मराठी पुस्तके वाचली जात नाहीत. वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, ही ओरड प्रत्येक साहित्य संमेलनात आणि चार मराठी लोक जमतात तिथे आवर्जून केली जाते. 'मराठीला वाचवायला पुढे या' अशी हाकाटीही पिटली जाते नि मराठी वाचवायसाठी रस्त्यावर 'राडे'ही केले जातात. पण मराठीची स्थिती खरंच इतकी दयनीय आहे का? महाराष्ट्रात मराठी पुस्तक घराघरात पोहोचविण्याचे 'व्रत' अंगीकारणारे 'ग्रंथायन'चे पंकज कुरूलकर 'हा प्रश्नच उडवून टाकतात.
'हॅट, असं काहीही नाही' असं सुरवातीलाच सांगून टाकतात. कुरूलकरांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या ग्रंथायन संस्थेतर्फे सर्व प्रकारची पुस्तके महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचविण्याचा संकल्प सोडला. त्यांच्या दहा मोबाईल व्हॅन राज्यातल्या गावागावात जाऊन पुस्तक विक्री करतात. शिवाय त्यांनी दिलेल्या टोल फ्री नंबरवर फोन करून कुणीही इतर कोणत्याही खर्चाविना घरपोच पुस्तक मागवू शकतो. या उपक्रमाला सहा महिने झाले आहेत. या काळात त्यांना काय अनुभव आला हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा 'मस्त, झकास, फॅब्लुलियस' या शब्दांनीच स्वागत झालं. 'लोकं वाचतात, आपण पोहोचत नाही', हा त्यांनी सहा महिन्याअंती काढलेला 'लसावी' आहे.
त्यांच्या मते महाराष्ट्रात पुस्तक विक्रीला भरपूर 'स्कोप' आहे. राज्यातल्या ३५ पैकी २२ जिल्ह्यात मराठी पुस्तकांची दुकानेच नाहीत. मग लोक पुस्तक घेणार कुठून? त्यांना पुस्तके कशी मिळणार? म्हणूनच ग्रंथायन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे.
मग या सगळ्याचा 'ट्रेंड' काय दिसतोय? कुरूलकर सांगतात, महाराष्ट्रात बक्कळ वाचक आहे. त्यांना पुस्तकं हवी आहेत. पण प्रामुख्याने धार्मिक पुस्तकांना अर्थातच जास्त मागणी आहे. याशिवाय अनेक वर्षे 'बेस्ट सेलर' राहिलेली पुस्तके आजही लोक मागतात. 'मृत्युंजय, ययाती, छावा, शिवछत्रपती, युगंधर, राधेय, स्वामी' ही काही पुस्तके आजही प्रचंड खपतात. आजची पिढीही ही पुस्तके वाचते.
महाराष्ट्राच्या विकासाप्रमाणे पुस्तक वाचनातही 'असमतोल' असल्याचे कुरूलकरांशी बोलल्यानंतर जाणवले. साधारणतः विकसित समजल्या जाणार्या 'शहरी' भागापेक्षा ग्रामीण भागात पुस्तकाची मोठी मागणी असल्याचे लक्षात आले. भागनिहाय विचार करता, कोकणात पुस्तके जास्त खपतात. वाचली जातात, असे कुरूलकर सांगतात. कोकणात सुरवातीपासूनच वाचन संस्कृती चांगली असल्याचे त्यांचे निरिक्षण आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे भागातही लोक वाचतात. अमळनेर, चांदवडसारख्या ठिकाणीही त्यांच्या पुस्तक व्हॅनला चांगला प्रतिसाद मिळाला.
हल्लीचे तरूण काही वाचत नाहीत हे मतही कुरूलकरांना फारसे पटत नाही. वाचण्याचे 'फॉर्म' बदलले असतील. पण वाचत नाही असे म्हणणे योग्य नाही. इंग्रजीनंतर तो मराठी वाचतो, हे त्यांचे निरिक्षण आहे. याशिवाय सेल्फ हेल्प बुक्स वाचण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे ते सांगतात.
कुरूलकर अतिशय 'उद्योगी' आहेत. एवढं केल्यावरही तिथेच थांबायला ते तयार नाहीत. त्यांना आता पुस्तके घेऊन देशभर पोहोचायची आहेत. देशभर पुस्तक विक्रीच्या व्हॅन सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. पण त्यासाठी ते 'नॅशनल परमिट' मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मधल्या काळात ते परप्रांतातील मराठी मंडळींपर्यंत पुस्तके पोहचवू इच्छित आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
शिवाय आता 'ग्रंथायन'तर्फे पुस्तक प्रकाशनही केले जाते. त्यांची बरीच पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. त्यांचा दर्जाही उत्तम आहे. दर महिन्याला सध्या ते १२ पुस्तके प्रकाशित करतात आणि २२ भारतीय भाषांत पुस्तके प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे.
कुरूलकरांशी बोलल्यानंतर 'मुमूर्ष' मराठीची चिंता वाहणार्यांची 'चिंता' फिजूल असल्याची खात्री पटते.