Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवीपूजक तांत्रिकांचा शाक्त पंथ

- ऋग्वेदी

देवीपूजक तांत्रिकांचा शाक्त पंथ
WD
शाक्त पंथांत दोन पक्ष आहेत. एका पक्षाचे लोग सात्विक पद्धतीने शक्तीचे अर्चन करतात. या देवीचे स्वरूपही शांत व प्रेमळ असल्याचे मानतात. हा पक्ष दक्षिणमार्गी, उत्तरकौलिक, समयिन् वगैरे नावांनी प्रसिद्ध आहे. दुसर्‍या मतास तंत्रमार्ग, आगम, मंत्रशास्त्र, पूर्वकौल, वाममार्ग, उपासना वगैरे नावे असून यांचे शक्ती उपासनेचे विधी पूर्णतः वेगळे (अवैदिक) आहेत.

या पंथाची स्थापना नाथजोगी नावाच्या सांप्रदायिकांनी केली. त्यांनी या संबंधी शिवपार्वती संवादरूप अनेक ग्रंथ लिहिले. त्यांस तंत्र असे म्हणतात. त्यांत पूजा, न्यास, मुद्रा, बीजाचे मंत्र वगैरे अनेक विधी आहेत. त्यांच्या देवतांस दशमहाविद्या म्हणतात. या देवींची नांवे पुढीलप्रमाणे- 1. श्यामा (काळी), 2 तारा, 3. त्रिपुरा, 4. बगलामुखी, 5. छिन्नमस्तका, 6. मातंगी, 7. धुमावती, 8. भैरवी, 9. महाविद्या व 10. भुवनेश्वरी. याशिवाय तिच्या गुणवैशिष्ट्यामुळे व तिने निरनिराळ्या कारणास्तव घेतलेल्या अवतारांमुळे त्रिपुरसुंदरी, ललिता, शांता, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, चंडी, चामुंडी वगैरे कितरी तरी नावांनी ती प्रख्यात झाली आहे. त्यांची पूजा, पटले, मंत्र, सहस्त्रनाम, पद्धती, बीजें, पवचे, न्यास, मुद्रा, होम, बलि वगैरे अनेक विधी आहेत. मद्यमांसाशिवाय हे विधी पूर्ण होत नाहीत.

तांत्रिक मतास अनुसरून, देवीमाहात्म्य हा ग्रंथ प्रमाण मानून त्याचे पठण व नवण, सप्तशतीचा चंडिपाठ नवरात्रात करण्यात येतात. शाक्तांनी आपल्या कल्पित देवांमध्ये अनेक भैरव असल्याचे मानले आहे. त्यांच्यात अनेक देवी किंवा भैरवीही कल्पिल्या आहेत. शाक्तलोक स्त्रियांना शक्ती व पुरुषांना वीर किंवा भैरव म्हणतात. यांच्यात स्त्रीची पूजा अतिशय वेगळ्या पद्धतीने केली जाते. सामन्य माणूस ती पाहू शकत नाही. देवीची कृपा संपादन करण्यासाठी अनेक उग्र अनुष्ठाने केली जातात. काही तंत्रमार्गी लोक तर प्रेतावर आसन मांडून बसणे, हाडादातांच्या माळा घालणे वगैरे‍ विधीही करतात.

तांत्रिकांची कालगणना, पंचांग, श्राद्ध, अंत्येष्‍टि वगैरे सर्व विधी वैदिकांच्या पद्धतीहून भिन्न आहेत. त्यांच्यात यंत्रे पुष्कळ असून त्यात श्रीचक्र हे श्रेष्ठ आहे. ही यंत्रे शालिग्राम शीलेवर, भूर्जपत्रावर किंवा स्फटिकावर तयार केलेली असतात. ती प्रामुख्याने काशी व काश्मीर येथे मिळतात. त्याच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे बरेच लोक मानतात. जे या मताचे नाहीत त्याना पूर्णाभिषक किंवा पट्टाभिषेक करण्यात येतो. हे तांत्रिक आपल्याला जारण, मारण, उच्चाटण, शत्रुनाश, वशीकरण, मोहन, सैन्यस्तंभन, मेघस्तंभन, बुद्धिस्तंभन, सर्पनिवारण, रोगनिवारण वगैरे विद्या येतात, असा दावा करतात. हा संप्रदाय प्रामुख्याने बंगाल, नेपाळ, काश्मीर, द्रविड भाग , मलबार, महाराष्ट्र व कर्नाटक या प्रांतात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi