महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणीची सप्तश्रृंगी देवी ओळखली जाते. प्राचीन ग्रंथांमध्येही स्वयंभू शक्तीपीठ म्हणून या देवीचा उल्लेख आढळतो. इच्छित फलप्राप्तीसाठी अनेक ऋषी मुनी येथे आल्याचे उल्लेख आढळतात. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रानीही येथे भेट दिल्याचा उल्लेख आहे.
प्राचीन काळी सप्तश्रृंग गड हा दंडकारण्याचा भाग होता. मार्कण्डेय व पाराशर ऋषींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती. सप्तश्रृंग गड चढल्यावर मदिरात जाण्यासाठी साधारणत: पाचशे पायर्या चढाव्या लागतात. येथे पोहचल्यावर स्वयंभू सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घडते. देवीला अष्टभुजा आहेत. मूर्तीची उंची आठ फूट आहे. सकाळी सहापासून रात्री आठपर्यंत मंदिरात पूजाअर्चा करता येते.
सप्तश्रृंग गड पश्चिम डोंगर रांगेत समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फुट उंचीवर आहे. डोंगरावरून दूरवर
पसरलेल्या सृष्टीसौदर्याचे दर्शन घडते. भाविकांसाठी येथे निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. न्यासाद्वारे मंदिराचे व्यवस्थापन पाहण्यात येते. येथे अनेक प्राचीन मंदिरे व तीर्थ आहेत. सप्तश्रृंगी देवीच्या विरूद्ध दिशेला जवळच्याच टेकडीवर मच्छींद्रनाथ मंदिर आहे. मंदिराच्या समोर मार्कंडेय ऋषींची टेकडी आहे. रामायणातील संदर्भानुसार हनुमंताने जखमी लक्ष्मणासाठी याच टेकडीवरून औषधी वनस्पती आणली होती. टेकडीवर जवळपास शंभर कुंड आहेत. सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याही नांदुरी गाव आहे.
गुढीपाढवा, चैत्रोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्रौत्सव, कोजागरी उत्सव, लक्ष्मीपूजन, हरिहर भेट, महाशिवरात्र इत्यादी उत्सव गडावर साजरे करण्यात येतात.
जाण्याचा मार्ग
सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी नाशिकहून राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित बस आहेत. नाशिकहून येथील अंतर साधारणत: सत्तर किलोमीटर आहे.