Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आवडत्या कामाचाही कंटाळा आलाय? वाचा कामातला रस वाढवण्यासाठीचे उपाय

working women
, शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (23:21 IST)
आदर्श राठौर
  
तरुण गोयल हा ट्रेकर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. त्याला हिमालयातील जुन्या पायवाटा धुंडाळायला आवडतं.
 
बर्फाळलेल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अनेक मैल प्रवास करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर केलेली मात याविषयी त्याने 'द हायेस्ट माउंटन' हे पुस्तकही लिहिलंय.
 
बरेच लोक तरुणला सोशल मीडियावर मॅसेज पाठवतात आणि त्याचे पुस्तक वाचून त्यांना ट्रेकिंगची प्रेरणा मिळाल्याचे सांगतात. पण तरुण सांगतो की आज त्याची स्वतःची ट्रेकिंग आणि त्याच्याशी संबंधित लिखाण या दोन्हीची आवड संपत चालली आहे.
 
तो सांगतो, "दुसरं पुस्तक देखील खूप आधीच लिहून पूर्ण झालंय. पण मग असं वाटतं की ते छापून विकण्याचा मोठा व्याप आहे. शिवाय कडाक्याच्या थंडीत बर्फावर चालणं, तंबूत राहणं आणि अनेक अडचणींना तोंड द्यायला नको वाटतं."
 
तरुणला जसे अनुभव आलेत तसेच अनुभव अनेकांना आलेत. सुरुवातीला आपल्याला एखाद्या कामाची आवड निर्माण होते, मात्र नंतर नंतर त्या कामाप्रती उत्साह कमी होऊन जातो, असं नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीतही घडतं.
 
'द एक्स्पेक्टेशन इफेक्ट: हाऊ युवर माइंडसेट कॅन ट्रान्सफॉर्म युवर लाइफ' या पुस्तकाचे लेखक डेव्हिड रॉबसन यांनी वयाच्या सहाव्या वर्षी लेखक बनायचं ठरवलं होतं.
 
आज एक लेखक आणि पत्रकार म्हणून ते स्वतःला नशीबवान समजतात की त्यांना त्यांचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण करता आलं. पण त्यांच्या आयुष्यात असं बऱ्याचदा घडलं जेव्हा त्यांची कामाप्रती असलेली आवड संपू लागली.
 
ते सांगतात, "लंडनमध्ये जानेवारी महिन्यात वातावरणात जडपणा येऊ लागतो. एकाच प्रकारचं काम करून थकायला होतं. असं वाटतं जणू काही तुम्ही एखाद्या न थांबणाऱ्या ट्रेडमिलवर धावत आहात. मग वाटतं की हे सगळं सोडून द्यावं."
 
पण असं वाटणारे ते एकटेच नाहीयेत. अलीकडे सोशल मीडियावर क्वायट क्विटिंग (quiet quitting) असा एक ट्रेंड सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या नोकरीत समाधानी नसता तेव्हा नोकरी सोडण्याऐवजी तुम्ही फक्त काम करत राहता. पण यात मेहनत करत नाही.
 
असं तेव्हा घडतं जेव्हा लोक नोकरीमध्ये बढतीसाठी खूप मेहनत करतात परंतु त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत.
 
काही लोकांसाठी, नोकरीची आवड संपून जाते म्हणजे करिअर बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे असं असतं. पण करिअर बदलणं सगळ्यांसाठीच शक्य होईल असं नाही.
 
प्रत्येकाच्या विचारात असलेला फरक
संशोधनात असं दिसून आलंय की, एखाद्या कामात आवड आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात.
 
अमेरिकेतील ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका पॅट्रिशिया चेन यांनीही याच विषयावर संशोधन केलं आहे.
 
'फिट थिअरी' आणि 'डेव्हलप थिअरी' या दोन वेगवेगळ्या मानसिकतेचा कामाच्या आवडीवर काय परिणाम होतो हे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या संशोधनात केला होता.
 
'फिट' मानसिकता असलेल्या लोकांचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी फक्त एक विशिष्ट काम योग्य आहे. एखादं काम त्याच्या आवडीचं आहे की नाही हे त्याचा आनंद, आवड आणि यशावर अवलंबून असतं.
 
तेच 'डेव्हलप' मानसिकता असलेल्या लोकांना असं वाटतं की, जेव्हा तुम्ही एखादं काम शिकत असता तेव्हा तुम्हाला त्याची आवड निर्माण होते.
 
जेव्हा तुम्ही त्या कामात चांगले होता तेव्हा आपोआप तुम्हाला त्या कामाची आवड निर्माण होते.
 
