मान्यवर येत आहेत हे कळले. थोड्याच वेळात पांढरा शुभ्र कुर्ता-पैजामा, सडसडीत देहयष्टी, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज आणि वाढलेली दाढी असे व्यक्तिमत्व सभागृहात पोहोचले. सोबत त्या काळात तरुण साहित्यिक म्हणून गाजत असलेला माझा मित्र शिरिष गोपाळ देशपांडे हा देखील त्यांच्यासोबत होता. तत्कालिन विभागीय समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत ठवकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावरुन हे कोणीतरी मोठे व्यक्तिमत्व असावे इतकेच मी ताडले. हळूच शिरिषच्या कानाला लागून हे कोण असे विचारले तेव्हा शिरिषने हे बाबासाहेब पुरंदरे अशी माहिती  दिली. थोड्याच वेळात शिरिषने त्यांची माझी ओळखही करुन दिली. ही माझी आणि बाबासाहेबांची पहिली भेट, त्यानंतर अनेकदा भेटींचा योग आला. वृत्तछायाचित्रकार आणि पत्रकार या नात्याने अनेकदा बाबासाहेबांचे विविध कार्यक्रम कव्हर करण्याचीही संधी मिळाली. त्यातून दरवेळा बाबासाहेब नव्याने कळत गेले.
 
बाबासाहेब शिवचरित्राचे फक्त अभ्यासकच होते असे नाही, तर शिवकाल ते प्रत्यक्षातही जगले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एक विद्वान अभ्यासक, एक वक्ता, एक कुशल संघटक असे अनेक गुण असलेल्या या माणसात  ऋजुता देखील रुजलेली होती. या ऋजुता या ऋजूतेतूनच प्राचार्य राम शेवाळकरांसारख्या शब्द वाङ्मयावर अधिराज्य गाजवनाऱ्या वाचस्पतीचा गौरव राम राजे असा करण्याचे औदार्य बाबासाहेबच दाखवू शकत होते. छत्रपती शिवाजींच्या प्रती असलेली अपार श्रद्धा त्यांच्या ठायी पुरेपूर भरली होती. मला आठवते नागपूरच्या भोसले परिवाराने २०२० सालचा राजरत्न पुरस्कार देवून बाबासाहेबांना गौरविले होते. त्या समारंभाला आले असताना कारमधून उतरल्यावर समोर स्वागताला आलेल्या नागपूरकर भोसलेंचे वंशज महाराज मुधोजीराजे भोसले यांना बाबासाहेबांनी लवून मानाचा मुजरा केला होता. मुधोजी  हे बाबासाहेबांच्या अर्ध्या वयाचे, मात्र ते भोसले घराण्याचे वंशज त्यामुळे त्यांना मानाचा मुजरा देणे हे आपले कर्तव्यच असल्याचे बाबासाहेबानी त्यादिवशी मला प्रत्यक्ष बोलण्यातच स्पष्ट केले होते.
 
त्याचदिवशी आपल्या भाषणात नागपूरकर भोसल्यांचा इतिहासही लोकांसमोर यावा ही अपेक्षा बाबासाहेबांनी आपल्या भाषणात व्यक्त केली होती. योगायोगानेच वर्षभरापूर्वीच हाच मुद्दा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मीही मुधोजी राजेंशी झालेल्या चर्चेत मांडला होता. त्यामुळे कार्यक्रमानंतर माझी आणि बाबासाहेबांची या विषयावर  थोडावेळ चर्चाही झाली.या विषयावर बोलण्यासाठी मी पुण्यात यावे असे त्यांनी मला आमंत्रणही दिले. मात्र त्यानंतर कोरोनाच्या आलेल्या साथीमुळे एकमेकांच्या भेटीच दुरापास्त झाल्या होत्या. त्यामुळे आमची भेट आणि चर्चा तशीच राहिली. ही भेट आता पुन्हा होणे अशक्य आहे.
 
१९७६ ते २०२० या कालखंडात आधी नमूद केल्याप्रमाणे अनेकदा बाबासाहेबांशी भेटीचे योग आले. मला आठवते पं. हृदयनाथ मंगेशकर आणि बाबासाहेब यांचे संयुक्त कार्यक्रम व्हायचे. त्यात हृदयनाथजी छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतगायन करायचे. त्यावेळी त्या गीताशी सुसंबद्ध असा इतिहास बाबासाहेब व्यासपीठावरून सांगायचे.त्यानिमित्ताने बाबासाहेब आणि हृदयनाथजी यांची सुरेल जुगलबंदी रंगायची. असाच एक कार्यक्रम नागपुरात मूक बधिर विद्यालयाच्या पटांगणावर झाला होता.या कार्यक्रमाचे वृत्तसंकलन करण्यासाठी मी उपस्थित होतो. कार्यक्रम संपल्यावर विंगेत बाबासाहेब आणि पंडितजींशी सुमारे अर्धातास मस्त गप्पा रंगल्या होत्या. कुसुमाग्रजांचे ‘वेडात धावले वीरमराठे सात’या गीतामागचा संपूर्ण इतिहास बाबासाहेबांनी डोळ्यासमोर जिवंत उभा केला होता.
 
१९८३ मध्ये नागपूरच्या धनवटे रंगमंदिरात बाबासाहेबांच्या षठ्यब्दीपूर्तीनिमित्त बाबासाहेबांचा जाहीर सत्कार झाला होता. या समारंभात बाबासाहेबांनी दिलेले अप्रतिम भाषण आजही कानात घुमते आहे. त्या नंतर विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात बाबासाहेब, प्राचार्य राङ्क शेवाळकर, शिवकथाकार विजय देशमुख अशा मान्यवरांसोबत झालेल्या गप्पाही चिरस्मरणीय आहेत.
 
असे हे अविस्मरणीय व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. या माणसाने आपले आयुष्यच शिवाजींच्या इतिहासाला अर्पण केले होते. आज त्यांचे आयुष्य शिवचरणी लीन झाले आहे. असे असले तरी आपल्या कार्यातून  ते कायम महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या स्मृतीत कायम राहणार आहेत. त्यांनी छत्रपतींसोबत इतरही भोसले घराण्यांच्या इतिहासाचे योग्य संकलन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
-अविनाश पाठक

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Redmi Note 11T 5G भारतात 30 नोव्हेंबर रोजी लॉन्च होईल, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घ्या