Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पूजेतील प्रतिकांमागचा भाव

- पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले

पूजेतील प्रतिकांमागचा भाव
'पत्र पुष्प फल तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्यु पतमश्नमि प्रय‍‍तात्मन:।।'

NDND
ईश्वराला पान, फुले, फळ आणि जल भक्तीभावाने अर्पण केल्यास त्या पदार्थांचे ईश्वर ग्रहण करतो. भक्तीभावाने अर्पण केलेल्या अगदी छोट्याश्या वस्तूंचाही ईश्वर मनोभावे स्वीकार करतो. पूजेमध्ये वस्तूला महत्त्व नसून भक्तीभावाला महत्त्व आहे. परंतु मनुष्‍य या भावावस्थेत राहूनदेखिल जागरूक असतो. त्याला असे वाटते की, ईश्वराला केवळ पान, फुले, फळ आणि जल अर्पण करणे म्हणजे खरी पूजा नाही. म्हणूनच पूजा म्हणजे काय ते आधी समजून घेतले पाहिजे.

पत्र म्हणजे पान ! ईश्वराला नैवैद्याची नव्हे भक्ताच्या भावाची भूक असते. शंकर बेलपत्राने प्रसन्न होतो. गणपती दुर्वांचा प्रेमाने स्वीकार करतो. तुळस नारायणाला प्रिय आहे. ईश्वराचरणी आपण काय वाहतो याला महत्त्व नाही. त्याची किंमत किती हेही महत्त्वाचे नाही. जे वाहतो ते अमूल्य असते. ईश्वराची पूजा अंतःकरणातून केली पाहिजे.

गीताकारांनी स्वत: 'छंन्दासि यस्य पर्णानि' असे म्हणून पानांचा अर्थ वेद ज्ञानाशी लावला आहे. ईश्वराला जे काही द्यायचे आहे ते ज्ञानपूर्वक आणि वेदाज्ञेनुसार देण्यात यावे, असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. थोडक्यात पूजा करताना अपेक्षित मंत्र लक्षात ठेवून पूजा केली पाहिजे. मंत्राशिवाय पूजा करणे म्हणजे ती यांत्रिक पूजा असेल.

पुष्पातही एक प्रतीक आहे. ईश्वराला फुले वाहण्याची ही क्रिया आपल्याला वाणीपुष्प, कर्मपुष्प आणि जीवनपुष्‍पापासून त्याची पूजा करण्याची आठवण देते. फुलांमध्ये सुगंध, रंग, मकरंद आणि कोमलता आहे. फुलासारखे बनण्यासाठी आपले जीवन सत्कर्माने भरलेले असावे, भक्तीच्या रंगात रंगलेले, ज्ञानाच्या मकरंदापासून परिपूर्ण आणि प्रेमासारखे कोमल असले पाहिजे. आपल्या ह्रदयाला कमळाची उपमा दिली जाते. त्या दृष्‍टीने विचार केला तर फूल अर्पण करतो म्हणजे आपण आपले ह्रदय अर्पण करतो.

फळाचा अर्थ कर्मफळ होय. ज्याच्या शक्तीमुळे कर्म होतात तोच कर्मफळाचा खरा अधिकारी असतो. आपण जेव्हा ईश्वरासमोर विविध फळे अर्पण करतो तेव्हा कर्मफळ अर्पण करण्याचे विसरता कामा नये. कोणत्या कर्माचे फळ ईश्‍वर खाईल? 'भूतभावोद्धवकार विसर्ग कर्मसंज्ञित' भूत भाव आणि उद्धार करण्यासाठी आपण जे काही केले आहे तेच खरे कर्म मानले जाते आणि त्याचेच फळ ईश्वर घेतो. आपल्याला कर्मफळाचा स्वीकार करण्याचा अधिकार नाही. कर्मफळाचा त्याग करणेही योग्य नाही. त्यासाठी गीतेने समर्पणाचा एक सुंदर मार्ग दाखविला आहे. ईश्वरचरणी समर्पित केलेल्या फळाचा प्रसाद बनतो आणि तोच प्रसाद आपल्या जीवनात प्रसन्नता निर्माण करतो. देवाला नैवेद्य दाखविण्यामागे हाच उद्देश असतो. 'हे ईश्‍वरा! तुझ्या आशीर्वादाने सर्व काही मिळाले आहे. तुझ्याचरणी अर्पण केलेल्या फळांचा मी प्रसादाच्या रूपात स्वीकार करत असून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.

तोय म्हणजे पाणी (ज‍ीवनरस) होय. आपले जीवन रसमय बनवून ईश्वरचरणी ठेवले पाहिजे. जीवनाचे ईश्वर कार्यात समर्पण करणे हीच खरी पूजा आहे. उसाचा रस काढणार्‍या मशीनमध्ये उसाला दोन तीन वेळा टाकल्यावर त्याचा चोथा होतो. तो नीरस होतो. त्याप्रमाणे आपले जीवन शुष्क झाल्यावर त्याला देवाच्या हातात देऊन ईश्वराला सांगा की आता हे जीवन तुझ्यासाठी आहे तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून रसमय जीवनच अर्पण केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे देवाला प्रेमपत्र लिहिणे, जीवन पुष्प त्याच्या चरणी अर्पण करणे, कर्मफळ त्याला अर्पण करणे आणि रसमय जीवन हेच प्रभूच्या सेवेत अर्पण करणे हीच खरी पूजा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi