Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापूरची अंबाबाई

कोल्हापूरची अंबाबाई
MH GovtMH GOVT
कोल्हापूरात वसलेली श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. प्राचीन करवीर नगरीतील या अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. येथील मंदिर बरेच प्राचीन असल्याचे बोलले जाते. कोकणातून राजा कर्णदेव कोल्हापुरात आला त्यावेळी मूर्ती एका लहान मंदिरात होती. कर्णदेवाने भोवतालचे जंगल मोकळे केले. सतराव्या शतकांनतर तत्कालीन अनेक बड्या व्यक्तींनी मंदिरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर हे महाराष्ट्राचे दैवत झाले. मंदिराच्या परिसरात जवळपास 35 लहान-मोठी मंदिरे व 20 दुकाने आहेत. वास्तुशास्त्रीय बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम झाले असावे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून मंदिरावर पाच कळस आहेत. मुख्य मंदिरास लागूनच गरूड मंडप आहे.

पुराणानुसार ‍आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच करवीर ‍क्षेत्रास ‍विशेष महत्व आहे. सहा शक्तीपीठांपैकी हे एक असून येथे इच्छापूर्तीसोबतच मनःशांतीही मिळते. त्यामुळेच उत्तर काशीपेक्षाही ह्या ठिकाणास महात्म्य आहे, असा भाविकांचा विश्वास आहे. श्री महालक्ष्मी व भगवान विष्णूंचे वास्तव्य करवीर भागात असल्याची श्रद्धा आहे.

श्री महालक्ष्मीची मूर्ती रत्नजडित खड्यांपासून घडविण्यात आली असून ती जवळपास पाच ते सहा हजार वर्षापूर्वीची असावी, असे बोलले जाते. मूर्तीचे वजन साधारणतः चाळीस किलो आहे. देवीला चार भूजा आहेत. डोक्यावर मुकूट व शेषनाग
आहे. बहुधा मंदिरांचे तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असते मात्र, येथील देवी पश्चिममुखी आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर छोटीशी खिडकी आहे. वर्षातून मार्च व सप्टेंबर महिन्याच्या 21 तारखेस सूर्यास्तावेळी खिडकीतून सूर्यकिरणे मूर्तीच्या मुखावर पडतात. या योगास दुर्मिळ व लाभदायक मानण्यात येते. मावळतीच्या सोनेरी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणार्‍या मातेच्या दर्शनासाठी या दिवशी भक्तगण मंदिरात गर्दी करतात. त्यानिमित्त येथे किरणोत्सवही साजरा केला जातो.

मंदिराच्या दैनंदिन विधीमधील आरती हा प्रमुख विधी आहे. रोज पाच वेळा आरती होते. पहाटे चारच्या सुमारास काकड आरती करण्यात येते. यावेळी भूप रागातील धार्मिक गीतगायन होते. मंगलारतीनंतर सकाळी आठच्या सुमारास महापुजा करण्यात येते. रोज रात्री दहाच्या सुमारास शेजारती होते. यावेळी गोड दुधाचा प्रसाद असतो. गाभार्‍यात आरती करण्यात येते व यावेळी देवीला निद्रा यावी म्हणून विशेष आराधना केली जाते. महाकाली, श्री यंत्र, महागणपती व महासरस्वतीसही आरती व नैवद्य दाखविण्यात येतो. मंदिर परिसरातील सर्व 87 मंदिरांना आरती ओवाळण्यात येते.

करवीर क्षेत्रावर माता महालक्ष्मीचा आशीर्वाद असून या नगरीला जगदंबा मातेने आपल्या उजव्या हातात धरल्याचे मानण्यात येते. त्यामुळे कोणत्याही प्रलयापासून ह्या नगरीचे संरक्षण होते, अशी श्रद्धा आहे. भोग आरतीच्या वेळेस मंदिरात प्रातःकाळी वैदिक मंत्रोच्चार होतो. घंटानादानंतर आरती होते. शुक्रवारी सायंकाळी मातेस नैवैद्य दाखविण्यात येतो. नियमित आरत्यांव्यतिरिक्त रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळाष्टमी, किरणोत्सवाच्या प्रसंगीही विशेष आरतीचे आयोजन होते. श्री शंकराचार्य व श्रीमान छत्रपतीच्या भेटीप्रसंगीही विशेष आरती करण्याची प्रथा आहे. ‍कार्तिक महिन्यात दिवाळीपासून पौर्णिमेपर्यंत उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी हजारो भाविक उपस्थित राहतात. भारतातील महत्वाच्या शहरांशी हे शहर रेल्वे व रस्त्यांनी जोडले गेले आहे. शहरातून मंदिरापर्यंतही वाहतुकीची उत्तम व्यवस्था आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi