Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांदा आपल्या ताटात कुठून आणि कसा आला? कांद्यावरचं आपलं प्रेम 4000 वर्षं जुनं आहे

onion
, मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (14:31 IST)
केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील.
 
2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे कांदा प्रश्नी तोडगा काढण्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.
 
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
 
खासदार अमोल कोल्हे यांनी या निर्णयाविरुद्ध आंदोलन केलं. आम्हाला 4 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळायलाच हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आपल्या ताटात नेमका कधी आणि कसा आला, याचा इतिहास जाणून घेऊ.
 
कांद्याचा वापर मेसोपोटेमियात 4000 वर्षांपुर्वी केला जात असे. हे एका लेखातून स्पष्ट झालं आहे. 1985 साली एका फ्रेंच पुरातत्ववेत्याने तो वाचल्यावर ही माहिती समजली होती. जगभरातील अनेक देशांमध्ये कांद्याचं पीक घेतलं जातं.
 
जगभरातल्या एकूण कांद्यापैकी 45 टक्के कांदा भारत आणि चीनमध्ये पिकवला जातो. परंतु कांदा सर्वाधीक खाणाऱ्या लोकांमध्ये मात्र हे देश नाहीत.
 
येल विद्यापिठातील बॅबिलोनिया संग्रहातील एका मृत्तिकापटावर लिहिलेल्या 3 लेखांमधील एक गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांना पाककलेचे जगातील सर्वात जुने पुस्तक मानले जाते.
 
त्यावरील मजकुराचा अर्थ 1985 साली उलगडला गेला.
 
मेसोपोटेमियाची संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व याचे अभ्यासक आणि स्वयंपाकाची आवड असणारे ज्यां बोटेरो यांना हा अर्थ उलगडण्याचं श्रेय दिलं जातं.
 
या मृत्तिकापटावर अनेक जुन्या आणि वैविध्यपूर्ण पदार्थांची पाककृती असल्याचं त्यांनी सांगित. त्यावेळेस एक पदार्थ लोकांना जास्तच आवडायचा तो म्हणजे कांदा.
 
 
कांदा वर्गातील भाज्या तेव्हाच्या लोकांना जरा जास्तच आवडायच्या असं बोटेरो सांगतात.
 
कांदा वर्गातील भाज्यांवर प्रेम
मेसोपोटेमियामधले लोक पदार्थांमध्ये कांदा, कांद्याची पात, लहान कांदे आणि लसणाचा वापर करत.
 
कांद्यावरचं हे प्रेम आज 4000 वर्षं झाली तरी कायम आहे. कांद्याचा उल्लेख नसलेलं पाककृतीचं पुस्तक सापडणं कठीणच आहे.
 
 
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार जगातील सुमारे 175 देश कांदा पिकवतात. गहू पिकवणाऱ्या देशांपेक्षा ही संख्या जवळपास दुप्पट आहे.
 
बहुतेक विशेष पदार्थांत कांदा वापरला जातोच. काही लोकांच्या मते कांदा हे एकमेव वैश्विक खाद्य आहे.
 
कुठून आला कांदा?
खाद्यपदार्थांचे इतिहासकार आणि 'द सिल्करोड गुर्मे'च्या लेखिका लॉरा केली सांगतात, "जनुकीय विश्लेषणाच्या आधारावर कांदा हा मध्य आशियातून आला असं आम्ही मानतो.
 
अशात मेसोपोटेमियामध्ये त्याचा झालेला वापर पाहाता त्याकाळापर्यंतही कांद्यानं भरपूर प्रवास केलेल्याचं दिसतं. युरोपात कांस्ययुगात कांद्याचा वापर होत असल्याचे पुरावे सापडले आहेत."
 
केली सांगतात, "2000 वर्षं आधी रेशीम मार्गावर कांद्याचा वापर होत होता यात शंका नाही. तेव्हापर्यंत मेसोपोटेमियाच्या लोकांनी आपल्या कांद्याच्या पदार्थांचा इतिहास लिहित होते."
 
मेसोपोटेमियाच्या लोकांच्या पदार्थांची चव घेण्यासाठी केली यांनी त्यांच्या पाककृतीनुसार काही पदार्थ करुन खाऊनही पाहिले.
 
कांदा किती खाल्ला जातो?
बहुतांश कांदा हा तो पिकवणाऱ्या देशांतच संपतो. त्यामुळेच कदाचित जगातील इतर भागांत पिकवल्या जाणाऱ्या कांद्याकडे लक्ष जात नसावं.
 
चीन आणि भारतात एकूण कांद्यापैकी 45 टक्के कांदा पिकवला जातो. मात्र प्रतिव्यक्ती कांदा खाण्याचं सर्वाधीक प्रमाण लिबियात आहे. 2011 साली संयुक्त राष्ट्राने केलेल्या पाहणीत लिबियातील प्रत्येक व्यक्ती वर्षभरात सरासरी 33.6 किलो कांदा खाते. लिबियातल्या प्रत्येक पदार्थात कांदा असतो असं माझ्या मित्रानं सांगितलं होतं.
 
पश्चिम अफ्रिकेतील अनेक देशांत कांदा भरपूर खाल्ला जातो. मात्र त्यातला कोणताही देश सर्वाधिक कांदा पिकवणाऱ्या पहिल्या 10 देशांत नाही. फ्रान्समधले लोक फार कांदा खातात असं लोकांना वाटतं मात्र फ्रेंच लोक प्रत्येक वर्षी सरासरी 5.6 किलो कांदा खातात असं दिसून आलंय.
 
भारतात कांदा हा राजकीय मुद्दा होतो. दिल्लीमध्ये 1998 साली भाजपाचं सरकार कांद्याच्या किमतीमुळे गेलं असं म्हटलं जातं. इंग्लंडमध्ये ख्रिसमसच्या काळात कांद्याची मागणी थोडी वाढते तसेच दिवाळी, ईदच्याकाळातही ती मागणी वाढते.
 
कांदा किती पौष्टिक?
आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना गुप्ता यांच्या मते कांदा एक लो कॅलरी फूड आहे. यात फॅट अगदीच नगण्य असतं. मात्र यात भरपूर क जीवनसत्व असतं. 100 द्रॅम कांद्यात 4 मिलीग्रॅम सोडियम, 1 मिलीग्रॅम प्रथिनं, 9-10 मिलीग्राम कर्बोदकं आणि 3 मिलीग्राम तंतुमय पदार्थ असतात.
 
यामुळेच कांदा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कांद्यात अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे कर्करोग असणाऱ्यांनाही कांदा खाण्याची गरज असते.
 









Published By- Priya Dixit 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रयान-3 : चंद्रावर उतरणारी 'ही' सहा चाकी गाडी तिथे काय-काय करणार?