आचार्य भगवत्पाद एकदा भीक मागता मागता एका निर्धन ब्राह्माणाच्या घरी गेले. आचार्यांच्या रूपात एक पाहुणा आपल्या घरी आल्याचे पाहून ब्राह्मण दाम्पत्यासमोर मोठे संकट उभे राहीले. कारण त्यांना भिक्षा देण्यासाठी त्यांच्या घरात काहीही नव्हते. खूप शोधाशोध केल्यानंतर घरात एक आवळ्याचे फळ सापडले. ते त्यांनी आचार्यांना भिक्षेच्या स्वरूपात दिले. हे पाहून त्यांना त्या गरीब ब्राह्मणाची दया आली. त्यानंतर त्यांनी एका वृक्षाखाली बसून ऐश्वर्यसंपन्न महालक्ष्मीची आराधना केली. आचार्याची आराधना पाहून देवी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि तिने त्यांना विचारले की 'आपण माझी आठवण कशी केली?'
या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाची कहाणी महालक्ष्मीला सांगून त्याच्यावर कृपा करण्याची विनंती केली. परंतु, त्याच्या नशीबामुळे त्याला या जन्मात धनप्राप्त होऊ शकणार नाही असे देवीने सांगितले. परंतु, या दाम्पत्याने या जन्मात माझ्यासारख्या भिक्षुकाला आवळ्याचे फळ दान करून महान पुण्य प्राप्त केले असल्याचे समर्थन आचार्यांनी केले. त्यामुळे तो धनसंपत्तीचा अधिकारी झाला आहे. म्हणून आपण त्याच्यावर अवश्य कृपा करावी.
आचार्यांच्या केलेल्या समर्थनाचे खंडन महालक्ष्मी करू शकली नाही आणि त्याचवेळी तिने त्या ब्राह्मणाच्या दारात सुवर्णाचा वर्षाव केला आणि त्याची गरीबी कायमची दूर झाली.