Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पोलिस भरतीच्या निकषांमध्ये होणार बदल; असे असतील नवे नियम

maharashtra police
, मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (07:35 IST)
मुंबई  – पोलिस भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे समाजमाध्यमांवर मात्र तरुणांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून भरती प्रक्रिया रखडली असताना आता नव्या १४ हजार ९५६ पदांच्या भरतीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे. मात्र करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळण्यासाठी नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तरी राज्यातील सर्व वयोगटांतील तसेच सर्व जाती व समाजातील तरुणांचा या भरतीत समावेश करण्याच्या उद्देशानेही याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
 
आणखी विशेष बाब म्हणजे मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भरतीच्या अटी आणि शर्तीमध्ये बदल केला जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल होती. सन २०२१ मधील पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याच्या सूचना महासंचालक कार्यालयातील प्रशिक्षण व खास पथके या विभागामार्फत देण्यात आली आहेत तसेच ही जाहिरात देण्याबाबतचे यथावकाश कळविण्यात येईल, अशा सूचना राज्यातील सर्व पोलीस विभागांना देण्यात आल्या होत्या. भरतीबाबतची ही जाहिरात १ नोव्हेंबरला काढण्यात येणार होती. राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु राज्यातील अधिकाधिक तरुणांना या भरतीत सहभाग घेता यावे, या उद्देशाने अटी-शर्तीमध्ये बदल करण्याबाबत विचार सुरू आहे.
 
महत्वाची गोष्ट म्हणजे गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठकीत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. राज्य शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
 
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १: १० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील.
 
तसेच लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
 
लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ग्रामीण भागातील तरूणांना सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर जावे लागत होते. त्यामुळे शारीरिक चाचणीत अव्वल ठरणाऱ्या उमेदवारांनाही पोलिस भरतीची संधी मिळत नव्हती. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी पदे भरली जातील. सध्या राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लवकरच सुमारे १५ हजार पोलीसांच्या भरतीची जाहिरात निघणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतर विभागांना आदेश दिलेले आहेत की, ज्या कोणत्या विभागांमध्ये जागा रिकाम्या असतील त्या जागांचा रिपोर्ट तयार करावा आणि विभागानुसार लवकरच नोकरीची जाहिरात काढावी, यामुळे अजून इतर वेगवेगळ्या विभागातील जाहिराती निघण्याची शक्यता आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Weight loss रोज या प्रकारे दही खा, वजन कमी होऊन पचनक्रिया सुरळीत होईल