'फिट' आणि 'डेव्हलप' या दोन सिद्धांताबद्दल दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पसमधील मानसशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. इशिता उपाध्याय सांगतात की, सोप्या शब्दात सांगायचं तर एक सिद्धांत सांगतो की, ते काम करायला हवं ज्यात तुम्हाला आनंद मिळतो. तर दुसरा सिद्धांत सांगतो, तुम्ही काम केल्यावर त्यात तुमची आवड निर्माण होईल.
 
डॉ. इशिता सांगतात, "फिट सिद्धांतनुसार, एखाद्या व्यक्तीला कामाची आवड तेव्हाच निर्माण होते जेव्हा ते काम त्याच्या आवडीचं असतं. ही एक अमेरिकन संकल्पना आहे ज्यामध्ये कामापेक्षा व्यक्ती अधिक महत्त्वाची आहे. तर आशियाई संस्कृतीत असं मानलं जातं की, एखाद्या व्यक्तीला हळूहळू त्याचं काम आवडू लागतं. हा सिद्धांत अधिक मानवी आहे."
 
प्राध्यापक पॅट्रिशिया चेन यांनी आपल्या संशोधनादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचे आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले.
 
त्यांना असं आढळलं की लोक जसा विचार करतात तेच परिणाम त्यांना मिळतात.
 
उदाहरणार्थ, फिट मानसिकता असलेल्या लोकांना आवडत नसलेल्या कामात आनंद मिळवणं अवघड जातं.
 
तर डेव्हलप मानसिकता असलेले लोक विविध प्रकारच्या कामांचा आनंद घेतात आणि त्यांच्यात आवड निर्माण करतात. हे काम त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करत नसले तरीही कालांतराने त्यांना याविषयी समाधान वाटतं.
 
या संशोधनानंतर, प्राध्यापक चेन यांनी डेव्हलप मानसिकता असणारे लोक वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांची आवड कशी टिकवून ठेवतात, कामाचा उत्साह टिकवण्यासाठी ते कोणत्या पद्धती अवलंबतात? यावर संशोधन केलं.
 
यासाठी त्यांनी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणाऱ्या 316 पदवीधर विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं आणि ते शिकत असलेल्या विषयांबद्दलचा त्यांचा उत्साह कधी आणि कसा बदलला याबाबतीत विचारणा केली.
 
या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्तरांवरून त्यांनी अशा पाच गोष्टी ओळखल्या ज्यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांनी या विषयाचा अभ्यास करण्याची आवड कायम ठेवली.
 
'या' गोष्टी करा
1. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी ओळखा
 
व्यावसायिक होण्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी असा विचार करण्याचा प्रयत्न करतो की, एखाद्या स्पष्टीकरणातून मिळालेल्या ज्ञानामुळे त्याला स्टार्टअप सुरू करण्यास मदत होईल.
 
2. सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गोष्टी ओळखा
 
विद्यार्थ्याला वाटू शकतं की, तो ज्या विषयाचा अभ्यास करतोय त्यातून मिळणारं ज्ञान त्याला समाज आणि जगाबद्दचं आकलन विकसित करण्यात मदत करेल.
 
3. माहिती गोळा करणं
 
नवीन माहिती मिळवल्याने तुमच्यामध्ये अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचे विषय ओळखण्यात मदत मिळू शकते. जर कोणाला हतोत्साहित वाटत असेल तर त्यांनी नवी कौशल्य आत्मसात करायला हवी.
 
'या' गोष्टी करा
1. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी ओळखा
 
व्यावसायिक होण्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी असा विचार करण्याचा प्रयत्न करतो की, एखाद्या स्पष्टीकरणातून मिळालेल्या ज्ञानामुळे त्याला स्टार्टअप सुरू करण्यास मदत होईल.
 
2. सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गोष्टी ओळखा
 
विद्यार्थ्याला वाटू शकतं की, तो ज्या विषयाचा अभ्यास करतोय त्यातून मिळणारं ज्ञान त्याला समाज आणि जगाबद्दचं आकलन विकसित करण्यात मदत करेल.
 
3. माहिती गोळा करणं
 
नवीन माहिती मिळवल्याने तुमच्यामध्ये अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचे विषय ओळखण्यात मदत मिळू शकते. जर कोणाला हतोत्साहित वाटत असेल तर त्यांनी नवी कौशल्य आत्मसात करायला हवी.
 
4. व्यावहारिक अनुभव मिळवणं
 
अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की इंटर्नशिप किंवा व्यावहारिक कामाचा अनुभव मिळाल्याने त्यांचा अभ्यासाचा उत्साह वाढला.
 
5. मार्गदर्शक शोधणे आणि वातावरण बदलणे
 
विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षक मिळतात. किंवा त्यांचे काम मजेशीर करणारे मित्र मिळतात.
 
