Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फटाके उडवा पण जरा जपून

- मुक्ता पवार

फटाके उडवा पण जरा जपून
NDND
दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा कधी आपण विचारच करत नाही. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठ्या संकटास आपण आमंत्रण देतो.

दिवाळीच्या आनंदी वातावरणाची मजा लुटताना थोडेसे सुरक्षिततेचे भानही ठेवायला हवे. या दीपावलीत उत्साहाच्या भरात अपघात होऊ शकतो. आनंदावर विरजण पडते आणि त्याचे दुष्परिणाम कायम स्वरुपाचे होऊ शकतात.

अलीकडे गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 85 ठिकाणी ध्वनी प्रदूषण चाचणी केली असता पर्यावरणात सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रॉन ऑक्साईड यासारख्या विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आले. ही बाब फारच गंभीर स्वरुपाची आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कानठळ्या बसविणार्‍या 125 डेसिबल्सपेक्षा अधिक आवाज करणार्‍या फटाक्यांवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता यावर नियंत्रण येईल. प्रत्येकाने आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. प्रदूषण रोखण्यासाठी वर्तनातील सकारात्मक बदलाची, इच्छाशक्ती आणि जनजागृतीची गरज आहे. न्यायालयाने ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण या बाबतीत आवाजाची जी तीव्रता ठरवली आहे, त्यापेक्षा कमी आवाजाच्या तीव्रतेच्या आणि शोभेच्या फटाक्यांचा वापर करावा. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेत फटाके लावावेत. तसेच ते राहत्या घरापासून दूर मोकळ्या मैदानावर लावावेत. लहान मुले फटाके लावत असताना मोठ्या माणसाने तेथे उभे असणे आवश्यक आहे. एवढी दक्षता प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून घेतली तरी ध्वनी वायू प्रदूषण आपण थोड्याफार प्रमाणात रोखू शकतो. पैसे खर्च करुन बहिरेपणा, अस्थमा, रक्तदाब, खोकला, घशाचे विकार अशा प्रकारची विकतची दुखणी का बरे घ्यावीत? दीपावली ही दिव्यांची असते, आवाजाची नसते तो दीपोत्सव आहे.

तिमिराकडून तेजाकडे नेणारा तसेच दुष्प्रवृतींचा नाश हा खरा या सणाचा उद्देश आहे. पण संपूर्ण वातावरणात मिसळलेला जीवघेणा धूर, धूळ आणि कानाचे पडदे फाडणारे कर्णकर्कश आवाज करणार्‍या फटाक्यांची आ‍तषबाजी करुन हा सण साजरा करण्याचा मार्ग कुठला हे कळत नाही. आवाज न करणार्‍या फुलबाजी, सुरसुर्‍या, टिकल्या, अनार हे लखलखीत प्रकाश देणार्‍या फटाके वाजविणे हे एकवेळ समजू शकते, पण फटाक्यांचा तोफा डागणे हे मात्र आपण टाळलेच पाहिजे.

लक्षात ठेवा एकच नियम पाळा ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi