भारतीय चमूला नासाच्या सांघिक भावना स्पर्धेत पुरस्कार मिळाला असून त्यात 13 भारतीय अभियंत्यांचा समावेश आहे. त्यात चार मुली आहेत. हा पुरस्कार दूरनियंत्रक उपकरण तयार करण्याच्या उपक्रमात जाहीर केला आहे. नासाच्या जॉनसन स्पेस सेंटर न्यूट्रल बॉयन्सी लॅब येथील मेट इंटरनॅशनल (मरिन अँडव्हान्सड् टेक्नॉलॉजी एज्युकेशन) आरओव्ही उपक्रमात मुंबईच्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्क्रूड्रायव्हर्स चमूला अलोहा सांघिक भावना पुरस्कार मिळाला आहे. उत्साह, आदर्श संवाद, एकमेकांना मदत, इतरांशी चांगले संबंध यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
सुरक्षा, नवप्रवर्तन, उत्पादन प्रदर्शन व विपणन यासाठीही इतर 5-7 पुरस्कार दिले जातात. आमच्यासाठी हे मोठे प्रोत्साहन आहे, वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या लोकांनी आमचा राष्ट्रीय पोशाख कधी पाहिला नसेल, त्यांना तो परिधान करून पाहण्याची संधी आम्ही दिली आहे, असे स्क्रूड्रायव्हर टीमने सांगितले. स्क्रूड्रायव्हर टीममधील मुलींनी साडय़ा परिधान केल्या होत्या. यातील दोन परीक्षकांनी तर स्क्रूड्रायव्हर टीमशिवाय कुणाची शिफारसच करायला नकार दिला होता. इतर 40 देशांशी स्क्रूड्रायव्हर टीमने सामना केला असून त्यात चीन, स्कॉटलंड, रशिया, अमेरिका, कॅनडा, आयर्लड, मेक्सिको, नॉर्वे, डेन्मार्क, इजिप्त, तुर्कस्थान, पोलंड या देशांचा सामना करून स्पर्धा जिंकली आहे.