दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची उपासना अत्यंत श्रेष्ठ मानली गेली आहे. घराघरांत लक्ष्मीची पूजा-अर्चना केली जाते. लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. 'शतपथ ब्राह्मण' ग्रंथात लक्ष्मीची एक कथा आहे. त्यानुसार प्रजापती हा लक्ष्मीचा पिता. लक्ष्मीचा जन्म अतिशय सुंदर आणि गुणवान देवीच्या रूपात झाला आहे. तिच्या सौंदर्याची कीर्ती एवढी पसरली होती की स्वर्गातील देवताही तिच्याकडे असुयायुक्त भावनेने तिच्याकडे पाहत. शेवटी तर असे होऊ लागले, की या अप्रतिम निर्मितीच नष्ट करून टाकावी, असा विचार इर्षेपोटी या देवांच्या मनात येऊ लागला.
अखेर प्रजापित्याने या देवतांना रोखले आणि एका स्त्रीचा असा नाश करणे शोभत नाही, असे त्यांना सुनावले. लक्ष्मीच्या ज्या गुणांमुळे हे सगळे होत आहे, ते गुण काढून घ्या, असा उपाय त्यांनी सुचवला. या देवदेवतांनी अखेर लक्ष्मीचे भोजन, रा्ज्य, सत्ता, सृष्टी, उच्चस्थान, शक्ती, पवित्र तेज, घर, वैभव आणि सौंदर्य हिरावून घेतले. हे सगळे गेल्यानंतर लक्ष्मी आपल्या पित्याला म्हणजे प्रजापतीला शरण गेली. प्रजापतीने सर्व दहा देवतांना प्रसन्न करून घे असा सल्ला लक्ष्मीला दिला. लक्ष्मीने तसेच केले. यज्ञ अनुष्ठानाद्वारे देवदेवतांना प्रसन्न करून आपले गुणावलेले सर्व गुण परत मिळविले.
थोडक्यात, प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती आणि त्याचे रक्षण स्वतःलाच करावे लागते मग ती व्यक्ती देवी देवता का असोनात, असा संदेश या कथेतून देण्यात आला आहे.