प्राध्यापक चेन यांना असंही आढळून आलं की डेव्हलप मानसिकता असलेल्या विद्यार्थ्यांची त्यांच्या विषयाची आवड कालांतराने वाढली, तर फिट मानसिकता असलेले विद्यार्थी अशा पद्धतींचा अवलंब करण्यास सक्षम नसतात.
 
प्रेरणा कशी मिळवायची?
प्राध्यापक चेन यांचं संशोधन भलेही विद्यार्थी केंद्रित असेल मात्र त्याचे परिणाम कामाची आवड आणि प्रेरणा यावरील व्यापक मानसशास्त्रीय संशोधनाशी सुसंगत आहेत.
 
या संशोधनादरम्यान त्यांना अशा पद्धतीही सापडल्या, ज्याचा अवलंब करून तुम्ही स्वत:ला काही काम करण्यासाठी प्रेरित करू शकता आणि तुमचा उत्साह टिकवून ठेवू शकता.
 
अशा दोन उपयुक्त पद्धती म्हणजे प्रॉक्सिमल गोल सेटिंग (जवळचे ध्येय ठेवणे) आणि सेल्फ-कॉन्सिक्वेटिंग (स्वतःसाठी शिक्षा किंवा बक्षीस ठेवणे).
 
जेव्हा तुम्हाला अशी नोकरी मिळते ज्यात फायदा कमी आणि आव्हानं जास्त असतात त्यावेळी अशा पद्धती उपयोगी पडतात. नाहीतर काम सुरू करण्याची प्रेरणा मिळत नाही.
 
अशा परिस्थितीत, जवळचं ध्येय ठेऊन तुम्ही तुमचं काम अनेक छोट्या छोट्या भागांमध्ये विभागता. त्यामुळे ते काम लवकर पूर्ण होतं आणि त्यामुळे तुम्हाला समाधानही मिळतं.
 
जर्मनीतील मुनस्टर विद्यापीठातील पोस्टडॉक्टरल संशोधक मिकी ट्रॉटनर सांगतात की, छोटी छोटी कामं पूर्ण केल्यावर तुम्ही स्वतःला बक्षीस देता त्यामुळे ही पद्धत प्रभावी ठरते.
 
यात तुम्ही नेटफ्लिक्स पाहणं किंवा तुमच्या आवडीचं दुसरं काहीतरी करु शकता. याला सेल्फ कॉन्सिक्वेटिंग म्हणतात.
 
काय केलं पाहिजे?
वर सांगितलेल्या गोष्टी नैसर्गिकरित्या 'डेव्हलप' मानसिकता असलेल्या लोकांमध्ये आढळतात. पण प्राध्यापक चेन यांच्या संशोधनात असंही दिसून आलंय की अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे.
 
त्यांच्या संशोधनात सहभागी झालेले बहुतेक विद्यार्थी फिट मानसिकतेचे होते. अशा परिस्थितीत, जर त्यांना सांगितलं की त्यांच्यामध्ये उत्कटता आणि प्रेरणा वाढवण्याची क्षमता आहे, तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
 
या पद्धती केवळ अभ्यासातच नव्हे तर इतर कामातही जसं की, नोकरी आणि करिअरच्या बाबतीतही वापरल्या जाऊ शकतात.
 
तुमच्या आयुष्यातील मोठ्या उद्दिष्टांचा विचार करून, तुमच्या कामाचा इतरांना कसा फायदा होईल याचा विचार करून, प्रेरणा देणाऱ्या सहकर्मचाऱ्यांकडून मदत घेऊन आणि स्वतःसाठी लहान बक्षिसे ठेऊन तुम्ही तुमची कामाची आवड वाढवू शकता.
 
पण याचा अर्थ असा नाही की सर्व जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे.
 
ऍना के. शॅफनर या ब्रिटनमधील लाईफ कोच आहेत. त्या सांगतात की, "तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलून तुमच्या आवडीचे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरी देणाऱ्यानेही या बाबतीत उदार वृत्ती अंगीकारली पाहिजे कारण यामुळे त्यांचे कर्मचारी चांगली कामगिरी करू शकतात.”
 
शॅफनर असंही सांगतात की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अडकले आहात, तर तुम्ही तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवताय. त्यामुळे तुमचा रोष आणखीन वाढू शकतो.
 
त्या सल्ला देतात, "तुम्ही काही छंद जोपासले पाहिजे. यामुळे तुम्हाला एक उद्देश मिळेल आणि समाधानही मिळेल. जीवनात समाधान मिळवण्यासाठी फक्त नोकरी हा एकमेव पर्याय नाही."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nashik News : प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या, दोघे अटकेत